Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

शक्याशक्यता
अत्यंत गुंतागुंतीच्या आणि म्हणूनच अभूतपूर्व चुरशीच्या बनलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस अखेर येऊन ठेपला आहे. विविध समीकरणे, जोड-तोड, करंट- अंडरकरंटस् या मुळे छातीठोकपणे अंदाज वर्तवणे कुणालाच शक्य होत नसले तरी काही गृहितकांच्या आधारे ठोकताळे मात्र जरूर बांधले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तर सर्वत्र एवढा एकमात्र विषय चर्चेत असून हातचे राखून का होईना, जाता जाता प्रत्येकाला आपापला अंदाज व्यक्त करण्याचा व दुसऱ्याचा अंदाज जाणून घेण्याचा मोह अनावर होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर, मतमोजणीच्या पूर्वसंध्येला ‘वृत्तान्त चमू’ने विविध क्षेत्रातल्या मंडळींशी चर्चा करून निकालाच्या शक्याशक्यतांचा सरासरीच्या साच्यात घेतलेला वेध. अर्थात, हे आकडे अंतिम नसून केवळ काही गृहितकांच्या आधारे दिसत असलेल्या शक्यता आहेत.

शहादा : पालिका दवाखान्याबाबतचा संभ्रम कायम
रुग्णांच्या सोयींपेक्षा गैरसोयच अधिक
दत्ता वाघ / शहादा

शहरातील नगरपालिका दवाखाना हा नेमका कुणाच्या ताब्यात आहे, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. किंबहुना त्यातील गुंतागुंत वाढतच आहे. नगरपालिका रुग्णालय हे ग्रामीण रुग्णालय म्हणून हस्तांतरीत करण्यात आले असले तरी दररोज रुग्णांकडून फीच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न मात्र नगरपालिकेच्या तिजोरीत जमा होत असते, त्या बदल्यात शहादा नगरपालिकेकडून साधा कागद-कार्बनच काय, परंतु टाचणी सुद्धा उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी आहेत. स्टेशनरी मिळत नसल्याने येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हैराण झाले असून प्रशासकीय तिढा लवकरात लवकर मिटवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

वादळी पावसाचा केळी बागांना तडाखा
वार्ताहर / जळगाव

तापमानात वाढ झाल्याने केळीबागा सुकू लागल्याने अगोदरच हैराण झालेल्या जिल्ह्य़ातील शेकडो शेतकऱ्यांना बुधवार व गुरूवारी लागोपाठ दोन दिवस झालेल्या वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला असून पावसामुळे बागांचे कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पंचनाम्याचे काम सुरू केले आहे.

सटाण्याजवळ हल्लेखोरांच्या गोळीबारात मुलगी जखमी
वार्ताहर / सटाणा

बारा वर्षांच्या मुलीवर जीपमधून येणाऱ्या व्यक्तीने गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याने त्याविषयी अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. येथील श्रेया किशोर ब्राह्मणकर (१२) ही शहरातील पाठक मैदानाजवळ राहणारी मुलगी गुरूवारी रात्री आई-वडीलांसमवेत मोटार सायकलने मालेगावहून सटाणा येथे येत होती.

शाळांमध्ये प्रवेशासाठी देणग्या; जळगाव शिवसेनेचा आरोप
जळगाव /वार्ताहर

राज्याचे शिक्षण मंत्री तसेच शिक्षण विभागाने अनुदानित, विनाअनुदानित तसेच कायमस्वरुपी अनुदानित शाळांवर फी संदर्भात नियंत्रण ठेवण्याच्या घोषणा केल्या असताना जळगावातील काही नामवंत शाळेत प्रवेशासाठी हजारो रुपये घेण्यात येत आहेत. वह्य़ा व पुस्तकेही जादा किंमत आकारून शाळेतूनच घेणे बंधनकारक केले जात आहे, असा आरोप करून या विरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी महानगर शिवसेनेने केली आहे.

आढावांचा चढता राजकीय आलेख लक्षवेधी
स्पॉट दारणा
प्रकाश उबाळे / भगूर

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कामकाज केंद्र शासनाच्या आखरित्यात चालते. त्यामुळे मुंबई जरी जवळ असली तरी बोर्डाला सातत्याने दिल्लीकरांच्या संपर्कात राहूनच आपली सत्ता राबवावी लागते. अशा कॅन्टोन्मेंट बोर्डात ज्या आढाव माता-पित्यांनी आपली शासकीय सेवा बजावली त्यांचाच पुत्र बोर्डात निवडून येण्याची हॅटट्रीक साधत शहराचे प्रथम नागरिकपद असलेल्या उपाध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाला असून त्यांच्याकडून म्हणजेच दिनकरराव आढाव यांच्याकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढत आहेत. परिणामी, आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांचा राजकीय आलेख लक्षवेधी ठरत आहे.

‘इक्वाइन इन्फ्लुएन्झा’ रोगामुळे घोडेमालकांना दक्षतेचा इशारा
नंदुरबार / वार्ताहर

घोडे, गाढवे व खेचरांमध्ये ‘इक्वाइन इन्फ्लुएन्झा’ हा रोग आढळून येत असून या रोगाचा प्रसार अश्व वर्गातील पशुंमध्ये जलद होत असल्याने या रोगाची लक्षणे आढळल्यास पशु पालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. के. आर. सिंघल यांनी केले आहे.

अपघातातील जखमी विवाहितेचा मृत्यू
नांदगाव / वार्ताहर

नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावर दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या रेखा हुनमान गिते (२७) या विवाहितेचा उपचारादरम्यान नाशिक येथे मृत्यू झाला. रेखाचे वडील आनंदा सांगळे राज्य परिवहन महामंडळात नोकरीस असून अपघाताच्या दिवशी ते मुलीला नांदगाव येथे भेटले होते. रेखा गिते यांच्या पश्चात पती व तीन मुले आहेत.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार ; गुन्हा दाखल
शिंदखेडा / वार्ताहर

तालुक्यातील वरसूल गावच्या नवीन ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत सहा लाख ९५ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वरसूलचे उपसरपंच विक्रम सुरसिंग भिल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. वरसूलच्या नवीन ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी १२ लाख ५६ हजार ९१६ रुपये मंजूर करण्यात आले होते. २००२ ते ३० एप्रिल २००९ या कालावधीत पाणी पुरवठा योजनेत सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा सभापती, सचिव यांनी खोटे सही, अंगठे घेऊन ठरावास मंजुरी मिळवली. एकूण सहा लाख ९५ हजार रुपयांचे खोटे दस्तऐवज तयार करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले होते