Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

पांढरी पुलावरील दोन अपघातांत ४ ठार
सात वाहनांचे नुकसान
सोनई, १५ मे/वार्ताहर

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीच्या पुलावर आज २ वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार झाले, तर ७ वाहनांचे नुकसान झाले. पहिला अपघात पहाटे ४ वाजता पुलावर अचानक थांबलेल्या मालमोटारीवर पाठीमागून येणारी दोन वाहने आदळून दोन चालक व एक प्रवासी असे तिघे ठार झाले. त्यानंतर सकाळी ९ वाजता झालेल्या दुसऱ्या अपघातात मालमोटारीची धडक बसून एकजणा ठार झाला.

मतमोजणीची जय्यत तयारी; दुपारी एकपर्यंत निकाल अपेक्षित
नगर, १५ मे/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील नगर व शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व कोण करणार हे गेले २२ दिवस बंद असलेले रहस्य उद्या (शनिवारी) खुले होईल. दुपारी एक वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. शिर्डीची १ हजार ५७१, तर नगरची १ हजार ८७१ मतदान यंत्रे आहेत. त्यात २३ एप्रिलला एकूण ३२ (नगरचे १५ व शिर्डीचे १७) उमेदवारांचे भवितव्य बंद झाले आहे.

शेलार यांचे उपोषण मागे
नगर, १५ मे/प्रतिनिधी

पिंपळगाव जोगे धरणातून दि. २०ला कुकडीचे आवर्तन सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे मंत्री रामराजे निंबाळकर यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी चार दिवसांपासून सुरू केलेले उपोषण मागे घेतले. उपोषणामुळे श्री. शेलार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तथापि, कुकडीचे आवर्तन सोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी शेलार यांनी कर्जतचे प्रांताधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण सोडले.

घाईने होतो घात..
अगदी सकाळी सकाळी क ोणतंही वृत्तपत्र उघडलं की अपघाताच्या बातम्या हमखास वाचायला मिळतात. दूरचित्रवाणीवर बातम्यांचं कोणतंही चॅनेल लावलं की फूटलाईनवर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्याच बातम्या झळकत असतात. कामाच्या निमित्ताने वर्षांतले ८ ते १० महिने रस्त्यावरच म्हणजे प्रवासात मी असते. त्यामुळे अपघाताची आणि अपघात घडून गेल्यानंतरची दृश्यं मला सततच पाहावी लागतात. सायकल, मोटरसायकल, मोठमोठे कंटेनर अशा सर्व प्रकारच्या वाहनांचे टकराव पुष्कळदा डोळ्यांदेखत घडलेत. प्रत्येक वेळी मला अपघातात छिन्न-विछिन्न झालेल्यांच्या घरच्या-आसपासच्या माणसांचे आकांत नजरेसमोर येत राहतात.

पाणीप्रश्नी सोमवारपासून
प्रभाग समितीनिहाय बैठका
नगर, १५ मे/प्रतिनिधी

शहर पाणीपुरवठय़ातील अडचणींची माहिती घेण्यासाठी मनपा आयुक्त कल्याण केळकर सोमवार (दि. १८)पासून प्रभाग समितीनिहाय बैठका घेणार आहेत. प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागांच्या नगरसेवकांना बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे.

कुकडीचे आवर्तन अखेर २० मेपासून
पुण्याच्या बैठकीत निर्णय
श्रीगोंदे, १५ मे/वार्ताहर

कुकडीच्या पाण्यासाठी तालुक्यात सुरू असलेला नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा संघर्ष अखेर आज संपला. कुकडीतून येत्या २०मेपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय पुण्यातील बैठकीत झाल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार यांचे उपोषण सुटले. शेलारांची झुंज, कुंडलिकराव जगतापांचा संघर्ष व वनमंत्री बबनराव पाचपुते यांचे प्रयत्न या त्रिवेणी संगमाचा परिपाक आवर्तन सोडण्यास कारणीभूत असला, तरी शेलारांच्या उपोषणाचा रेटा वस्तुस्थितीची जाणीव करून देणारा ठरल्याने हा निर्णय सरकारला घ्यावा लागला.

व्यापाऱ्याची चारलाख ठेवलेली बॅग लांबविली
राहाता, १५ मे/वार्ताहर
अहमदाबाद येथील व्यापाऱ्याची शिर्डी ते मनमाड प्रवासादरम्यान ३ लाख ९५ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरीस गेली. मनमाड पोलिसांनी फिर्याद घेण्यास नकार दिल्याने या व्यापाऱ्याने अखेर येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार शिर्डी पोलिसांनी दोन जीपचालकांविरुद्ध आज चोरीचा गुन्हा दाखल केला.

१८७ निर्मलग्रामांना पुरस्कारापोटी २ कोटी २३ लाख
स्वच्छतेत सातत्य न राखल्यास रक्कम परत!
नगर, १५ मे/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील निर्मलग्राम पुरस्कार मिळवलेल्या १८७ ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कारापोटी २ कोटी २३ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. यातील ८ ग्रामपंचायतींना पुरस्कारातील काही टक्केच निधी मिळणार आहे. त्यांनी सहा महिने स्वच्छतेबाबत सातत्य ठेवल्यास त्यांना पुरस्काराची उर्वरित रक्कम दिली जाईल; अन्यथा दिलेली रक्कम परत घेण्यात येईल.

श्रीरामपूरमध्ये आज मोठा बंदोबस्त
श्रीरामपूर, १५ मे/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा उद्या (शनिवार) निकाल लागणार असल्याने शहर व तालुक्यातील संवेदनाक्षम ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिर्डी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार रामदास आठवले, सेना-भाजप युतीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे व अपक्ष उमेदवार प्रेमानंद रूपवते यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
तालुक्यात निवडणूक निकालानंतर अनेकदा संघर्ष झाला आहे. आताही काही भागात निकालानंतर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. संवेदनाक्षम असलेल्या टिळकनगर, दत्तनगर, हरेगाव, तसेच शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यावर पोलिसांची गस्त राहणार असून, मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मुस्लिम सामुदायिक विवाह सोहळा उद्या
निघोज, १५ मे/वार्ताहर

पारनेर तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने रविवारी (दि. १७) येथील कन्या विद्यालयात सकाळी ११.३० वाजता मुस्लिम समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हारूणभाई तांबोळी व जाकीरभाई तांबोळी यांनी दिली. पारनेर तालुक्यात मुस्लिम समाजामध्ये हा पहिलाच सामुदायिक सोहळा होणार आहे. नगरचे उपमहापौर नजीरभाई शेख यांनी वधू-वरांसाठी संसारोपयोगी वस्तू देण्याचे नियोजन केले आहे. तसेच सुप्याचे उपसरपंच राजू शेख अन्नदान करणार आहेत. या विवाह सोहळ्यासाठी खादी ग्रामोद्योग पारनेरचे अध्यक्ष हसनशेठ राजे, पोखरीचे मुस्लिम कार्यकर्ते निजाम पटेल यांनी विशेष सहकार्य केले आहे. मळगंगा विद्यालयातील दोन एकर प्रांगणामध्ये वऱ्हाडी मंडळींसाठी मंडप टाकण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यासाठी जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन हनीफभाई इनामदार, अल्ताफ शेख, जाफर मोमीन यांनी केले आहे.

राजळे यांच्या विजयासाठी मळगंगा देवीला अभिषेक
निघोज, १५ मे/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीत आमदार राजीव राजळे विजयी व्हावेत, यासाठी सरपंच गीताराम कवाद व तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष संदीप वराळ यांच्या नेतृत्वाखाली मळगंगा मंदिरात देवीला अभिषेक करण्यात आला. राजळे यांच्याकडून या वेळी प्रार्थना करण्यात आली. उपसरपंच भरत रसाळ, माजी उपसरपंच संजय लामखडे, रामदास रसाळ, मळगंगा पतसंस्थेचे संचालक धोंडिभाऊ रसाळ, मुस्लिम समाजाचे नेते हारूण तांबोळी, नीलेश वराळ, शरद पवार, अनिल सुपेकर, संतोष पिंपरकर, मनोज इधाटे, सादिक तांबोळी, नईम इनामदार उपस्थित होते. येथील जामा मशिदीमध्ये हारूणभाई तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली अनेक मुस्लिम बांधवांनी श्री. राजळे यांच्या विजयासाठी नमाज अदा केली. श्री. वराळ म्हणाले की, श्री. राजळे कार्यक्षम आणि अभ्यासू म्हणून परिचित आहेत. अशीच व्यक्ती खासदार व्हावी, यासाठी माझ्यासारख्या हजारो तरुणांनी तालुक्यात त्यांच्यामागे शक्ती उभी केली. ते ५० ते ५५ हजार मताधिक्याने विजयी होतील.

मुंगूसवाडे गावकऱ्यांचे पाण्यासाठी ‘रास्ता रोको’
पाथर्डी, १५ मे/वार्ताहर
पिण्याचे पाणी मिळावे, या मागणीसाठी तालुक्यातील मुंगुसवाडे येथील गावकऱ्यांनी राज्यमार्गावर सुमारे तासभर काल रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हातपंप व विहिरींचे पाणी कमी झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे.

जिल्ह्य़ातील ९८ न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या
नगर, १५ मे/प्रतिनिधी

प्रधान जिल्हा न्यायाधीश पी. बी. पाटील यांनी जिल्ह्य़ातील ९८ न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काल काढले. त्यात नगर न्यायालयातील २६जणांचा समावेश आहे.
नगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधीक्षकपदी श्रीरामपूर न्यायालयातील एस. एन. कीटमल यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वीच्या अधीक्षक श्रीमती आर. बी. दाणी सेवानिवृत्त होत आहेत. प्राधिकरणाच्या श्रीमती एस. व्ही. कुलकर्णी यांची पारनेर न्यायालयात वरिष्ठ लिपीकपदी बदली झाली आहे. बदली झालेल्या विविध पदांवरील कर्मचाऱ्यांची श्रेणी व संख्या याप्रमाणे - लघुलेखन उच्च श्रेणी २, दोन अधीक्षक - १, लघुलेखक १४, वरिष्ठ लिपीक १४, कनिष्ठ लिपीक ४२, मुख्य बेलिफ ४, बेलिफ ३, पुस्तक बांधणीकार २, शिपाई १४.