Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

सांगलीत उत्सुकता शिगेला
सांगली, १५ मे / प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून दावे- प्रतिदावे यामुळे सर्वाचेच लक्ष उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लागून राहिले आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत वाढलेले मतदान, काँग्रेसमधील बंडखोरी, त्याला भारतीय जनता पक्षाने दिलेला उघड पाठिंबा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची मिळालेली अप्रत्यक्ष साथ व काँग्रेसमधील एका गटाची नाराजी या सर्वाचा फायदा-तोटा कोणाला होणार याचीच चर्चा शुक्रवारी दिवसभर सुरू होती.

काळम्मावाडी कालवा भूसंपादनाचा वीस वर्षांनंतरही घोळ कायम
कागल, १५ मे / वार्ताहर

काळम्मावाडी धरणांतर्गत डाव्या कालव्याच्या किमी ३२ ते ५० या टप्प्यातील जमीन संपादनात झालेला घोळ प्रशासनाला सोडवता आलेला नाही. या प्रश्नाबाबत राज्यकर्ते, अधिकारी व स्थानिक कार्यकर्ते यांच्यात उदासिनता आहे. यामुळे पाणी नाही, सिंचन नाही आणि महसूलही नाही अशा अवस्थेतच डाव्या कालव्याची गोची झाली असून पाण्यासाठी आसुसलेल्या जमिनीला आणखी किती काळ वाट पाहावी लागणार आहे ?
दूधगंगा नदीवर काळम्मावाडी येथे १९७४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते धरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तब्बल वीस वर्षांनंतर हे धरण पूर्ण झाले.

उदयनराजे, शरद पवार यांच्या मताधिक्याबाबत उत्सुकता
सातारा, १५ मे/ प्रतिनिधी

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व पंतप्रधानपदाचे दावेदार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सातारा जिल्ह्य़ातील फलटण व माण विधानसभा मतदारसंघातून तर सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्या मताधिक्याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीतील समावेशाची शिफारस अधिवेशनापूर्वी करावी’
इस्लामपूर, १५ मे / वार्ताहर
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा म्हणून राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी करतानाच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी तशी शिफारस न केल्यास पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाचे कार्यकर्ते विधानभवनात घुसून कामकाज बंद पाडतील. शिवाय राज्यभर प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने तीव्र आंदोलन करतील, असा निर्वाणीचा इशारा दिला.

विस्कळित पाणीपुरवठय़ाच्या निषेधार्थ महाआघाडीच्या नगरसेवकाचेच आंदोलन
सांगली, १५ मे / प्रतिनिधी

सांगली शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महापालिका प्रशासन व पदाधिकारी करीत असतानाच सत्ताधारी विकास महाआघाडीचे नगरसेवक विजय हाबळे यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयातच धरणे धरत पाण्यासाठी आंदोलन करून सत्ताधारी गटाला घरचा आहेर दिला. खुद्द सत्ताधारी नगरसेवकावरच पाण्यासाठी आंदोलन करायची वेळ आल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

माळशिरसमध्ये वादळी पाऊस; फळबागांचे मोठे नुकसान
माळशिरस, १५ मे/वार्ताहर
तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने चारा पिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शुक्रवारी दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. गेल्या ५/१० दिवसांपासून तापमान वाढले असल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. अशातच शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रचंड वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. सुमारे अर्धा-पाऊण तासाच्या बेफाम वाऱ्यानंतर टपोऱ्या ठिपक्यांच्या पावसाच्या एक-दोन सरी झाल्या. विजांचा कडकडाट उशिरापर्यंत सुरू होता. या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा तर राहोच. उलट उष्णता वाढून पिके होरपळण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र मका, कडवळाची पिके जमिनदोस्त झाल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच जवळपास पक्व झालेल्या डाळिंबाच्या बागांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. बा. रा. जोशी यांचे निधन
इस्लामपूर, १५ मे / वार्ताहर
इस्लामपूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. बा. रा. तथा बाळकृष्ण रामचंद्र जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ८४ वर्षांचे होते. मूळचे वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे रहिवासी असणारे डॉ. जोशी हे इस्लामपुरात स्थायिक झाले होते. पुणे येथे राष्ट्रसेवा दलात सामील होऊन स्वातंत्र्य चळवळीत उतरलेल्या डॉ. जोशी यांनी १९४२ मध्ये इस्लामपूर तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभाग घेतला होता.
शहरातील भारतमाता वसतिगृह, नवभारत शिक्षण मंडळ व जिजामाता वसतिगृह यांच्या उभारणीत डॉ. जोशी यांचा वाटा होता. रुग्णसेवा मंडळ, समाज मंडळ व प्रभात मंडळ यांच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केले. वाळवा-शिराळा तालुका स्वातंत्र्यसैनिक सन्मान समितीचे ते पदाधिकारी होते. १९८७ ते १९९२ या काळात त्यांनी राजारामबापू पाटील सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. डॉ. जोशी यांच्या पश्चात डॉ. सदानंद, डॉ. संजय, सुना व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

सांगोला पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर, १५ मे/प्रतिनिधी

घरफोडीच्या गुन्हय़ात अटकेत असलेल्या एका आरोपीने पोलीस कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सांगोला पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादा ऊर्फ अंकुश मालोजी अवघडे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगोला) असे या आरोपीचे नाव आहे. अलीकडेच घडलेल्या एका घरफोडीच्या गुन्हय़ात दादा याचे नाव संशयित आरोपी निष्पन्न झाल्याने सांगोला पोलिसांनी त्यास अटक केली होती. त्यास पोलीस ठाण्यात कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु दुपारी त्याने नखाने किंवा अन्य कशाने तरी स्वत:च्या गळय़ावर जखम करून घेतली आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

वाढत्या दिवाळखोरीने व्यापारीवर्गात खळबळ
इचलकरंजी, १५ मे/वार्ताहर

सेठी नामक व्यापाऱ्याने ४० लाखांचे दिवाळे काढल्याचे प्रकरण ताजे असताना आता जैन नामक कापड व्यापाऱ्याने ३० लाखांचे दिवाळे काढल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. सध्या भोनेमाळ भागात राहाणारा हा कुलदीपक व्यापारी पूर्वी हत्ती चौक भागात राहात होता. यंत्रमागधारकांकडून थेट कापडाची खरेदी तो करीत असे. पूर्वी रोखीने व्यवहार असून, त्याने विश्वास संपादन केला होता. त्याने दिलेला धनादेश परत आल्याची चर्चा आहे. गेल्या चार दिवसांपासून तो बेपत्ता असल्याने व्यापाऱ्यांत घबराट उडाली आहे.