Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

नितीशकुमारांचीही अखेर ‘तिरकी चाल’?
नवी दिल्ली/पाटणा, १५ मे/पी.टी.आय.

उद्या मतपेटय़ा उघडल्यानंतर काय होणार, कोण कोणाच्या गळ्यात गळे घालणार आणि कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार याचे आडाखे सगळीकडे बांधले जात आहेत. या रणधुमाळीत जवळपास सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी इतके परस्परविसंगत आणि तर्कदुष्ट भूमिका घेतल्या आहेत, विधाने केली आहेत की निकालानंतर ही सगळी मंडळी काय करतील याची कल्पनाही करणे केवळ अशक्य. या आखाडय़ात उतरूनही अंगाला फारशी माती लागू न देणे तसे कठीणच. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ही कसरत मोठय़ा कौशल्याने चालविली होती.

आज फैसला!
सुशीलकुमारांच्या भवितव्याचा अन् शरद पवारांच्या मताधिक्याचा!
सोलापूर, १५ मे/प्रतिनिधी
भाजपच्या ताब्यात गेलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणणार किंवा कसे, तसेच माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले पंतप्रधानपदाचे उमेदवार शरद पवार हे किती विक्रमी मते मिळविणार, याचा फैसला उद्या (शनिवारी) लागणार असल्यामुळे याकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष वेधले आहे. गेल्या २३ एप्रिल रोजी सोलापूर (राखीव) आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले.

मतदारांचा कौल कुणाला?
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

विदर्भातील दोन केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, सात मावळते खासदार, राज्याचे एक मंत्री, दोन आमदार आणि तीन माजी खासदारांच्या राजकीय भाग्याचा फैसला उद्या, शनिवारी होणार आहे. मतदानाची कमी टक्केवारी आणि मतदारांच्या निरुत्साहामुळे उमेदवारांची धडधड मात्र वाढली आहे. केंद्रात सत्तेसाठी काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यासाठी उमेदवार व त्यांच्या पक्षांनी संपूर्ण शक्ती पणाला लावलेली आहे. आता त्याचे फळ कोणाला चाखायला मिळते, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

डाव्यांच्या पाठिंब्याविना काँग्रेस आघाडी सत्तेवर येणार - पृथ्वीराज चव्हाण
कराड, १५ मे/वार्ताहर

केंद्रातील पाच वर्षांच्या कारकीर्दीत केलेल्या भरीव कामगिरीच्या जोरावर काँग्रेसला भाजपपेक्षा ३० ते ३५ जादा जागा मिळून केंद्रात काँग्रेस मित्रपक्षांचे सरकार डाव्यांच्या पाठिंब्याशिवाय सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास काँग्रेसचे महासचिव पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. डॉ. मनमोहन सिंग हेच नवे पंतप्रधान असतील, तर लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान होण्यास अजिबात संधी नसल्याचा दावा त्यांनी केला. विविध एक्झिट पोलचे अंदाज पाहाता पुरोगामी लोकशाही आघाडीलाच सत्ता स्थापण्याची पुनश्च संधी असून, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीपेक्षा आम्ही मोठे अंतर गाठू. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सत्तेत यायला निश्चितच अडचण नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

केंद्रात काँग्रेस-भाजप युतीचे सरकार यावे-गोविंदाचार्य
इंदूर, १५ मे/ पीटीआय

केंद्रात आगामी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने परस्परांशी हातमिळवणी करावी, असे मत भाजपचे माजी सरचिटणीस आणि विचारवंत गोविंदाचार्य यांनी व्यक्त केले आहे. येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि भाजपमध्ये धोरणात्मकदृष्टय़ा कोणतेही मतभेद नाहीत, म्हणूनच केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी एकत्र यावे. दोन्ही पक्षांची हातमिळवणी झाली आणि त्यांचे सरकार स्थापन झाले तर राजकीय स्थिरता येईल शिवाय संसदेत सौदेबाजी होण्याची भीती राहणार नाही. सेझ, मॉल्स, आणि प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक या मुद्दय़ांवर दोन्ही पक्षांची मते समान आहेत. मात्र दोन्ही पक्ष दहशतवाद, घुसखोरीबाबत मवाळ धोरण अवलंबतात असा आरोप करून गोविंदाचार्य म्हणाले की, पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका या देशांबाबत दोन्ही पक्षांचे परराष्ट्र धोरणही सारखेच आहे. दोन्ही पक्षांचे युती सरकार केंद्रात सत्तेवर आले तर महागाई व इतर मुद्दय़ांसंबंधी सर्वसामान्यांना वाटणाऱ्या चिंतेविषयी आवाज उठवणारा नवा रचनात्मक विरोधी पक्षही उदयास येईल,असे मत त्यांनी व्यक्त केली.

देवेगौडा-डाव्या पक्षांदरम्यान आज चर्चा
नवी दिल्ली, १५ मे/ पीटीआय

तिसऱ्या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (संयुक्त) चे प्रमुख देवेगौडा हे निवडणुकीनंतरच्या व्यूहरचनेसाठी उद्या डाव्या पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. चर्चेनंतर ते तिरुपतीला जाणार असल्याने दुसऱ्या दिवशी १८ मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला मात्र ते उपस्थित राहणार नाहीत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष या चारही डाव्या पक्षांच्या नेत्यांबरोबर १७ मे रोजी देवेगौडा चर्चा करणार आहेत. १८ मे रोजी देवेगौडा यांचा वाढदिवस असल्यामुळे ते दरवर्षी या दिवशी तिरुपती येथे दर्शनाला जातात. डाव्या पक्षांना या संबंधी माहिती देण्यात आली आहे आणि त्यांनी त्याला होकारही दिला आहे, अशी माहिती जनता दल (संयुक्त) चे प्रवक्ते दानिश अली यांनी सांगितले.