Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मनमोहन सिंग यांनी साधली वाजपेयींशी बरोबरी

 

आघाडय़ांच्या राजकारणात सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळविणारे मनमोहन सिंग हे अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतरचे दुसरे नेते ठरणार आहेत. त्याचप्रमाणे गांधी-नेहरू घराण्याचे नसतानाही दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी येणारे ते काँग्रेस आघाडीतील एकमेव नेते ठरणार आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर १९७० पासून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी येणे एकाही नेत्याला जमले नव्हते. अटलबिहारी वाजपेयी यांनी मात्र १९९९ मध्ये सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळविले. २००४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधानपदी मनमोहन सिंग यांची अनपेक्षित निवड झाली होती. त्यानंतर आता परत २००९ मध्ये ते पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.
१९७७ च्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्याच हाती केंद्रातील सत्ता होती. १९७७ मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत मोरारजी देसाई आणि चरण सिंग हे पंतप्रधानपदी आले. १९८० मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधानपदी परत विराजमान झाल्या. त्यांच्या हत्येनंतर १९८४ च्या निवडणुकीत राजीव गांधी एकहाती विजय मिळवून सत्तेवर आले. १९८९ मध्ये मात्र सर्वाधिक जागा मिळूनही सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांनी विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा डावे आणि उजवे यांच्या पाठिंब्यावर ‘बोफोर्स’च्या पुण्याईने विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधानपदी आले. मात्र मंडल-कमंडल संघर्षांत अवघ्या ११ महिन्यांत त्यांचे सरकार पडले. मग चंद्रशेखर हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले पण चार महिन्यांत काँग्रेसने पाठिंबा काढल्याने त्यांचे सरकार गडगडले. १९९१ च्या निवडणुकीत पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधानपदी आले. त्यांनी १९९६ पर्यंत सलग पाच वर्षे कारभार केला. १९९६ च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी सत्तेवर आले पण अवघ्या १३ दिवसांत त्यांचे सरकार गडगडले. मग एच. डी. देवेगौडा यांना ११ महिने तर इंदरकुमार गुजराल यांना चार महिने पंतप्रधान म्हणून राजयोग लाभला. १९९८ च्या निवडणुकीत अल्पमताच्या पाठबळावर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले पण ते १३ महिन्यांत गडगडले. १९९९ च्या निवडणुकीत विजय मिळवून पुन्हा वाजपेयीच पंतप्रधानपदी आले. २००४ च्या निवडणुकीत मनमोहन सिंग हे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारचे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले. सिंग यांनी १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या आग्रहामुळे राजकारणात प्रवेश केला आणि ते अर्थमंत्री झाले. देशातील आर्थिक सुधारणांचे धुरीणत्व त्यांनी पार पाडले. राव यांना सत्तेत परतणे साधले नाही पण त्यांच्या शिष्याने ते साधून दाखविले आहे.