Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

भटक्या कुत्र्यांची अखेर धरपकड
पनवेल/प्रतिनिधी

रात्री-अपरात्री भुंकून तसेच दुचाकीस्वारांचा पाठलाग करून त्यांना बिथरविणाऱ्या भटक्या

 

कुत्र्यांची पनवेल नगरपालिकेने धरपकड सुरू केली आहे. निर्बीजीकरण करणे आणि रेबिजविरोधी लस टोचणे अशा दुहेरी हेतूंनी कुत्र्यांची धरपकड होत असून त्यासाठी पालिकेला स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळत आहे. अन्य शहरांप्रमाणे पनवेलमधील भटक्या कुत्र्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध केल्याने सर्वत्र त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते. त्याचप्रमाणे पनवेलमध्ये ‘इन डिफेन्स ऑफ अ‍ॅनिमल इंडिया’ या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते सध्या शहरभर फिरून कुत्र्यांना पकडत आहेत. या कुत्र्यांवरील शस्त्रक्रियेसाठी पालिकेने विशेष भूखंडावर बांधकाम केले असून, तेथे दररोज जास्तीत जास्त ३० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाते. या कुत्र्यांना रेबिजविरोधी लसही लगेचच देण्यात येते. गेल्या आठवडाभरात एकूण ४२ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी दिलीप कदम यांनी दिली. हा कार्यक्रम तीन-चार वर्षे सतत राबविला तर पनवेलमधील कुत्र्यांची संख्या जवळपास नगण्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांच्या डाव्या कानाच्या पाळीला हलकासा छेद देऊन त्यांना सोडण्यात येत आहे. याशिवाय खारघरमधील ‘एक्सलंट वेटरियन्स फॉर अ‍ॅनिमल्स’ या संस्थेतर्फे रेबिजविरोधी लस टोचण्याची स्वतंत्र मोहीम आखण्यात आली असून, या आठवडय़ात ८३ कुत्र्यांना ही लस टोचली गेली आहे. या कुत्र्यांच्या कपाळावर लाल खूण करून त्यांना सोडण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई- ठाण्यासारख्या शहरातून पनवेलमध्ये मध्यरात्री मोठय़ा प्रमाणावर भटके कुत्रे सोडण्यात येत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.