Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

कोण?
पंधराव्या लोकसभेसाठी पाच टप्प्यात झालेल्या मतदानाचे निकाल अखेरीस काय लागणार याची उत्सुकता एक्झिट पोलची निरीक्षणे जाहीर झाल्यापासून भारतातील राजकीय निरिक्षकांनाच नव्हे, तर जागतिक निरिक्षकांनाही लागून राहिली आहे.. सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून कॉँग्रेस विजयी होईल असा लसावि दिसत असला, तरी स्वबळावर सरकार बनविण्याएवढय़ा जागा कॉँग्रेसला मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने तिसऱ्या आघाडीतील नेमक्या कोणत्या घटक पक्षांना सोबत घेऊन कॉँग्रेस पक्ष निर्णायक बहुमताचा जादुई आकडा गाठेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.. अर्थात तुम्ही हा मजकूर वाचत असतानाच ही उत्सुकता संपू लागली असेल, कारण सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीचे निकाल हळूहळू तुमच्यापर्यंत येऊही लागले असतील..

कुंपण शिक्षणाला आणि मैदानांना
गेल्या महिनाभरापासून सर्वत्र लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु असताना नवी मुंबईतील पालकवर्ग मात्र आपल्या न्याय हक्कासाठी एकाकी अशी झुंज देताना नजरेस पडत होता. केवळ नवी मुंबईच नव्हे तर मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड भागातील अनेक विनाअनुदानीत शिक्षण संस्थांनी या पालकवर्गास अक्षरश बाजूला सारुन शाळांमध्ये मनमानेल त्या पद्धतीने फी वाढ केल्याने पालक आणि या शिक्षण संस्थांमध्ये संघर्ष सुरु झाला. मुंबई, पुण्यानंतर एज्युकेशनल हब म्हणून झपाटय़ाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या नवी मुंबईत या संघर्षांची धग इतर शहरांच्या तुलनेत अधिक जाणवत होती, हे लक्षात घेण्यासारखे होते. पनवेल नजिक असलेल्या खांदा कॉलनी या नव्यानेच वसत असलेल्या उपनगरातील सेंन्ट जोसेफ या शाळेत तब्बल १०० टक्के एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर फी वाढ करण्यात आली आणि बिथरलेल्या शेकडो पालकांनी व्यवस्थापनाविरोधात थेट रस्त्यावर येउन आंदोलन छेडले.

समांतर सिनेमा
मराठी रसिकांपर्यंत फिल्म सोसायटी चळवळ पोहोचण्यास सिनेमातली आणखी एक महत्त्वाची घटना कारणीभूत ठरली. ती म्हणजे ‘समांतर सिनेमा’चे हिंदीत आगमन. मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवनशोम’ हा हिंदी चित्रपट मुंबईत प्रकाशित झाला. हिंदी चित्रपटनिर्मितीत गुंतलेल्या सर्वाना आणि सुशिक्षित चित्रपट रसिकांनाही नेहमीच्या फॉम्र्युलाप्रधान हिंदी सिनेमापेक्षा ‘भुवनशोम’ अनोखा आविष्कार म्हणून भावला. ‘भुवनशोम’चे कौतुक त्यामुळे सर्व रसिकांनी केले.
‘भुवनशोम’चे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे सत्यजित रायनी जो जीवनाला जवळचा चित्रपट आणि भारतीय जीवनाचे सिनेमात प्रतिबिंब दाखविण्याचा जो प्रयोग ‘पथेर पांचाली’त केला तो बंगालीत प्रवाह बनला. हा ‘नव’ सिनेमाचा झोत ‘भुवनशोम’मुळे देशाच्या मुख्य प्रवाहातील सिनेमात आला आणि तिथून तो अन्य भारतीय भाषांतही पोहोचला.
‘समांतर’ सिनेमाचा हा प्रयोग उभा राहणे सरकारी धोरणामुळे शक्य झाले. केंद्र सरकारच्या फिल्म फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, ‘फिल्मफेअर’चे संपादक बी. के. करंजिया होते. त्यांच्याबरोबर संचालक मंडळात बंगाली दिग्दर्शक तपन सिन्हा, हृषिकेश मुखर्जी, मल्याळी लेखक-दिग्दर्शक एम. टी. वासुदेवन नायर, सांस्कृतिक गुरू नारायण मेनन, इकॉनॉमिक टाइम्सचे संपादक डॉ. रांगणेकर, एस. आर. वकील, तेजी बच्चन, असे सिनेमाचे उत्तम ज्ञान असलेले लोक होते. आनंदम फिल्म सोसायटीचे सेक्रेटरी नितीन सेठी व्यवस्थापक, त्यांनी चित्रपटाला भांडवल पुरविण्याचे नवे धोरण आखले. लो बजेट ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट चित्रपट, भारतीय लेखकांच्या कथा आणि नव्या दिग्दर्शकांना संधी. एकूण धोरणाचे घोषवाक्य असे होते. ‘कथावस्तु ही चित्रपटाचा स्टार आणि दिग्दर्शक हा स्टार’ काहीशी फ्रान्समधल्या ‘न्यू वेव्ह’ने जी संकल्पना मांडली तीच ही संकल्पना. यातून ‘समांतर सिनेमा’ हा एक चळवळ म्हणून उभा राहिला. ‘भुवनशोम’पाठोपाठ ‘सारा आकाश’, ‘आषाढ का एक दिन’, ‘२७ डाऊन’, ‘दस्तक’, ‘गर्म हवा’, ‘एक अधुरी कहानी’, ‘फिर भी’, ‘अनुभव’ असे हिंदी ‘स्वयंवरम्’ (मल्याळी), ‘शांतता कोर्ट चालू आहे’ (मराठी), ‘कंकू’ (गुजराती) अशा अनेक चित्रपटांनी ‘समांतर सिनेमा’ समृद्ध केला. कमलेश्वर, मोहन राकेश इ. हिंदीतल्या नामवंत लेखकांच्या कथा पडद्यावर आल्या.
समांतर सिनेमाने सुशिक्षित, सुसंस्कृत चित्रपट रसिकांना ‘सिनेमा’ इतर कलांच्या बरोबरीने ‘कला’ संज्ञेला पात्र ठरू शकतो, असा दिलासा दिला. भारतीय सिनेमातले हे मन्वंतर फिल्म सोसायटी चळवळ पुढे नेण्यास सहाय्यभूत ठरले. बासू चटर्जी, अरुण कौल, अमोल पालेकर, गोविंद निहलानी, श्याम बेनेगल, इत्यादी फिल्म सोसायटी चळवळीतले कितीतरी लोक समांतर सिनेमामुळे चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले. विजय तेंडुलकरांनी त्यांच्या एका सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना सांगितले होते ‘समांतर सिनेमा आला म्हणून मी पटकथा लेखन करू शकलो.’ हिंदी मराठीतल्या समांतर सिनेमाचे केंद्र मुंबईत होते. स्वाभाविकच मुंबईत फिल्म सोसायटी चळवळ प्रभावी ठरली. १९७० नंतर मुंबईत एकूण १८ फिल्म सोसायटय़ा कार्यरत होत्या. इतकेच काय गुजरात व मध्य प्रदेशमध्येही चळवळ पोहोचली.
- सुधीर नांदगावकर फेडरेशनचे केंद्रीय सचिव
cinesudhir@gmail.com