Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

उत्कंठा शिगेला
पुणे, १५ मे / खास प्रतिनिधी

 

कोण निवडून येणार.. पुण्यात काय होणार.. शिरूरचे काय हो.. मावळात नक्की ‘सीट’ कोणाची बसणार.. बारामतीचे मताधिक्य किती असेल.. सांगली, कोल्हापुरात काय होईल आणि पश्चिम महाराष्ट्रात काहीच सांगता येत नाही, फारच बंडखोरी झाली बुवा!
..गेले बावीस दिवस सुरू असलेल्या या आणि अशा चर्चा तसेच निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शमणार आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी घरचे देव पाण्यात ठेवून देवदर्शन केले. थंड हवेच्या ठिकाणी जाऊन काहींनी विश्रांती घेतली, तर काही उमेदवारांनी निवडणुकीचा शीण घालविण्यासाठी परदेशवारीही केली. आता निकालाची वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने सर्वाची उत्सुकता आणि धडधड वाढली आहे.
पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी शिवाजीनगरच्या शासकीय धान्य गोदामात होत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होऊन भावी खासदारांचे नशीब उलगडणार आहे. पुण्यात चौरंगी लढत दिसत असली तरी काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी येणार की भाजपचे अनिल शिरोळे याचीच चर्चा आहे. बहुजन समाज पक्षाच्या हत्तीचे उमेदवार डी. एस. कुलकर्णी व मनसेचे रणजित शिरोळे यांच्या शिट्टीच्या मतांचेही औत्सुक्य राजकीय वर्तुळात आहे.
शिरूरची लढत ही उत्कंठावर्धक राहील अशी अटकळ बांधली जात आहे. शरद पवार हे या मतदारसंघातून लढणार होते. त्यांनी ऐनवेळी ‘माढय़ा’त जाण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव बाजी मारणार का, राष्ट्रवादीचे विलास लांडे विजय खेचणार याबाबत उत्सुकता आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांचे पारडे जड राहील का शिवसेनेचे गजानन बाबर हा गड जिंकणार यावर पैजा लागल्या आहेत. अपक्ष उमेदवार मारुती भापकर किती मते घेतात याचेही औत्सुक्य राहणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, भाजपच्या कांता नलावडे व अपक्ष मृणालिनी काकडे यांच्यात लढत आहे. या लढतीत सुळे यांना किती मताधिक्य मिळणार याचीच उत्कंठा आहे. शरद पवार यांचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे पवार व सुळे यांच्या मतांची नक्कीच तुलना होणार आहे. सुळे या राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होणार का, याची चर्चा राष्ट्रवादीत आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी मोठय़ा प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे निकाल काय लागणार याबाबत कोणीही शाश्वती देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. राजकीय जाणकार ते कार्यकर्ते यांच्यात हीच भावना आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती व सातारा या दोन जागा राष्ट्रवादीला मिळतील असे छातीठोकपणे सांगितले जात आहे. पण या पक्षाच्या कोल्हापूर, हातकणंगले, शिरूर, मावळमधील जागा अडचणीत असल्याचे बोलले जाते. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे संभाजीराजे यांना खासदार सदाशिव मंडलिक यांनी आव्हान दिले आहे.
हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांच्यापुढे शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. सांगलीत काँग्रेसचे प्रतीक पाटील यांना बंडखोर अजित घोरपडे यांचा सामना करावा लागत आहे.
या राजकीय परिस्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रात काय होणार, कोणाच्या गळय़ात खासदारकीची माळ पडणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. अवघ्या काही तासांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांमधील ही उत्सुकता आनंद वा दु:खात परावर्तित होईल.