Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

उत्कंठा शिगेला
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

विदर्भातील दोन केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, सात मावळते खासदार, राज्याचे एक मंत्री, दोन आमदार आणि तीन माजी खासदारांच्या राजकीय भाग्याचा फैसला उद्या, शनिवारी होणार आहे. मतदानाची कमी टक्केवारी आणि मतदारांच्या निरुत्साहामुळे उमेदवारांची उत्कंठा मात्र आता शिगेला पोहोचली आहे. केंद्रात सत्तेसाठी काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यासाठी उमेदवार व त्यांच्या पक्षांनी संपूर्ण शक्ती पणाला लावलेली आहे. आता त्याचे फळ कोणाला चाखायला मिळते, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

सर्व प्रमुख उमेदवार विजयाबद्दल ठाम
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतलेले नागपूरमधील काँग्रेसचे विलास मुत्तेमवार मतमोजणीचा फैसला ऐकण्यासाठी एकदम ‘रिलॅक्स’ आहे तर, भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांना ठाम विश्वास आहे. बसपच्या हत्तीची डौलदार चाल थोडी संथ झाल्याचे दिसते. रामटेकमधील काँग्रेसचे मुकुल वासनिक दिल्लीतून नागपुरात डेरेदाखल झाले आहेत.मतमोजणीसाठी फक्त काही तास शिल्लक असल्याने सर्वाची धडधड मात्र वाढली आहे पण, सर्वानाच विजयाचा विश्वासही आहे. तामिळनाडूत प्रचारासाठी गेलो असता बालाजीचे दर्शन घेतले.

माहितीच्या अधिकारात कोषटवार दौलतखान विद्यालयाला ५ हजारांचा दंड
विशेष प्रतिनिधी, नागपूर, १५ मे

माहितीचा अधिकारांतर्गत शासनाच्या महत्त्वाच्या खात्यातील माहिती अगदी सहजपणे मिळत असताना विदर्भातील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेने माहिती अधिकारातील नियमांचे उल्लंघन केल्याने या संस्थेला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एखाद्या शालेय संस्थेला या कायद्यांतर्गत दंड होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने शालेय शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

‘कार्ड होल्डर’ होण्यासाठी कोळशाच्या वाहतुकीसाठी स्पर्धा
राजेश्वर ठाकरे, नागपूर, १५ मे

वीज टंचाईने महाराष्ट्रातील जनता होरपळून निघत असली तरी येथील कोळशाच्या पुरवठय़ामुळे अन्य राज्यांना पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत आहे. कोळशाच्या मागणीचा रेल्वेला भरपूर लाभ होत आहे. विदर्भातील विविध ‘रेल्वे कोल साईडिंग’मध्ये कोळशाची अधिकाधिक वाहतूक करून सर्वोत्तम स्थान पटकवण्याची स्पर्धा लागली आहे. रेल्वेच्या नागपूर विभागात माजरी रेल्वे स्थानकाजवळ नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या ‘केमटा कोल साईडिंग’ देखील उमरेड आणि माजरी साईडिंगप्रमाणे ‘प्लॅटिनम कार्ड होल्डर’ दर्जा प्राप्त करण्याच्या शर्यतीत सामील झाले आहे.

कळमना मार्केट परिसरात कडेकोट बंदोबस्त
एक हजार पोलीस तैनात राहणार
मार्केट मार्गावरील वाहतूक बंद
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी
रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणी उद्या, शनिवारी कळमना मार्केटमध्ये होत आहे. कुठलिही अनुचित घटना घडू नये म्हणून येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जवळपास एक हजार पोलीस या परिसरात तैनात राहणार आहेत.

विशेष कार्यकारी अधिकारीपद केवळ शोभेचे!
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

राजकीय पक्षांकडून शिफारस करून निर्माण करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाला आता केवळ झेरॉक्स कॉपीवर साक्षांकनासाठी कागदपत्रांवर सही शिक्के मारण्याव्यतिरिक्त कोणतेही अधिकार शिल्लक राहिलेले नाहीत. इतकेच नाही तर पोलिसांनीदेखील त्यांच्यावर अविश्वास दाखविल्याने त्यांच्याकडून महत्त्वाचे सर्वच अधिकार काढून घेण्यात आले आहेत.

चोरीच्या वाहनांचे पावणे दोन लाखांचे सुटे भाग जप्त
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी
एका कबाडीच्या दुकानात तहसील पोलिसांनी छापा टाकून १ लाख ६३ हजार १२५ रुपये किंमतीचे स्कुटर आणि मोटारसायकलचे सुटे भाग जप्त केले. गांधीबाग येथे भूषण दीपक चौरिया (२१, रा. जागनाथ बुधवारी) याचे श्रीकृष्ण गुडस् गॅरेज नावाचे कबाडीचे दुकान असून त्याने मोठय़ा प्रमाणात स्कूटर आणि मोटारसायकलचे चोरीचे सुटे भाग विकत घेतल्याची माहिती तहसील पोलिसांना मिळाली.

वंदना डिस्टीलर्स कंपनी सुरू करण्याची मागणी
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

टेकानाका येथील वंदना डिस्टीलर्स ही बंद पडलेली कंपनी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी भिमशक्तीचे विदर्भ प्रदेश सरचिटणीस हंसराज मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत केली. ही कंपनी बंद पडल्यामुळे १२५ कामगार बेरोजगार झाले असून, त्यांच्यासह कुटुंबाला उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. कंपनी बंद करण्यापूर्वी कामगारांनी पगारवाढीची मागणी केली असता तीन कामगार प्रतिनिधींना कंपनी मालकाने मारहाण केली. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात खोटी तक्रार नोंदवली. कामगारांना मारहाण करणारे खीस्टोफर डी. यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच, कंपनी पूर्ववत सुरू करून कामगारांना कामावर घ्यावे आणि ठेकेदारांकडील कामगारांना कामावरून बंद करावे, अशी मागणी हंसराज मेश्राम यांनी केली. पत्रकार परिषदेला विजय रंगारी, रमेश गेडकर टिकाम येडलेवार, सुधाकर फलके, आदी कामगार उपस्थित होते.

वीज कंपनीने आज-उद्या भारनियमन टाळावे
नागपूर, १५ मे/ प्रतिनिधी
शनिवारी, १६ आणि रविवारी, १७ मे रोजी वीज वितरण कंपनीने भारनियमन टाळावे, अशी आग्रहाची विनंती नागरी हक्क संरक्षण मंचने केली आहे. पूर्ण देशात १६ मे रोजी लोकसभेची मतमोजणी होणार आहे. देशातील बहुतेक मतदार विभिन्न ठिकाणाहून निवडणुकीचे निकाल पाहण्यास उत्सुक आहेत. निकाल पाहण्याचे एकमेव साधन दूरचित्रवाहिन्याच आहेत. म्हणूनज वीज वितरण कंपनीला विनंती आहे की, भारतातील सर्व जनतेच्या भावना लक्षात घेऊन १६ व १७ मे रोजी भारनियमन करू नये, अशी मागणी नागरी हक्क संरक्षण मंचचे केंद्रीय अध्यक्ष जनार्दन मून, संजय ढोरे, दिनेश गाणार, हंसराज मेश्राम आणि भीमराव दुपारी आदींनी केली आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांनी ३० जूनपर्यंत अर्ज करावेत
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

नागपूर विभागातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्य़ातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी २००९-२०१० या वर्षांकरिता शासन मान्यतेसाठी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करावे, असे ग्रंथालय संचालकांनी कळवले आहे. विहित अर्जाचा नमुना संचालक, सहाय्यक ग्रंथालय, नागपूर या कार्यालयात उपलब्ध असून अर्जासोबत गावच्या लोकसंख्येचे प्रमाणपत्र व संस्था नोंदणीपत्र असणे आवश्यक असल्याचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्र.भा. नाईक यांनी कळवले आहे. ३० जूननंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही नाईक यांनी केले आहे.

उपचारासाठी आर्थिक मदत
नागपूर, १५ मे/ प्रतिनिधी

भांडेवाडी उडिया मोहल्ला येथे राहणारे यशवंता आत्मराव मासूरकर यांना सावजी फुलभंडारचे मालक राजेंद्र आरमोरीकर यांनी ३०० रुपयांची मदत केली. तसेच रामा भगवान कुशनाके या १५ वर्षांचा निराधार मुलाच्या उपचारासाठी ४०० रुपयांची मदत केली. मासूरकर गेल्या १ वर्षांपासून पक्षाघाताने आजारी आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे भांडेवाडी वॉर्ड क्रमांक ३० चे आरमोरीकर यांनी ही मदत केली. यावेळी नरेश मडावी, बालाजी वाकोडीकर, अशोक रारोरकर, प्रल्हाद सांभारे आदी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचे निकाल जाहीर
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंटेरिअर डिझाईन पदवी परीक्षेच्या दुसऱ्या आणि चवथ्या वर्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तसेच टेक्साईल डिझाईनच्या (जुना अभ्यासक्रम) प्रथम वर्षांचे आणि अ‍ॅप्लाईड इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रथम वर्षांचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय फॅशन डिझाईनच्या प्रथम वर्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.

अशोक ठाकरेंना राजमाता जिजाऊ समता गौरव पुरस्कार
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

समता साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा राजमाता जिजाऊ समता गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अशोक ठाकरे यांना जाहीर झाला. २४ मे रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

संस्कार वर्गाचा समारोप
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

भारतीय श्री विद्या निकेतनतर्फे आयोजित संस्कार वर्गाचा समारोप १० मे रोजी करण्यात आला. ९ एप्रिलला सुरू झालेल्या या संस्कार वर्गात विद्यार्थ्यांना दिनदर्शिका वाचन, गायत्रीमंत्र, प्रात:स्मरण, सुर्यनमस्कार, ताडासन, वज्रासन तसेच शुद्धलेखन, कथाकथन आदी विषयांवर मान्यवरांनी उद्बोधन केले.

बहुमतासाठी युवक काँग्रेसचा यज्ञ
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळावे यासाठी शहर युवक काँग्रेसतर्फे शहीद चौकातील चंडिका माता मंदिरात यज्ञ करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच देशाला योग्य प्रकारे चालवू शकतो. दलित, शोषित जनतेला न्याय देऊ शकतो. त्यामुळे पक्षाला बहुमत मिळावे यासाठी यज्ञ आयोजित करण्यात आला. या यज्ञात लक्ष्मीकांत दीक्षित, नगरसेवक जुल्फीकार अहमद भुट्टो, विजय वनवे, अतुल कोटेचा, रिंकू जैन, श्रीकांत ढोले, आशीष पांडे, डॉ. मेहुल अडवाणी, कुमार डागा, राजू भेंडे, अश्विन झवेरी, धीरज पांडे, अतीक कुरेशी, निलेश शिंदे, अनुराग रोटकर, परिक्षित चिलाटे, मनीष वानखेडे, मनीष घडीवाल आदी उपस्थित होते.

कामठीत मुस्लिम भवनासाठी ५० लाख मंजूर
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

कामठीचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात मुस्लिम भवनासाठी ५० लाख मंजूर करण्यात आले आहेत. १३ मे रोजी यासंदर्भात कामठी नगरपालिकेला पत्र पाठवले आहे. कामठी हे मुस्लिम बहुल शहर आहे. येथे समाजासाठी भवन असावे, अशी मागणी या भागातील मुस्लिमांनी केली होती. नगरपालिकेने यासंदर्भात शासनाकडे प्रस्तावही सादर केले होते. यासंदर्भात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्नही उपस्थित केला होता. अर्थमंत्र्यांनी यावेळी सकारात्मक आश्वासन दिले होते. १३ मे रोजी कामठी नगरपालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे पत्र अल्पसंख्याक विकास विभागाने पाठवले आहे, असे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.

पाच दुकानांना आग; दोन लाखाची हानी
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

कामठी मार्गावरील लाल गोदाम जवळील पाच दुकानांना लागलेल्या आगीत दोन लाख रुपयांचे साहित्य जळाले. ही आग शुक्रवारी पहाटे दोन वाजता लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन बंबांनी ही आग विझवली.या आगीत न्यू ट्रॉन्सपोर्ट टायर्समधील ५० टायर, दोन हवा भरण्याचे यंत्र तसेच दुकान जळाले. या दुकानाचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. हनिफ मोटर गॅरेजमधिल एक लाख रुपये किमतीचे दोन ट्रकचे इंजिन, सुरेश गॅस वेल्डींगमधिल वेल्डींगचे यंत्र, त्रिलोक बावा यांच्या दुकानातील दोन इलेक्ट्रीक खूच्र्या तर मोहन स्प्रिंग बॉडी या दुकानातील २ स्प्रिंग बॉडी या आगीत जळाल्या. यामध्ये सुरेश गॅस वेल्डींगचे १५ हजार, त्रिलोक बावा यांचे १० हजार तर मोहन स्प्रिंग बॉडी या दुकानाचे ५ हजार, असे एकूण दोन लाखाचे नुकसान झाल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही.

मोटारपंप चोरणाऱ्यास अटक
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी शिवारातील एका शेतकऱ्याचे मोटार पंप चोरल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्याच्या ताब्यातून मोटार पंप जप्त केले. पाटणसावंगी येथील मधुकर मायाराम ठाकूर यांची पाटणसावंगी शिवारात शेती आहे. या शेतीजवळून पेंच कालवा जातो. या कालव्यावर त्यांनी मोटार पंप बसवला. १४ मे रोजी पहाटे चोरांनी हे मोटारपंप चोरून नेले. ते सकाळी शेतात गेले असता मोटार पंप चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार गणेश विश्वनाथ ठाकरे (२१, रा. पाटणसावंगी) आणि फकीरा अब्दुल रज्जाक शेख (४०, रा. सावनेर) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी मोटार पंप चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ४ हजार रुपये किमतीचा मोटार पंप जप्त केला. आरोपींनी या आधी चोरी केली असावी, असा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे.