Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

विजयाचा जल्लोष अनियंत्रित होऊ नये !
अखेर एकदाचा लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीचा दिवस उजाडला. उत्तर महाराष्ट्रात एरवी विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत लोकसभा निवडणूक प्रचार व चर्चेच्या पातळीवर दुर्लक्षित राहात असल्याचा इतिहास असताना यंदाची निवडणूक मात्र त्यास अपवाद ठरली. सहाही मतदार संघांमध्ये सर्वच प्रमुख पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रचंड चुरस आढळून आली. या चुरशीमुळे नाशिक, धुळे व रावेर या मतदारसंघांमध्ये प्रमुख पक्षांनी बंडखोरीचा उपद्रव टाळण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या केवळ काही दिवस आधी उमेदवार जाहीर करण्याची हुषारी दाखवली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इतर इच्छुकांनी वेगवेगळ्या पध्दतीने आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या संबंधात अविश्वासाचे नाते निर्माण झाल्याचे काही मतदारसंघात पाहावयास मिळाले. काही ठिकाणी प्रचारादरम्यान स्वपक्ष तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवार व पदाधिकाऱ्यांविरूध्द पोलिसांपर्यत प्रकरण गेले.

नियमबाह्य़ वर्तनाचे समर्थन घातक
प्रतिनिधी / नाशिक

रेल्वेविषयक समस्यांचा विषय निघाला की, नाशिककरांना प्रथम आठवण होते ती पंचवटी एक्स्प्रेसची. चाकरमानी असोत, व्यापारी असोत, खरेदीदार असोत, उद्योजक असोत की सर्वसामान्य प्रवासी असोत मुंबईला जायचे वा मुंबईहून परतायचे म्हटले की, बहुतांश नाशिककरांची प्रथम पसंती असते, ती पंचवटी एक्स्प्रेसलाच. साहजिकच या गाडीने दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे, पण त्याहूनही प्रसंगानुरुप प्रवास करणाऱ्यांची संख्या कितीतरी अधिक आहे. असे असताना दररोजचे वा नियमित प्रवासी आपापले गट बनवून स्वत:च्या फायद्याचे तेवढेच निर्णय घेत असल्याचे अनेक उदाहरणांवरून पुढे आले आहे.

नाशिक जिल्हा बँकेतील चौकशीचा फार्स
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अनेक नियमबाह्य़ गैरप्रकार व गैरव्यवहार प्रकरणे चांगलीच गाजली. संचालक मंडळातील वादविवाद चव्हाटय़ावर आले. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. श्वेतपत्रिकांचे वाटप करण्यात आले. या संघर्षांतून कलम ८८ अन्वये चौकशी झाली पण चौकशी अहवालात निर्दोष ठरवून अर्थपूर्ण निर्णय सादर करण्यात आला. या आश्चर्यकारक अहवालावर सर्व संचालकांची सहमती होऊन मौन पाळण्यात आले. त्यांनी ‘एकमेका सहाय्य करू’ अशी भूमिका घेतली. हेच या वादळाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.

विवाह सोहळ्यातील ध्वनी प्रदूषण रोखण्याचे पोलिसांचे निर्देश
मंगल कार्यालय, लॉन्स प्रतिनिधींची बैठक
नाशिक / प्रतिनिधी

विवाह सोहळ्यानिमित्त मंगल कार्यालय व लॉन्स परिसरात होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी उशीरा का होईना पावले उचलण्यास सुरूवात केली असून सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसीबल मर्यादेपेक्षा आवाज अधिक राहणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भात लॉन्स व मंगल कार्यालयाच्या प्रतिनिधींना निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस उपआयुक्त एस. डी. त्र्यंबके यांनी ध्वनीप्रदूषण प्रतिबंध संदर्भात आयोजित लॉन्स व मंगल कार्यालयांच्या मालक, व्यवस्थापकांच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले.

संजय आखाडे यांचा सत्कार
नाशिक / प्रतिनिधी

संजय आखाडे यांनी आपल्याला मिळालेल्या यशाची जाणीव ठेऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करणारे उत्तम प्रशासक व्हावे, अशी अपेक्षा माजी प्राचार्य डॉ. भा. व्यं. गिरीधारी यांनी व्यक्त केली. येथील लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या आखाडे यांचा जाहीर सत्कार गिरीधारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामप्यारीबाई सारडा विद्यालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते.

सिन्नर जवळ भीषण अपघातात चार ठार
नाशिकरोड, १५ मे / वार्ताहर

लग्न समारंभ आटोपून गावाकडे परतणारी मारुती मोटार व खासगी आराम बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे गावाजवळ आज दुपारच्या सुमारास झालेल्या अपघातात शालिनी विनीत मगर (३५), सुरेश यशवंत जाधव (५३), शेषराव धोंडोपंत चोथवे (६०), व त्यांची पत्नी सुकुमारी (५०) हे ठार झाले. मृतांमधील बहुतेकजण नाशिकरोड येथील असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आरोग्य विद्यापीठाचा २५ रोजी पदवीदान समारंभ
नाशिक, १५ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आठव्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन येत्या २५ मे रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमास नामवंत ऱ्हदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे प्र-कुलपती तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
येत्या २५ तारखेला सकाळी १०.३० वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात विद्यापीठाच्या आठव्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. कार्यक्रमप्रसंगी डॉ. बी. के. गोयल हे स्नातकांपुढे दीक्षांत भाषण करणार करतील. कार्यक्रमात आरोग्य विज्ञान पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहेत. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी केले आहे.