Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

प. महाराष्ट्र व मराठवाडय़ात युती, आघाडीला संमिश्र यश
पुणे, १६ मे प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, उदयनराजे भोसले , सुप्रिया सुळे, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील , भाऊसाहेब वाकचौरे भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्येच दमदार आघाडी घेत विजयाकडे जोरदार मुसंडी मारली. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील वीस मतदारसंघात युती आणि आघाडीला संमिश्र यश मिळण्याची चिन्हे स्पष्ट झाली. साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले, औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विजयी झाल्याचे दुपारी जाहीर करण्यात आले. माढय़ातून शरद पवार आणि बारामतीतून सुप्रिया सुळे हे किती मतांची आघाडी घेतात, याचीच फक्त उत्सुकता शिल्लक होती. पुण्यातील चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे सुरेश कलमाडी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे यांच्यापेक्षा सोळा हजार मतांनी आघाडीवर होते. तर मावळमध्ये शिवसेनेचे गजानन बाबर यांची विजयाकडे वाटचाल सुरू होती. नगरमध्ये कॉंग्रेसचे शिवाजीराव कर्डिले आणि भाजपचे दिलीप गांधी यांच्यात जोरदार चुरस होती. शिर्डी राखीव मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले पिछाडीवर होते. कोल्हापूरमध्ये अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक आणि हातकणंगलेमधून अपक्ष उमेदवार राजू शेट्टी यांनी प्रारंभीच्या फेऱ्यांत आघाडी घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्का दिला. सांगलीमधून कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी प्रारंभीच मोठी आघाडी घेतली. हिंगोलीमधून राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील आणि लातूरमधून कॉंग्रेसचे जयवंतराव आवळे सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते.