Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पनवेलमधील पथदिवे बायोगॅसने झगमगणार!
पनवेल/प्रतिनिधी : पनवेलमधील बहुतांश पथदिवे लवकरच बायोगॅसमुळे निर्माण झालेल्या

 

ऊर्जेच्या माध्यमातून झगमगणार आहेत. पनवेल नगरपालिकेतर्फे उरण नाका येथे उभारण्यात आलेल्या पाच टन क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पाची प्रात्यक्षिके शुक्रवारी सकाळी करण्यात आली. यावेळी आमदार विवेक पाटील, नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते. या प्रकल्पाची दैनंदिन व्यवस्था आणि देखभाल करणारे ‘सिटीझन्स युनिटी फोरम’ अर्थात ‘कफ’ या स्वयंसेवी संस्थेचे अनेक सभासदही यावेळी उपस्थित होते.
‘कफ’चे अरुण भिसे यांनी उपस्थितांना या प्रकल्पाचे प्रात्यक्षिक दाखविले. बायोगॅस निर्मितीसाठी बसविण्यात आलेल्या यंत्राची कळ दाबताच सभास्थानी असलेले दिवे, तसेच परिसरातील पथदिवे प्रकाशमान झाले आणि या प्रात्यक्षिकाच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब झाले. आमदार आणि नगराध्यक्षांनी या प्रकल्पाचे कौतुक करून बायोगॅस हा अणुऊर्जेलाही चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. नगरपालिकेने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी २५ लाख रुपये खर्च केले असून, त्याची दैनंदिन व्यवस्था पाहण्यासाठी वार्षिक निविदा काढली होती. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर निविदा सादर करणाऱ्या ‘कफ’ संस्थेची निविदा मंजूर होऊन या वर्षअखेरीपर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. घरातील कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण करून त्याप्रमाणे पालिकेच्या घंटागाडीत टाकण्याचे आवाहन या गॅसनिर्मितीसाठी उपयुक्त ठरत आहे. यातील ओला कचरा या प्रकल्पासाठी वापरण्यात येत असून, त्यात मिथेनचे प्रमाण अधिक असल्याने चांगल्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती होत असल्याची माहिती तंत्रज्ञांनी दिली. सध्या आम्ही कमी कचरा वापरत आहोत, मात्र हळूहळू त्याची व्याप्ती वाढवून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यात येईल आणि त्यानंतर शहरातील सुमारे २००-२५० पथदिवे दररोज आठ ते १० तास या ऊर्जेवर चालू शकतील, असा विश्वास भिसे यांनी व्यक्त केला. ‘ना नफा- ना तोटा’ या तत्त्वावर निविदा सादर करणाऱ्या ‘कफ’ संस्थेच्या निविदेला मुदतवाढ देणे योग्य ठरेल, असे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले. या ऊर्जेवर चालणाऱ्या पथदिव्यांमुळे पालिकेच्या खर्चातही बचत होणार आहे.