Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

धकधक..धडधड
सतीश स. कुलकर्णी

निकाल! तो कधी लागणार हे माहीत असते; काय लागणार याची मात्र कल्पना नसते; अजिबात! आत्मविश्वास असतो. जिंकण्याचा; विजयाचा गुलाल माखण्याचा; परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा. पण गुणपत्रिका हाती येत नाही, तोवर काही खरे नाही. ‘फर्स्ट क्लास’चा आत्मविश्वास बाळगणाऱ्याची दांडी उडते आणि नापासाची खात्री असल्यामुळे निकाल पाहायलाही न गेलेल्या पास झाल्याबद्दल पेढे वाटावे लागतात. निकालच तो. काहीही लागणार, याची खात्रीच असते मनोमनी.

आवळ्यांचे अंबाबाईला, गायकवाडांचे त्रिधाराला साकडे
लातूर
प्रदीप नणंदकर

लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम २३ एप्रिलला संपली. सर्वच उमेदवारांची १५ दिवस प्रचंड धावाधाव झाली. शाळा सुटल्यानंतर घरी येणारी लहान मुले आपल्या पाठीवरील दप्तरांचे ओझे उभ्याउभ्याच फेकून देऊन कशी खेळायला धूम ठोकतात तशीच मानसिक अवस्था उमेदवारांची झाली होती.

देवदर्शन, सहल आणि कुटुंबाबरोबर
औरंगाबाद
प्रमोद माने

निकालाला आता अवघे काही तासच उरले आहेत. सर्वाना उत्सुकता आहे ती त्याचीच. प्रत्येक जण आपापल्या परीने आडाखे बांधत असले तरी निकालाचे भाकीत ठामपणे कोणीही करत नाही. शिवसेनेचे उपनेते आणि गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत विजयी ठरलेले चंद्रकांत खैरे मुळातच भाविक आहेत. शिवसेना, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या उमेदवारांसह २२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवारांनी मतदानानंतर आपला वेळ देवदर्शनात किंवा आपल्या कुटुंबाबरोबर घालविला. काही उमेदवारांनी तर निवडणुकीच्या काळात साथ देणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सहलही काढली.

‘भगवान भरोसे!’
नांदेड
गणेश कस्तुरे

नांदेड मतदार-संघात एकूण २२ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्याच उमेदवारांमध्ये जबरदस्त चुरस असल्याने या दोन्ही पक्षांचे उमेदवार मतदानानंतर देव.. देव करीत होते, असे सांगण्यात आले. एका पक्षाच्या उमेदवाराने तर चक्क गेल्या महिन्याभरापासून आपल्या निवासस्थानी ‘महामृत्युंजय’चा जप करवून घेतला. उघडपणे विजयाची जाहीर खात्री देणारे उमेदवार अखेपर्यंत ‘भगवान भरोसे’ असल्याचे स्पष्ट झाले.

देवदर्शन, लग्नसमारंभ, मुंबईची वारी.. इत्यादी इत्यादी
जालना
लक्ष्मण राऊत

प्रचाराच्या काळात आणि मतदानाच्या दिवशीही असलेले रखरखीत ऊन त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, मानपान इत्यादीमुळे त्रस्त झालेल्या उमेदवारांना कधी एकदा मतदान संपते असे झालेले! मतदानाच्या दिवशी दुपारनंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे जालन्यातच होते. मतदानाची वेळ संपल्यानंतर त्यांनी पक्षाचे जिल्हा कार्यालय गाठले. तेथे उपस्थित कार्यकर्त्यांकडून मतदानाबाबतची माहिती घेतली. ठिकठिकाणाहून येणारे दूरध्वनी घेत नंतर ते भोकरदनला स्वत:च्या घरी पोहोचले!

घातवार; पण कोणासाठी?
उस्मानाबाद
सुहास सरदेशमुख

शनिवार घातवार! पण कोणासाठी? उमेदवारांचे १५ दिवस चिंतेत गेले. आज मतमोजणी. धकधक आणि धडधड संपविणारा दिवस. सकाळी ११ वाजल्यानंतरची वेळ चांगली, मुहूर्तही चांगला (संदर्भ दाते पंचांग) मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची मनोवृत्ती प्रफुल्लित. प्रमुख दोन्ही उमेदवारांनी ताण कमी करण्यासाठी खासे प्रयत्न केले. मतदान संपले आणि एक उमेदवार देवदर्शनाला गेले; दुसरे ठाण्यात गेले भाषण ठोकायला. सकाळी सात ते रात्री दीड-दोन वाजेपर्यंत अहोरात्र काम, समस्या सांगून सतत हात पसरून उभारलेल्या माणसांचा संपर्क, तेच तेच चेहरे पाहून वैतागलेले नेते १५ दिवस फिरून आले. आता निकालासाठी तयार आहेत. आत्मविश्वासाचा बुडबुडा अजूनही कायम आहे.

गुरुला आत्मविश्वास, शिष्याला खात्री!
परभणी
आसाराम लोमटे

असे म्हणतात की, विजयाचा अंदाज येऊ शकतो, पण समोर येऊन ठाकलेला पराभव ओळखता येत नाही! काही तासांत हा हार-जितीचा फैसला होईल तेव्हा कोणाच्या चेहऱ्यावर मुकुट आणि कोणाच्या कारकिर्दीवर पराभवाचे पांढरे निशाण हेही साऱ्यांनाच कळून चुकेल. गुरू-शिष्यात झालेली अटीतटीची लढत कोणत्या निकालाला जन्म देईल याकडे सर्वाचेच कान आणि डोळे लागले आहेत. अगदी उमेदवारही तितकेच उत्सुक आहेत. शिवाय त्यांनाही आत्मविश्वास आहेच!

प्रचार आणि लग्नसमारंभ
बीड
वसंत मुंडे
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे इतर राज्यात पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचाराला गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांनी लग्नसमारंभांना हजेरी लावून प्रचाराच्या दरम्यान राहिलेल्या भेटीगाठी पूर्ण केल्या. मतमोजणीच्या आदल्या दिवशी, आज दोघांनाही खात्री होती; आपल्या विजयाची!

कमालीची अस्वस्थता
हिंगोली
तुकाराम झाडे

मतदान झाले, त्याला उद्या (शनिवारी, दि. १६) एक महिना होईल. उद्याच निकाल लागेल. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यांनी एवढा महिनाभर काय केले? काही प्रमुख उमेदवारांनी इतराच्या मतदारसंघा७त निवडणूक प्रचार केला. काहींनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या तर कोणी आपल्या मूळ व्यवसायात वेळ घालवला. उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आता काही तासांतच लागणार आहे. प्रमुख उमेदवारांच्या मनात कमालीची अस्वस्थता आहे.

कोण जिंकणार? आज कळणार!
चोख बंदोबस्तात मतमोजणी

औरंगाबाद, १५ मे/प्रतिनिधी

सर्वानाच वेध लागलेली मतमोजणी उद्या (शनिवारी) होत आहे. दिवसागणिक उत्सुकता ताणली गेल्याने निकाल ऐकण्यासाठी अनेक जण एकत्र येतील अशी शक्यता गृहीत धरून मतमोजणी होत असलेल्या किले अर्क येथील कला महाविद्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आज निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. मतमोजणीची सर्व प्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत पूर्ण होईल, असे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.

‘इस प्रेमग्रंथ के पन्नों पर..’
विवाहापूर्वी एकदा दोघांनी नागपंचमीच्या आदल्या रात्री एकमेकांना मेंदी काढली, तेव्हा त्यांच्या हातावरील मेंदी जास्त रंगली होती. कारण तिचं तर्कशास्त्र होतं, ‘ज्यानं काढलेली मेंदी जास्त रंगते, त्याचं प्रेम अधिक असतं.’ तिच्या प्रेमाला तर तोड नव्हतीच, पण चळवळ व वैचारिक लेखनात रमणारे साळुंकेंचंही पत्नीप्रेम तेवढंच उत्कट होतं. पुढे विवाहानंतर त्यांचा मेंदी काढायचा हा सिलसिला कायम राहिला. जणू काही मेंदी हा दोघांना एकत्र आणणारा मजबूत दुवा होता त्यांच्या पत्नीच्या लेखी.

नांदेडमध्ये दगडफेक; अफवांचे पेव
नांदेड, १५ मे/वार्ताहर

सुमारे एक कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचा रंग उडाल्याने शहराच्या काही भागांत संध्याकाळी तणाव निर्माण झाला. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी किरकोळ दगडफेक केल्याने शहरात अफवांचे पेव पसरले होते. सुदैवाने नंतर कोणत्याही अनुचित घटनेची नोंद झाली नाही.

एकाच वाहिनीतून एक दिवसाआड पाण्याचा प्रयोग उन्हाळ्यातच करणार
औरंगाबाद, १५ मे/प्रतिनिधी

एक्सप्रेस वाहिनीतून एक दिवसाआड अनुक्रमे सिडको आणि शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग भर उन्हाळ्यातच करण्यात येणार असल्याचे आयुक्त वसंत वैद्य यांनी म्हटले आहे. हा प्रयोग करताना काही अडचण आली तर किमान एक आठवडा औरंगाबादकरांना पाण्यापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता तांत्रिक अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

दोन पोलीस शिपायांना लाच घेताना पकडले
नांदेड, १५ मे/वार्ताहर

खोटय़ा गुन्ह्य़ात अडकविण्याची धमकी देऊन चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन पोलीस शिपायांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी पकडले. पोलिसांनी सांगितले की, लोहा तालुक्यातील डोणवाडा येथील माधव केकाटे यांचा २९ मे २००८ रोजी अपघात झाला. यात त्यांची पत्नी मृत्युमुखी पडली व ते गंभीर जखमी झाले. याबाबत सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विजेचा धक्का बसून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
परभणी, १५ मे/वार्ताहर
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे एकाच कुटुंबातील तिघांचा आज रात्री विजेच्या धक्क्य़ाने मृत्यू झाला. धुणे वाळत घालण्याच्या तारेमध्ये वीजप्रवाह उतरल्याने ही दुर्घटना घडली. एक सोळा वर्षांचा मुलगा सुदैवानेच बचावला. मार्गारथम तैवार (वय ५५), सोमनी मार्गारथम (वय ४०) व मायालखन मार्गरथम (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. मार्गारथम यांच्या घरासमोरील विजेच्या खांबाच्या ‘अर्थिग’चा वीजप्रवाह त्यांच्या घरात असलेल्या धुणे वाळत घालण्याच्या तारेत उतरला. त्यामुळे हा अपघात झाला. मूळचे तामिळनाडूतील मार्गारथम कुटुंब येथे ‘मुरुक्कम’ (दाक्षिणात्य गोड चकली) तयार करण्याचा व्यवसाय करीत होते.कुटुंबप्रमुख मार्गारथम तैवार यांनी तारेला पहिल्यांदा हात लावला. ते चिकटले व त्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या सोमनी व मायालखन यांनाही विजेचा धक्का बसला.

विजयी मिरवणुकीबाबत परिस्थिती पाहून निर्णय
औरंगाबाद, १५ मे/प्रतिनिधी
उद्या निकालानंतर खासदारास विजयी मिरवणुकीस परवानगी देण्याबाबतचा निर्णय अद्यापि पोलीस प्रशासनाने घेतलेला नाही. उद्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निकालाबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहे. शिवाय निकाल लागल्यानंतर काय होईल यावरही चर्चा सुरू आहे. पोलिसांपर्यंत ही चर्चा गेली आहे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर काय परिस्थिती असेल ते पाहूनच विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीस परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी सर्व तयारी केली आहे.

आता कुत्र्यांनाही मोफत लस टोचणार
औरंगाबाद, १५ मे/प्रतिनिधी

औरंगाबाद शहरात श्वानदंशामुळे दीड वर्षांच्या अंतराने दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. कुत्रा चावल्यानंतरची लस यापूर्वी मोफत करण्यात आली होती. आता कुत्र्यांना देण्यात येणारी ‘अँटी रेबीज’ची लसही मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोंदणीकृत पाळीव कुत्र्यांना ही लस पालिकेच्या पशू आरोग्य केंद्रात मोफत देण्यात येणार असल्याचे महापौर विजया रहाटकर यांनी सांगितले. कुत्रा नोंदणीकृत असणे एवढीच यासाठी अट असून नागरिकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांची नोंद पालिकेकडे करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. श्वानदंशामुळे सलग दोन मृत्यू झाल्यानंतर कुत्रे पकडणे आणि त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची मोहीम पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. पालिकेकडे रेबीजच्या लसचा साठा मुबलक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पैशांसाठी ३३ वर्षांच्या विवाहितेला हाकलले
औरंगाबाद, १५ मे/प्रतिनिधी
रिक्षा खरेदी करण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणावेत म्हणून ३३ वर्षांच्या विवाहितेचा छळ केला आणि जिवे मारण्याची धमकी देऊन तिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. ही घटना जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरिफ कॉलनीत घडली. शहेनाज बेगम मोहम्मद जावेद असे या विवाहितेचे नाव आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून पती मोहम्मद जावेद मोहम्मद कुर्दूस, सासू जुबुनिस्सा बेगम, रहिमान यांच्याविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

८७ हजार पळविले
औरंगाबाद, १५ मे/प्रतिनिधी

दुकानात पाईप खरेदी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरटय़ांनी ८७ हजार ५०० रुपये रोख आणि कगदपत्रे असलेली पिशवी पळविली. काल दुपारी २ च्या सुमारास शहागंज भागात घडली.

सोनपेठमध्ये पावसाने दिलासा
सोनपेठ, १५ मे/वार्ताहर
गुरुवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाच्या तापमानामध्ये मोठी वाढ झाली होती. वातावरणातील तापमान कमाल ४३ ते ४४ व किमान ३५ ते ३६ अंशापर्यंत पोचले होते. या उन्हाळ्यामध्ये किरकोळ सरींचा अपवाद वगळता अवकाळी पाऊस झाला नाही. मात्र गुरुवार दुपारपासूनच जोरदार वारे सुरू झाल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली. सायंकाळी जोरदार वारे व मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यामुळे रात्रीच्या तापमानामध्ये ३२ अंशापर्यंत घट झाली. या पावसामुळे कित्येक दिवसानंतर शीतलतेचा अनुभव मिळाला.