Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

प्रादेशिक

आज भोपळा फुटणार
मुंबई, १५ मे/प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभेत सरकार कुणाचे स्थापन होणार या गेल्या पाच वर्षांतील बहुधा सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर कदाचित उद्या दुपापर्यंत उलगडू लागलेले असेल. अर्थात ही शक्यताच आहे. कारण कदाचित या प्रश्नाचा गुंता उद्या अधिकच वाढूही शकतो. एकप्रकारे शनिवार, १६ मे हा दिवस अनंत शक्यता पोटात घेऊन उजाडणार आहे आणि त्या दृष्टीने हा इतिहासातील एक ठळक दिवस म्हणून अजरामर ठरणार आहे.

डाव्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार मायावतीच!
मुंबई, १५ मे/ प्रतिनिधी

उद्या दुपापर्यंत कुणाला किती जागा हे स्पष्ट झाल्यावर तळ्यात - मळ्यात करणारे अनेकजण आपापल्या जागा शोधून त्या - त्या गटात स्थिरस्थावर होतील. डावे पक्ष आणि मायावती हे उद्याच्या खेळातील काँग्रेस व भाजपानंतरचे सगळ्यात मोठे प्लेयर्स असतील असे आता दिल्लीतील सगळेच स्पीनडॉक्टर्स मान्य करायला लागले असतील.

टाटा कर्करोग रुग्णालयातील १०० कोटींचा घोटाळा उघड!
सहा अधिकाऱ्यांना अटक, निवासस्थानी सीबीआयचे छापे

मुंबई, १५ मे / प्रतिनिधी

कर्करोगावरील उपचारासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातील सुमारे १०० कोटी रुपयांचा औषधांचा घोटाळा उघड करण्यात केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना यश आले असून या प्रकरणी या रुग्णालयाशी संबंधित सहाय्यक महिला अधीक्षकासह सहा जणांना आज अटक करण्यात आली.

या जन्मातच भरपूर मिळाले, आता पुनर्जन्म नको - लता मंगेशकर
मुंबई, १५ मे / प्रतिनिधी

या जन्मातच इतके काही भरपूर मिळाले आहे की, आता पुनर्जन्म घेण्याची आपल्याला अजिबात गरज वाटत नाही, असे प्रतिपादन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आज केले. ‘लता मंगेशकर.. इन हर ओन व्हॉईस’ या नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन वरळीच्या मे फेअर सभागृहात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी लतादीदी बोलत होत्या. तुम्हाला पुनर्जन्म मिळाला तर पुन्हा कोण व्हायला आवडेल, यावर लतादीदींनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले.

प्रदीप शर्मांचा पुनर्प्रवेश टाळण्यासाठी पुन्हा आयपीएस लॉबी सरसावली!
मुंबई, १४ मे / प्रतिनिधी

दाऊद, छोटा शकील, छोटा राजन आदी टोळींचे ११२ हून अधिक गुंड चकमकीत ठार करणारे पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची बडतर्फी रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा ‘मॅट’चा स्पष्ट आदेश असतानाही त्याची अमलबजावणी होऊ नये या दृष्टिने शर्मा यांच्या विरोधात असलेली आयपीएस लॉबी सरसावल्याची चर्चा पोलीस वर्तुळात ऐकायला मिळते. राज्याचे माजी पोलीस महासंचालक अनामी रॉय यांची नियुक्ती रद्दबातल करण्याच्या मॅटच्या आदेशाला राज्य शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

कसाबच्या पोलीस जबाबाबाबत साक्षीदाराची विसंगत साक्ष
मुंबई, १५ मे / प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्या पोलीस जबाबाबाबतची विसंगती आज कसाबचे वकील अब्बास काझ्मी यांनी विशेष न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्या निदर्शनास आणली. अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी आज नायर रुग्णालयातील तीन साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या. यापैकी डॉ. योगिता डेलकर यांनी कसाब आणि ठार झालेला दहशतवादी अबू इस्माईल यांची सर्वप्रथम तपासणी केली होती. तर डॉ. वेंकट राममूर्ती आणि डॉ. विकासकुमार केसरी यांनी कसाबवर उपचार केले होते.

काँग्रेस १२ ते १५; तर राष्ट्रवादीचा १२ जागांचा अंदाज
मुंबई, १५ मे / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत चांगल्या यशाबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आशावादी आहेत. राष्ट्रवादीचे नेते गोविंदराव आदिक तर १६ जागा मिळतील असा दावा करीत आहेत. तर काँग्रेसला १२ ते १५ जागा मिळतील असा काँग्रेस नेत्यांचा अंदाज आहे. लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादीने प्रचारात भर दिला होता. राज्यात २२ जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला चांगले यश मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शहरातील म्हाडावासीय कोर्टात जाण्याच्या तयारीत
मुंबई, १५ मे / प्रतिनिधी

उपनगरातील रहिवाशांसाठी एक निर्णय लागू करताना शहरातील रहिवाशांना डावलणाऱ्या म्हाडाच्या नव्या ठरावाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याची जोरदार तयारी शहरातील म्हाडावासीयांनी सुरू केली आहे. विकास नियंत्रण नियमावली ठराव करून बदलता येणार नाही, असा या रहिवाशांचा दावा आहे. काही ठराविक विकासकांच्या फायद्यासाठी सर्व रहिवाशांना वेठिस धरण्याचा प्रकार योग्य नव्हे, असेही या रहिवाशांचे म्हणणे आहे.

पालिकेचे १०० कोटी गाळात?
मुंबई, १५ मे / प्रतिनिधी

पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ काढण्यासाठी महानगरपालिका सुमारे १०० कोटी रुपये खर्च करीत आहे. २० मेपर्यंत गाळ काढण्याचे आदेश पालिकेने ठेकेदारांना दिले होते. मात्र या मुदतीत हे काम पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून ठेकेदारांनी आता २५मेपर्यंतची वेळ मागितली आहे. शेवटच्या टप्प्यात नालेसफाईचा फार्स फक्त केला जाईल , अशी शंका व्यक्त करण्यात येत असल्याने पालिकेचा मोठा निधी ‘गाळा’त जाण्याची शक्यता आहे.

वांद्रे स्कायवॉकचा विस्तारित भाग पादचाऱ्यांसाठी खुला
मुंबई, १५ मे / प्रतिनिधी

वांद्रे पूर्व येथे उभारलेल्या शहरातील पहिल्या स्कायवॉकचा वांद्रे कोर्टापर्यंतचा विस्तारित भाग आज एमएमआरडीएने कोणताही गाजावाजा न करता वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे प्रवाशांना थेट वांद्रे कोर्टापर्यंत स्कायवॉकने जाता येईल आणि अनंत काणेकर मार्गही ओलांडणे शक्य होईल. दररोज एक लाखाहून अधिक पादचारी त्याचा वापर करतील, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’
मुंबई, १५ मे/प्रतिनिधी

यंदाच्या अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत एस. एस. सी. बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’चा पर्याय देण्याच्या अधिकाऱ्यांचा मानस आहे, असे खात्रीलायकरीत्या समजते. एस. एस. सी. बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ज्या पाच विषयात सर्वाधिक गुण आहेत, त्या पाच विषयांच्या गुणांची बेरीज गृहित धरून प्रवेश द्यावा, हा विचार बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रबळ होत आहे. राज्य शासनाने अकरावीच्या प्रवेशासाठी गेल्या वर्षी जे पर्सेटाईल सूत्र लागू केले होते, ते उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्याला पर्यायी उपाय काय, हा पेच यंदा निर्माण झाला आहे. सी. बी. एस. ई. आणि आय. सी. एस. ई.च्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने एस. एस. सी. बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळत असल्याने अकरावीच्या प्रवेशात सर्वाना समान न्याय मिळावा या हेतूने पर्सेटाईल सूत्र लागू करण्यात आले होते, ज्याला पुढे अन्य बोर्डाच्या प्रतिनिधींनी आव्हान दिले होते. आता नव्याने समानीकरणाचा फॉम्र्युला आखायचा, तर बराच उशीर झाला आहे आणि नवे सूत्र आखले नाही तर यंदा एस. एस. सी. बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागणार- अशा कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी हा ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’चा पर्याय दिला जाण्याची दाट शक्यता आहे. कोणत्या पाच विषयांचे मार्क धरायचे ते प्रत्येकाच्या गुणपत्रिकेनुसार ठरविले जाईल.
आवाहन
‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ हा पर्याय आपल्याला योग्य वाटतो का? हा पर्याय फक्त यंदाच्या वर्षांपुरता असावा, की कायम? असा पर्याय कायम दिल्यास कोणते दूरगामी परिणाम होतील? समानीकरणाचा कोणता उपाय योग्य आहे?- आपली मते जास्तीत जास्त १०० शब्दांत २१ मेच्या आत कळवा. पत्ता- ‘लोकसत्ता : के. जी. टू. पी. जी’ एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१. फॅक्स- ०२२-२८२२१८७

भंगारवाल्यांना सोडले आणि ‘स्लमडॉग’वर बुलडोझर !
मुंबई, १५ मे / प्रतिनिधी

‘स्लमडॉग’मधील बाल कलाकार (सलीम)अझरुद्दीन याची वांद्रे रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेली झोपडी पालिकेने तोडली. मात्र याच ठिकाणी असलेल्या भंगारवाल्यांवर पालिकेने काहीच कारवाई केली नाही. विशेष म्हणजे अझरुद्दीनची झोपडी १९९५च्या पूर्वीची असल्याचे पुरावे आहेत. नोटीस न देता आणि पर्यायी व्यवस्था न करता त्याची झोपडी तोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अझरुद्दीनची झोपडी असलेला हा भूखंड उद्यानासाठी राखीव आहे. या ठिकाणी असलेल्या नाल्याच्या आणि जलवाहिनीच्या शेजारी अझरुद्दीनची झोपडी आहे. मंगळवारी स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी वायकर यांनी या झोपडय़ा तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने गुरुवारी या झोपडय़ा तोडल्या. मात्र अझरुद्दीनच्या आईने त्यांच्याकडे १९९५च्या पूर्वीची मतदानाची पावती असल्याचा पुरवा पालिका अधिकाऱ्यांना दाखविला. यापूर्वीही त्यांनी हा पुरवा सादर केला होता. तरीही त्याच्या झोपडीवर बुलडोझर चालविण्यात आला. देशाचे नाव जगभर गाजविणाऱ्या एका बाल कलाकारला आपण साधा निवाराही देऊ शकत नाही, अशी खंत अनेकजण व्यक्त करीत आहेत.

पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत ५५ तालिबानी ठार
इस्लामाबाद, १५ मे/पीटीआय

स्वात व परिसरामध्ये पाकिस्तानी लष्कराने सुरु केलेल्या कारवाईत ५५ तालिबानी ठार झाले. तालिबानींनी घुसखोरी केलेल्या मिंगोरा शहराच्या वेशीवर पाकिस्तानी रणगाडे धडकले असून, जोरदार चढाई करण्यासाठी लष्कर सज्ज झाले आहे. दरम्यान मिंगोरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सुकर व्हावे यासाठी या परिसरातील जमावबंदी उठविण्यात आली आहे. या जमावबंदीचा फायदा घेऊन तालिबानीही मिंगोरातून पलायन करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्याला कोणीही ओळखू नये यासाठी तालिबानींनी डोईवरचे लांब केस कापले आहेत तसेच दाढीही काढून टाकली आहे. तालिबानींना ओळखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे जेणेकरून या दहशतवाद्यांना अटक करणे शक्य होईल असे आवाहन पाकिस्तानी लष्कराने केले आहे.मिंगोरा परिसरातील जमावबंदी आज सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी २ पर्यंत उठविण्यात आली होती. या शहरामध्ये तालिबानींनी खंदक खणून मोर्चेबांधणी केली आहे.

दिल्लीतील निर्णयप्रक्रियेत जोशी यांना प्राधान्य
मुंबई, १५ मे/प्रतिनिधी

लोकसभा निकालानंतर दिल्लीत होणाऱ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्याकरिता व शिवसेनेची भूमिका रालोआला कळविण्याकरिता शिवसेना नेते मनोहर जोशी यांची शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. लोकसभा निकाल लागल्यानंतर जोशी हे उद्या सायंकाळी दिल्लीत जातील. तेथेच ते पुढील पाच ते सहा दिवस वास्तव्य करणार आहेत. केंद्रात रालोआप्रणीत सरकार येणार असल्यास दिल्लीतील घडामोडींबाबत जोशी कार्याध्यक्ष उद्धव यांच्याशी चर्चा करतील व त्यांच्या आदेशानुसार शिवसेनेची भूमिका लालकृष्ण अडवाणी यांना कळविणार आहेत.

मलेरिया निर्मूलनासाठी पालिकेची मोहीम
मुंबई, १५ मे / प्रतिनिधी

अनेकदा फवारणी करूनही शहरातील काही ठिकाणी मच्छरांचा नायनाट होत नसल्याने मलेरियांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता मलेरिया निर्मुलन मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईत मलेरियाचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत. शहरात ४४ ठिकाणी बांधकामाचे मोठे प्रकल्प सुरू असून यामुळे मलेरिया वाढत आहे. परप्रांतातून येणारे मजूर मलेरियाचे वाहक आहेत, असे पालिकेचे आरोग्य अधिकारी जयराज ठाणेकर यांनी सांगितले. गेल्या महिन्याभरात पालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणानुसार डांसाची पैदास जास्त होत असलेली २२६ ठिकाणे आहेत. यात शहारत १२७, पश्चिम उपनगरात १२८ तर पूर्व उपनगरात ७२ ठिकाणे आहेत. अतिसंवेनशील ठिकाणांची संख्या १३४ असून शहरात ६२, पश्चिम उपनगर ५९ तर पूर्व उपनगरात १३ ठिकाणे आहेत. पालिकेच्या मलेरिया निर्मुलन पथकाने अनेकदा फवारणी केल्यानंतरही डास पैदास होत असून अशी शहरात ४८४, पश्चिम उपनगर ५९७ तर पूर्व उपनगर २७३ ठिकाणे आहेत, असे ठाणेकर यांनी सांगितले.

ठामपाचा कनिष्ठ अभियंता निलंबित
ठाणे, १५ मे /प्रतिनिधी

घरखरेदीच्या व्यवहारात मिळालेला चेक न वटल्याने प्रकाश गांगुर्डे याला मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेला पालिकेतील कनिष्ठ अभियंता सुनील जाधव याला आज निलंबित करण्यात आले. जाधव सध्या वर्तकनगर प्रभाग समितीत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. प्रकाश गांगुर्डे यांनी त्याच्याकडून विकत घेतलेल्या घरापोटी १२ लाखांचा धनादेश दिला होता. मात्र हा चेक वटला नाही म्हणून जाधव याने गांगुर्डे यांना मारहाण केली. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आज पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी जाधव याच्या निलंबनाचे आदेश दिले. दरम्यान मुंब्रा येथे झालेल्या एका व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी परवतसिंग चुरावत या इसमास अटक केली. परवतसिंगने तीन दिवसांपूर्वी त्याच्या मुंब्रा येथील चुलत भावाची हत्या केली होती. या हत्येनंतर मुंब्रऱ्यातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. मालमत्तेच्या वादावरून ही हत्या झाली.