Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९


निवडणूक विशेष

पुन्हा काँग्रेसच!
पंधराव्या लोकसभेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये अगदी कटोकटीची लढत होईल या ढोबळ अंदाजावर उजाडलेल्या ‘१६ मे’ने हे भाकित सपशेल खोटे ठरवित काँग्रेस आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला सत्तास्थापनेचे दरवाजे सताड उघडले आहेत. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा काँग्रेसमध्ये गेल्या सुमारे दोन दशकांत विसरला गेलेला बहुमान मनमोहनसिंग यांना मिळणे हा आता फक्त उपचार राहिला आहे.

मनसेचा दणका
मुंबई, १६ मे / खास प्रतिनिधी

राज ठाकरे यांनी मुंबई -ठाण्यात एक हाती आणलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लाटेमुळे शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवारांच्या नाकातोंडात धक्कादायक पराभवाची धूळ गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठीच्या मुद्दय़ावर राज ठाकरे यांनी सातत्याने पुकारलेली आक्रमक आंदोलने मराठी मनाला विशेषत: तरुण वर्गाला भावल्याचे चित्र पुढे आले असून मनसे आणि प्रामुख्याने शिवसेना यांच्या राजकीय संघर्षांत विजयाचा लोण्याचा गोळा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या तोंडात अलगद पडला आहे !

काँग्रेसमध्ये उत्साह तर राष्ट्रवादीत निराशा !
मुंबई, १६ मे / खास प्रतिनिधी

राज्यात सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सर्वाधिक जागांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसला मागे टाकल्याचे दुहेरी समाधान काँग्रेसला लाभले आहे. शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावर भर देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने निकाल फारसा उत्साहवर्धक ठरलेला नाही.

‘त्यांच्या’करिता आणखी एक सामान्य दिवस
मुंबई, १६ मे/प्रतिनिधी

पंतप्रधानपदाचे उमेदवार अन् मंत्रीपदाचे दावेदार, शेअरबाजारातील सटोडिया आणि निवडणुकीवरील सट्टेबाज, सेफॉलॉजिस्ट अन् पत्रकार यांचे लक्ष लोकसभा निवडणुकीच्या आजच्या निकालावर लागले होते. मात्र त्याचवेळी हातावर पोट असलेल्या बहुसंख्य मुंबईकरांकरिता आणखी एक सामान्य दिवस होता.

संजय पाटील विजयी
मुंबई, १६ मे / प्रतिनिधी

मुंबई ईशान्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील हे जवळपास सात हजार मतांनी विजयी झाल्याचे वृत्त आहे. त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार किरीट सोमैय्या यांचा पराभव केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष शिशिर शिंदे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

युतीच्या बालेकिल्ल्याला मनसेचा सुरुंग
ठाण्यातून संजीव नाईक, कल्याणमधून आनंद परांजपे, भिवंडीतून सुरेश टावरे, तर पालघरमधून बळीराम जाधव विजयी

ठाणे, १६ मे /प्रतिनिधी

शिवसेनेच्या स्थापनेपासून बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चाखायला लावत राष्ट्रवादीने विजयी पताका रोवली असून, कल्याणमध्ये मात्र शिवसेनेने आपला गड कायम राखला. भिवंडीने नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली असून, पालघर मतदारसंघात मात्र प्रमुख राजकीय पक्षांना धक्का देत बहुजन विकास आघाडीने विजय मिळवला.

काँग्रेसची मुसंडी
काँग्रेस आणि भाजप याच दोन पक्षांमध्ये सत्तास्थापनेसाठी चुरशीची लढत होईल हा सर्वसाधारण अंदाज सपशेल फोल ठरवित काँग्रेसने देशभरात जोरदार मुसंडी मारली आहे. जवळपास सर्वच राज्यांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला मोठा आधार दक्षिणेकडील राज्यांनी दिला. केरळमध्ये डाव्यांचे वर्चस्व पूर्णपणे संपवत काँग्रेसने तेथे आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला असून आंध्र प्रदेशमध्ये आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे.

हे जिंकले..
गोवा

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे फ्रानिस्को सारदिन्हा यांनी भाजपचे नरेंद्र सावईकर यांचा १२,५१६ मतांनी पराभव केला.
लक्षद्वीप
कवराट्टी : लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पी. एम. हमदुल्ला हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. पूंकुंजी कोया यांचा २,१९८ मतांनी पराभव केला. २७ वर्षांचे हमदुल्ला हे माजी केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचे पुत्र आहेत. सईद यांनी १९६७ ते २००४ अशी सलग ३७ वर्षे येथून खासदारकीची निवडणूक जिंकली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत कोया यांनी त्यांच्या वर्चस्वाला धक्का देत अवघ्या ७१ मतांनी विजय मिळविला होता.

विदर्भात सेना भाजप सहा, काँग्रेस-राष्ट्रवादी चार जागी आघाडीवर
पटेल, दत्ता मेघे, मुत्तेमवार, वासनिक विजयाच्या मार्गावर

नागपूर, १६ मे / प्रतिनिधी

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात एकमेव जागा मिळवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यावेळच्या निवडणुकीत किमान चार जागा मिळतील, असे प्रारंभिक चित्र आहे. राष्ट्रवादीचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, सरचिटणीस मुकुल वासनिक आणि केंद्रीय पारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांचा संभाव्य विजेत्यांत समावेश असून विदर्भातील उर्वरित सहा जागी
सेना-भाजप युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

पुण्यात सुरेश कलमाडी आघाडीवर
पुणे, १६ मे / प्रतिनिधी

पुणे लोकसभा मतदार संघात सहाव्या फेरीअखेर कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी १६ हजार ९७३ मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या एकूण २१ फे ऱ्या होऊन अंतिम निकाल जाहीर व्हायला सायंकाळ उजाडणार आहे. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची आकडेवारी पाहता शिवाजीनगर, पर्वती आणि कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात कलमाडी यांना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली आहे.

पुणे जिल्ह्य़ात सुळे, आढळराव, बाबर यांची निर्णायक आघाडी
पुणे, १६ मे/ प्रतिनिधी

पुणे जिल्ह्य़ातील बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांता नलावडे यांच्यावर सहाव्या फेरीअखेर १ लाख २५ हजारांची आघाडी मिळविली होती. शिरूरमधील आमदार विरुद्ध खासदार लढतीत शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी सोळाव्या फेरीपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार विलास लांडे यांच्यावर तब्बल १ लाख ६० हजारांची आघाडी घेतली होती.

मंडलिक, शेट्टी आघाडीवर
दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीची पीछेहाट
पुणे, १६ मे/ प्रतिनिधी
पंधराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण महाराष्ट्रात पक्षाला समिश्र यश मिळाले आहे. साताऱ्यात विजय व माढा मतदारसंघात निर्णायक आघाडी मिळाली असली तरी हातकणंगले, कोल्हापूर या त्यांच्या घरच्या मतदारसंघातच पिछाडीवर होते. माढय़ात शरद पवार, सोलापूरमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, सांगलीत प्रतिक पाटील, हातकणंगलेत अपक्ष उमेदवार राजू शेट्टी आणि कोल्हापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सदाशिव मंडलिक यांनी मोठी आघाडी घेतली होती.

रामदास आठवलेंना पराभवाचा धक्का
नगरमध्ये कर्डिले-गांधींमध्ये चुरस
नगर, १६ मे/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील शिर्डी व नगर अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघांत भाजप-शिवसेना युतीने जोरदार मुसंडी मारली. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी निर्णायक आघाडी घेत काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्यावर मोठय़ा मताधिक्याने विजय नोंदवला.

मराठवाडय़ात युती ६, आघाडी २ जागी पुढे
औरंगाबाद, १६ मे/प्रतिनिधी-वार्ताहर

लोकसभेच्या आठही मतदारसंघांतील मतमोजणीचा प्राथमिक कौल पाहता काँग्रेसला थोडासा फायदा होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील हिंगोली मतदारसंघात पराभवाच्या वाटेवर आहेत. औरंगाबादमध्ये अटीतटीच्या लढतीत खासदार चंद्रकांत खैरे विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या मार्गावर आहेत.

मनमोहन सिंग यांनी साधली वाजपेयींशी बरोबरी
आघाडय़ांच्या राजकारणात सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळविणारे मनमोहन सिंग हे अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतरचे दुसरे नेते ठरणार आहेत. त्याचप्रमाणे गांधी-नेहरू घराण्याचे नसतानाही दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी येणारे ते काँग्रेस आघाडीतील एकमेव नेते ठरणार आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर १९७० पासून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी येणे एकाही नेत्याला जमले नव्हते. अटलबिहारी वाजपेयी यांनी मात्र १९९९ मध्ये सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळविले.

प. महाराष्ट्र व मराठवाडय़ात युती, आघाडीला संमिश्र यश
पुणे, १६ मे प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, उदयनराजे भोसले , सुप्रिया सुळे, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील , भाऊसाहेब वाकचौरे भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्येच दमदार आघाडी घेत विजयाकडे जोरदार मुसंडी मारली.

उत्तर महाराष्ट्रात भाजपची मुसंडी
नाशिकच्या लक्षवेधी लढतीत समीर भुजबळ विजयी

बहुरंगी लढती व परस्परांना छेद देणारी समीकरणे यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय गुंतागुंतीच्या पाश्र्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातल्या सहा मतदारसंघांपैकी तीन जागांवर आघाडी घेत भाजपने मुसंडी मारली असून काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात अस्तित्व उरले नसून नाशिकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारत मनसेने जोरदार धक्का दिला आहे.

खैरे यांनी गड राखला
मराठवाडय़ात युतीचे वर्चस्व कायम!

देशभरात आणि राज्यातही काँग्रेस आणि यूपीएचा वारू चौखुर उधळत असताना मराठवाडय़ाने मात्र भाजप - शिवसेना युतीच्या झोळीत आपले दान टाकले आहे. मराठवाडय़ातील आठपैकी तब्बल सहा जागा युतीला मिळाल्या असून नांदेड आणि उस्मानाबाद या फक्त दोन जागांवर अनुक्रमे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. औरंगाबाद येथील प्रतिष्ठेची लढत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी जिंकली असून परभणी येथे दुधगावकर आणि हिंगोली येथे सुभाष वानखेडे विजयी झाले आहेत. तर जालन्यातून रावसाहेब दानवे, लातूरमधून डॉ. सुनील गायकवाड विजयी झाले आहेत. बीडमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपचे सरचिटणीस गोपीनाथ मुंडे विजयी झाले आहेत.

आघाडी झाल्याचा फायदा झाला - मुख्यमंत्री
अजून चांगल्या समन्वयाची पवारांना अपेक्षा
मुंबई, १६ मे / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निवडणुकीत झालेल्या आघाडीचा फायदा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. काँग्रेसला १५पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे नेतृत्व व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने केलेला पारदर्शक कारभार याचा फायदा झाला. राज्यातील जनतेने विकासाच्या कामाला पसंती दिली, अशीही प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली. राज्यात आघाडीला मिळालेल्या चांगल्या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले. काँग्रेस व राष्ट्रवादीत अजून चांगला समन्वय होणे आवश्यक होते अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा फायदा झाल्याचेही पवार म्हणाले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी