Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

उत्तर महाराष्ट्रात भाजपची मुसंडी
नाशिकच्या लक्षवेधी लढतीत समीर भुजबळ विजयी

 

बहुरंगी लढती व परस्परांना छेद देणारी समीकरणे यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय गुंतागुंतीच्या पाश्र्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातल्या सहा मतदारसंघांपैकी तीन जागांवर आघाडी घेत भाजपने मुसंडी मारली असून काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात अस्तित्व उरले नसून नाशिकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारत मनसेने जोरदार धक्का दिला आहे. सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी मनसेच्या हेमंत गोडसे यांचा पराभव केला असून शिवसेनेचे दत्ता गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. नंदुरबारमध्ये मध्ये काँग्रेसचे माणिकराव गावित सलग नवव्यांदा लोकसभेत प्रवेशकरणार आहेत तर दिंडोरीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांच्यावर विजय मिळविला आहे. जळगाव जिल्हयातील दोन्ही जागांवर भाजपने आघाडी मारली असून धुळ्यातील चुरशीच्या लढतीत सातव्या फेरीअखेर काँग्रेसचे अमरीश पटेल भाजपच्या प्रताप सोनवणे यांच्यापेक्षा सुमारे पाच हजार मतांनी पुढे आहेत.
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरविल्यामुळे नाशिकची निवडणूक यंदा सुरुवातीपासूनच चर्चेत होती. जातीय समीकरणाचा आधार घेत सेनेने दत्ता गायकवाड यांना त्यांच्याविरोधात उतरविल्याने आणि त्यातच अखेरच्या क्षणी मनसेचीही चांगलीच हवा तयार झाल्याने येथील निकालाकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले होते. अखेर या तिरंगी लढतीत समीर यांनी मनसेच्या गोडसे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला तर सेना तिसऱ्या क्रमांकावर गेली. शेजारच्या दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांचा पराभव केला. माकपचे जीवा पांडू गावित तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले रोहिदास पाटील यांना डावलून काँग्रेसने धुळ्यातून अमरीश पटेल यांना दिलेली उमेदवारी व त्यामुळे पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीररित्या व्यक्त केलेली नाराजी याच्या परिणामी धुळ्याची निवडणूक सुद्धा चांगलीच गाजली. साहजिकच येथे प्रत्येक फरीगणिक गणित बदलत असून सातव्या फेरीअखेर काँग्रेसचे पटेल भाजपच्या सोनवणे यांच्यापेक्षा पुढे होते. परंपरेने काँग्रेससोबत राहणाऱ्या नंदुरबार मतदारसंघात या वेळी या पक्षाचे माणिकराव गावित यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित यांनी दंड थोपटले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी समाजवादी पार्टीचे तिकीट घेतल्याने उभयतांच्या मतविभागणीत भाजपचा लाभ होण्याची शक्यता व्यक्त होत होती.
तथापि, आपला गड राखण्यात काँग्रेसने यश मिळविले आणि माणिकराव गावितांची जागा कायम राहिली. भाजपचा बालेकिल्ला म्हणविल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्य़ातील दोन्ही जागांवर अपेक्षेनुसार भाजपचे उमेदवार आघाडीवर असून जळगावचे या पक्षाचे उमेदवार ए. टी. पाटील यांनी तब्बल ९५ हजार मतांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार वसंत मोरे यांच्यावर विजय मिळविला. रावेरमध्ये भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी घेतलेली निर्णायक आघाडी पाहता ते विजयाच्या समीप पोहचले आहेत.