Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

नवनीत

जी व न द र्श न
आपण आणि आत्मविजय

जर स्वत:ला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा (आत्मविजय) परिपाठ ठेवावा.
हा बौद्ध जीवनमार्ग आहे.
मनुष्य हा स्वत:चाच स्वामी आहे. दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वत:चा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण.
जो मूर्ख मनुष्य अर्हत, आर्य, शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोटय़ा धर्मसिद्धान्ताच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वत:च्याच विनाशाला कारणीभूत होते.
आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलीन होतो. आपणच पापाचा त्याग करतो, आपणच आपणाला शुद्ध करू शकतो; शुद्धी आणि अशुद्धी या स्वत:वरच अवलंबून असतात. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही.
जो केवळ सुखोपभोगांसाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे.
ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही, ज्याने इंद्रियदमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो. जो विश्वासार्ह व बळकट असतो तो ज्याप्रमाणे वज्रकापर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे पतन पावत नाही. जर माणसाला स्वत:संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वत:वर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.
स्वत:चे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वत: वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. स्वत: केलेल्या पापाबद्दल स्वत:लाच भरूदड भरावा लागतो. माणूस स्वत:ला स्वत:च शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही.
प्रथम स्वत:चीच सन्मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वत:ला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्यांचा धम्म)

कु तू ह ल
विश्वाचा आकार
विश्वाचा आकार केवढा व कसा आहे?

आपल्या विश्वाची व्याप्ती ही किमान १५६ अब्ज प्रकाशर्वष असावी. विश्वाची निर्मिती सुमारे १३.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. जर आपल्याला विश्वनिर्मितीच्या काळातली एखादी घटना न्याहाळता आली, तर त्यावेळी आपण प्रत्यक्षात १३.५ अब्ज प्रकाशर्वष प्रवास करून आलेले प्रकाशकिरण न्याहाळत असू. पण याचा अर्थ आपले विश्व हे १३.५ अब्ज प्रकाशर्वष त्रिज्येचे किंवा २७ अब्ज प्रकाशर्वष व्यासाचे आहे असा मात्र नाही. जर आपले विश्व स्थिर असते तर हे गणित वापरता आले असते. पण आपले विश्व सतत प्रसरण पावत आहे. त्यामुळे प्रकाशकिरणांचा आपल्या दिशेने प्रवास चालू असतानासुद्धा विश्व प्रसरण पावत आहे. विश्वाच्या आकाराची गणिते मांडताना विश्वाचे हे प्रसरण लक्षात घ्यावे लागते.
आपल्या विश्वाच्या आकाराचे स्वरूप जाणून घेताना हे विश्व सीमाबद्ध आहे की, सीमाहीन आहे हे कळणे महत्त्वाचे आहे. जर हे विश्व सीमाबद्ध असले तर त्याला कुठेतरी शेवट असायला हवा. नासाच्या विल्किन्सन शोधकाने केलेल्या निरीक्षणांतून विश्व हे अनंत नसले तरी सीमाहीन असल्याचे दिसून आले आहे. ही स्थिती काहीशी एखाद्या गोलाकार वस्तूसारखी आहे. गोलाकार वस्तूचा पृष्ठभाग हा काही अनंत आकाराचा नाही; परंतु त्याला सीमाही नाहीत. यामुळे एखादी मुंगी जर गोलाकार वस्तूवरून फिरू लागली तर तिला त्या वस्तूचा शेवट कधीच गवसणार नाही. इतकंच नव्हे, तर ही मुंगी कालांतराने फिरता फिरता पुन्हा मूळ जागी परत येऊ शकते. विश्वाचे प्रसरण कोणत्या प्रकारे होते आहे हे स्पष्ट झाल्यावरच या अनंत नसलेल्या; परंतु सीमाहीन असलेल्या विश्वाचा नक्की आकार कसा आहे हे सांगणे शक्य होईल.
अभय देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
शहाजीराजांची सुटका
शके १५७१ ज्येष्ठ शु. १५ दिनांक १६ मे १६४९ रोजी शहाजीराजे यांची सन्मानाने विजापूरच्या आदिलशहाने सुटका केली. याच आदिलशहाने मातब्बर हिंदू सरदार मुरार जगदेव यांची धिंड काढून देहाचे तुकडे तुकडे केल्याचा इतिहास ताजा असताना शहाजींची सुटका ही शिवचरित्रातील एक अद्भुत घटनाच समजली पाहिजे. शहाजीराजांची स्वतंत्र होण्याची महत्त्वाकांक्षा, कर्नाटकात शहाजींची जहागिरी म्हणजे एक स्वतंत्र राज्यच, तसेच तेथील छोटय़ा-छोटय़ा हिंदू राजांचा शहाजीने घेतलेला कैवार आदिलशहा, बडी बेगमसाहिबा, अफझलखान, वझीर मुस्तफाखान, बाजी घोरपडे यांच्या डोळय़ांत खुपत होता. लढाई करून शहाजीला जिंकणे हे शक्यच नाही. तेव्हा मुस्तफाखानने दगाफटका करून २५ जुलै १६४८ रोजी शहाजीला अटक केली. राजांच्या अटकेची बातमी ऐकून राजगडावर कुऱ्हाडच कोसळली. अशा बिकट परिस्थितीत आदिलशहाच्या एका सरदाराचा शहाजीराजांचा मोठा मुलगा संभाजीने, तर दुसऱ्या सरदाराचा शिवाजीराजांनी पराभव केला. परिणामी आदिलशहा आणखी चिडला. शहाजीराजांना बहुधा आता तोफेच्या तोंडीच दिले जाईल, अशी सर्वत्र चर्चा होती. पण..! पण शिवाजीराजांनी मी, माझा भाऊ आणि वडील दिल्लीचा बादशहा शहाजहानच्या चाकरीत दाखल होऊ इच्छितो, असे फर्मानच पाठवल्याने शहाजहानने माझ्या सरदारास काही झाले तर तुमची खैर नाही, असा खलिता आदिलशहास पाठवला. राजांच्या या राजकीय मुत्सद्देगिरीमुळे आदिलशहा पेचात पडला. मोगलांचे आक्रमण म्हणजे नसती आफत. त्यात त्याला शिवाजीराजांची साथ! तेव्हा आपले अस्तित्व नष्ट होण्यापेक्षा शहाजीला सन्मानपूर्वक सोडणेच योग्य, असा सुज्ञ विचार त्याने केला आणि आदिलशहाचा हुकूम झाला. शहाजीराजांना वस्त्रे, अलंकार, खिलत, शिरपान, पाच लाखांची जहागिरी, तंजावरचा कारभार आदी देऊन दरबारात त्यांचा गौरव करण्यात आला. खुद्द आदिलशहाने झाल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
खांबापासचा गोड पोरगा
आर्या आईबरोबर खरेदीसाठी तुळशीबागेत गेली होती. बाहेर बसलेले फळवाले, त्यांच्याकडची रसरशीत टपोरी फळे पाहून तोंडाला पाणी सुटत होते. रिक्षामधून उतरल्यावर डाव्या हाताला विश्रामबागवाडय़ात स्त्रियांनी सुरू केलेले दुकान होते. खणाच्या कापडापासून केलेल्या फार सुंदर अशा खांद्याला लावायच्या पिशव्या पाहून ती हरखून गेली. दहावीत असल्यामुळे खूप सारे क्लासेस लावले होते. त्याला जाताना मोजक्याच वहय़ा, मोबाईल, पाण्याची बाटली इ. सगळे टाकायला अगदी योग्य पिशवी होती. आवश्यक तेवढाच मोठा आकार. आत पेन, पेन्सिल, चष्मा, पैसे ठेवायला चेनचा कप्पा, सगळे कसे अगदी पाहिजे तसेच होते. किंमत होती १२५ रु. आईने आर्याला आवडलेली पिशवी घेऊन टाकली. वाडय़ात शेजारीच लागून महिलांचे पाणीपुरी, भेळ, पन्हे.. इत्यादी चटकमटक पदार्थाचे दुकान होते. ‘आई, मस्तपैकी पाणीपुरी खाऊया. तू बागेबाहेरची पाणीपुरी पाणी वाईट वापरत असतील म्हणून घेऊ देत नाहीस, भेळही खाऊ देत नाहीस. इथे पाणी नक्कीच चांगले वापरत असतील’, आर्या म्हणाली. आईला तिचे म्हणणे पटले. दोघींनी भेळ बनवायला सांगितली आणि त्या देखण्या वाडय़ाचे लाकडी कोरीव काम त्या न्याहाळायल्या लागल्या. एका कोरीव खांबापाशी आठ वर्षांचा हडकुळा, टपोऱ्या डोळय़ांचा, दाट केसांचा मुलगा बसलेला आर्याला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर आशाळभूतपणा होता. डोळय़ांत भूक होती. त्याचे लक्ष पन्हे, पाणीपुरी, भेळेकडे होते. आपल्याला हे खायला मिळावे अशी तीव्र इच्छा त्याला होती. आर्याला हे सगळे जाणवले. ती अस्वस्थ झाली. करुणेने तिचे मन भरून आले. आपण इथे भेळ, पाणीपुरी खाणार आणि कोरीव कामाने भरून गेलेल्या त्या कमनीय खांबापाशी बसलेला छोटा गोड पोरगा उपाशीपोटी इथल्या वस्तूंकडे अधाशी मनाने पाहात बसणार हे आर्याला सहन झाले नाही. आईच्या कानाजवळ तोंड नेऊन ती कुजबुजली, ‘आई, तो मुलगा बघ केवढा ‘बिच्चारा’ वाटतोय. त्याला पाणीपुरी, भेळ देऊया का आपण? फारतर माझ्या वाटय़ाची दे. मी फक्त एकच काहीतरी खाईन.’ आई हसून म्हणाली, ‘नको गं राणी, देऊया ना आपण त्याला हवे ते. तू कशाला एकच काहीतरी घेतेस?’ आर्याने त्या मुलाबरोबर बसून भेळ खाल्ली आणि ती म्हणाली, ‘आई, मला मोठेपणी अशा मुलांसाठीच काम करायला आवडेल.’ सोशलवर्कमध्ये डिग्री घ्यायची, असे मी कधीच ठरवून टाकले आहे. आयुष्याचे ध्येय ठरवताना त्यामागचा आपला उद्देश, दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. मुक्या प्राण्यांच्या वेदना दूर करायच्या म्हणून पशुवैद्यकीला जायचे, मानवी दु:खाच्या कहाण्या जगासमोर मांडायच्या म्हणून लेखक व्हायचे, अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या ध्येयामागे दुसऱ्यासाठी काही करण्याची तळमळ असेल तर ध्येयाच्या वाटचालीत ती मोठी प्रेरणा ठरते.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com