Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

पनवेलमधील पथदिवे बायोगॅसने झगमगणार!
पनवेल/प्रतिनिधी : पनवेलमधील बहुतांश पथदिवे लवकरच बायोगॅसमुळे निर्माण झालेल्या ऊर्जेच्या माध्यमातून झगमगणार आहेत. पनवेल नगरपालिकेतर्फे उरण नाका येथे उभारण्यात आलेल्या पाच टन क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पाची प्रात्यक्षिके शुक्रवारी सकाळी करण्यात आली. यावेळी आमदार विवेक पाटील, नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते. या प्रकल्पाची दैनंदिन व्यवस्था आणि देखभाल करणारे ‘सिटीझन्स युनिटी फोरम’ अर्थात ‘कफ’ या स्वयंसेवी संस्थेचे अनेक सभासदही यावेळी उपस्थित होते.

भटक्या कुत्र्यांची अखेर धरपकड
पनवेल/प्रतिनिधी

रात्री-अपरात्री भुंकून तसेच दुचाकीस्वारांचा पाठलाग करून त्यांना बिथरविणाऱ्या भटक्या कुत्र्यांची पनवेल नगरपालिकेने धरपकड सुरू केली आहे. निर्बीजीकरण करणे आणि रेबिजविरोधी लस टोचणे अशा दुहेरी हेतूंनी कुत्र्यांची धरपकड होत असून त्यासाठी पालिकेला स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळत आहे. अन्य शहरांप्रमाणे पनवेलमधील भटक्या कुत्र्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध केल्याने सर्वत्र त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते.

पनवेलमध्ये आज पाणी नाही
पनवेल/प्रतिनिधी

पनवेल, नवीन पनवेल आणि आसपासच्या परिसरात शनिवार, १६ मे रोजी सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, असे नगरपालिकेने कळविले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद असेल. या दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती नगरपालिका आणि प्राधिकरणाने केली आहे.

नेरुळ येथे सामुदायिक विवाह सोहळा
नवी मुंबई - श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब व अन्य सामाजिक संस्थांच्या वतीने ३० मे रोजी मोफत सामुदायिक विवाह सोहळा नेरुळ येथे आयोजित करण्यात आला आहे. श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की, गरीब व गरजू लोकांसाठी दरवर्षी असा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. सर्व जाती-धर्मांसाठी हा उपक्रम खुला आहे. यंदाचा विवाह सोहळा ३० मे रोजी सायंकाळी पाच वाजता एनआरआय कॉम्प्लेक्ससमोर, पामबीच रोड, सेक्टर- ४६, नेरुळ येथे होईल. संपर्क- वैशाली भोईर- २७५७०७७८ष्टद्धr(१३८)/ ९३२४३८१८०८.