Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

नगरसेवकाचे अतिक्रमण अखेर भुईसपाट
पिंपरी, १५ मे/ प्रतिनिधी

 

प्राथमिक शाळेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली राष्ट्रवादीचे फुगेवाडी येथील नगरसेवक सूरदास गायकवाड यांच्या मालकीची प्रचंड मोठी इमारत उच्च न्यायालयाने तंबी दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज दिवसभरात भुईसपाट केली.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड. पद्मिनीराजे मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल के ली होती. सुनावणीनंतर इमारत पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पालिका प्रशासन त्याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचे अ‍ॅड. मोहिते यांनी निदर्शनास आणले. त्यावर न्यायालयाने पालिका प्रशासनाला कडक शब्दांत सुनावले व ११जूनपर्यंत ठोस कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अखेर पालिकेने लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या आदल्या दिवशीची वेळ निश्चित करून ही कायदेशीर कारवाई केली.
सकाळी दहाच्या सुमारास महापालिकेचे शहर अभियंता एकनाथ उगिले यांच्यासह कार्यकारी अभियंता विठ्ठल महाडिक, एम. टी. कांबळे, राजन पाटील, बळवंत बनकर, दीपक ठुबे तसेच पोलीस निरीक्षक मोहन विधाते, नंदकुमार पिजन, सर्जेराव गायकवाड यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कारवाईला सुरुवात केली. पालिकेचे सव्वाशे कर्मचारी, दोन ‘स्ट्रायकिंग फोर्स’सह १३० पोलीस कारवाईत सहभागी झाले होते. एक पोकलेन, पाच जेसीबी, दहा ट्रक, अग्निशामक दल, रुग्णवाहिका असा सुमारे तीस वाहनांचा ताफा कारवाईच्या ठिकाणी सज्ज होता.
कारवाईच्या प्रारंभी वातावरण एकदम तणावपूर्ण होते, मात्र गायकवाड अथवा त्यांच्या समर्थकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने साडेचार वाजेपर्यंत शांततेत सर्व कारवाई पूर्ण झाली. त्यात शाळेच्या आरक्षणासाठी राखून
ठेवलेली ११ गुंठे जागा रिकामी करण्यात आली. या जागेवर प्रशस्त तीनमजली इमारत, समोर चाळवजा इमारत, पत्र्याची चाळ होती. सर्व मिळून सुमारे ७० खोल्या होत्या. त्या पोकलन व जेसीबीच्या मदतीने भुईसपाट केल्या. त्यामुळे सुमारे ७५ लाख रुपयांची मालमत्ता धुळीस मिळाली आहे.
अ‍ॅड. मोहिते यांच्याशी संपर्क केला असता, या जागेत शाळा व्हावी म्हणून मी पाठपुरावा केला, कारण लोकांची ती गरज आहे. जोपर्यंत शाळा इमारत होत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा सुरूच ठेवणार. आयुक्तांनी ही कारवाई केल्याने इमारत बेकायदा होती हे आता सिद्ध झाले आहे.
यापुढे गायकवाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. जर त्यांनी वेळेत दखल घेतली नाही तर आयुक्तांच्या विरोधात न्यायालयीन बेअदबीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय वैमनस्यातूनच कारवाई
महापालिका निवडणुकीत फुगेवाडी-कुंदननगर वॉर्डमधून अ‍ॅड. मोहिते यांना डावलून शिवसेनेतून आलेल्या सूरदास गायकवाड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. त्यामुळे मोहिते यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे सुडापोटी त्यांनी गायकवाड यांच्या या इमारतीची कागदपत्रे मागवून कारवाई करणे प्रशासनाला भाग पाडले. गायकवाड यांच्या विरोधातील भूमिपुत्रांनी मोहिते यांना पाठबळ दिले. या प्रकरणात राष्ट्रवादीचे कोणीही नेते शेवटपर्यंत गायकवाड यांच्या मदतीला आले नाहीत.

‘त्या’ ४० नगरसेवकांवर कारवाई होणार का?
महापालिकेच्या इतिहासात एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाविरुद्ध अशा प्रकारची पहिलीच कठोर कारवाई आहे. इमारत वाचविण्यासाठी स्वत: गायकवाड यांनी पुष्कळ प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना अपयश आले. या इमारतीच्या बदल्यात तडजोड म्हणून जवळच शंभर मीटरच्या आत स्वत:ची दहा गुंठे जागा देण्याची त्यांची तयारी होती. अ‍ॅड. मोहिते यांनी मात्र आरक्षित जागेवर कारवाईचाच विषय लावून धरल्याने अखेर प्रशासनाला कारवाई करावी लागली.
आता शहरातील अन्य ४० नगरसेवकांच्या मालकीच्या अनधिकृत बांधकामांवर पालिका प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल नागरिक करत आहेत. शहर विकास आराखडय़ातील आरक्षित जागांवर काही नगरसेवकांनी कब्जा केल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावरही कारवाई करण्याची जनतेकडून मागणी करण्यात येत आहे.