Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मराठवाडय़ात युती ६, आघाडी २ जागी पुढे
औरंगाबाद, १६ मे/प्रतिनिधी-वार्ताहर

 

लोकसभेच्या आठही मतदारसंघांतील मतमोजणीचा प्राथमिक कौल पाहता काँग्रेसला थोडासा फायदा होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील हिंगोली मतदारसंघात पराभवाच्या वाटेवर आहेत. औरंगाबादमध्ये अटीतटीच्या लढतीत खासदार चंद्रकांत खैरे विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या मार्गावर आहेत. अखेरच्या माहितीनुसार त्यांची आघाडी २९ हजार मतांची आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनीही विजयाकडे आगेकूच सुरू केली आहे.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेच्या केलेला नांदेड मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस खेचणार असे स्पष्ट झाले. काँग्रेसचे उमेदवार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आठव्या फेरीअखेर २९ हजार ५०० मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना १ लाख ३९ हजार ३५० व भा. ज. प.चे उमेदवार संभाजी पवार यांना १ लाख ९ हजार ५११ मते मिळाली होती.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर मतदारसंघात चुरशीची लढत चालू आहे. प्रारंभीच्या काही फेऱ्यांमध्ये भा. ज. प.चे सुनील गायकवाड यांनी चांगली आघाडी घेतली होती. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जयवंत आवळे यांनी आठव्या फेरीत ही आघाडी कमी करण्यात यश मिळवले. या फेरीअखेर गायकवाड यांना १ लाख ३१ हजार ३३५ व आवळे यांना १ लाख ३० हजार २८३ मते मिळाली होती.
हिंगोलीमध्ये शिवसेनेचे उमेदवार आमदार सुभाष वानखेडे ‘जायंट किलर’ ठरण्याची चिन्हे आहेत. नवव्या फेरीअखेर त्यांना १ लाख ३५ हजार २४२ व केंद्रीय राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सूर्यकांता पाटील यांना ९३ हजार १३४ मते मिळाली. बहुजन समाज पक्षाचे बी. डी. चव्हाण यांना ४१ हजार १४५ मते मिळाली होती. वानखेडे यांची आघाडी ४२ हजार १०८ मतांची होती.
परभणीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची चिन्हे आहेत. पाचव्या फेरीअखेर शिवसेनेचे उमेदवार गणेश दुधगावकर यांना ९२ हजार ३८० व कृषी खात्याचे राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांना ६३ हजार ८९८ मते मिळाली होती.
जालन्यात भा. ज. प.चे खासदार रावसाहेब दानवे विजयाच्या वाटेवर होते. अकराव्या फेरीअखेर त्यांना १ लाख ८६ हजार ५६७ मते व काँग्रेसचे कल्याण काळे यांना १ लाख ७९ हजार ३८१ मते मिळाली होती.
उस्मानाबादमध्ये सहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्यापेक्षा साडेसात हजार मतांची आघाडी घेतली होती. डॉ. पाटील यांना १ लाख १४ हजार ५५८ व गायकवाड यांना १ लाख ६ हजार ७५१ मते मिळाली होती.
दहाव्या फेरीअखेर बीडमध्ये मुंडे ६२ हजार ८१६ मतांनी आघाडीवर होते. त्यांचा विजय निश्चित आहे. औरंगाबादमध्येही सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या खैरे यांनी नंतर विजयी आघाडी घेतली.