Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

समस्या नव्हे; संपत्ती!
अभिजित घोरपडे
पुणे, १५ मे

 

ओल्या कचऱ्यापासून घरोघरी इंधननिर्मिती करता येते, खतनिर्मिती होऊ शकते, तो स्वत:हून कुंडीत किंवा बागेत जिरवला तर महापालिकेच्या मिळकत करातून पाच टक्क्य़ांपर्यंत सूटसुद्धा मिळवता येते आणि सुका कचरा तर पैसा मिळवून देतोच.. कचरा योग्यप्रकारे हाताळला तर ती समस्या न राहता संपत्ती बनू शकते, याचीच ही काही उदाहरणे!
कचऱ्याकडे पाहण्याचा असाच योग्य दृष्टिकोन ठेवून त्यातून पैसे कमावले, तर प्रशासनावरील ताणही कमी होईल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे आणि तसे करण्याबाबत आवाहनही केले आहे.
कचऱ्यापासून इंधननिर्मिती या विषयात मूलभूत संशोधन करणारे व अ‍ॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलजी इन्स्टिटय़ूटचे (आरती) संस्थापक डॉ. आनंद कर्वे हे कचऱ्याकडे संपत्ती म्हणून पाहतात. ती संपत्ती कशी आहे हेही स्पष्ट करतात, ‘प्लास्टिक, कागद, काच, धातू असा कोरडा कचरा पुनर्निर्मितीसाठी पुन्हा वापरता येतो. त्यामुळे तो विकतही घेतला जातो.
प्रश्न असतो तो ओल्या कचऱ्याचा, पण त्यापासूनही इंधननिर्मिती करता येते, अगदी घरातील कचऱ्यापासूनसुद्धा!’ कर्वे यांच्या ‘आरती’ संस्थेतर्फे घरोघरी लहानशा गच्चीत बसवता येतील असे बायोगॅसचे लहान सयंत्र तयार करण्यात आले आहेत. त्याद्वारे फक्त घरातील कचरा वापरून लहान आचेवर तासभर शेगडी चालते. कचऱ्याचे प्रमाण जसे वाढत जाईल, तसे हे प्रमाण वाढू शकते. हॉटेल्स आणि उद्योगांच्या कॅन्टीनमध्ये निर्माण होणारे खरकटे व ओल्या कचऱ्याचे प्रमाण पाहता, तिथे रोज तीन किलो एल.पी.जी.एवढा गॅस तयार होऊ शकतो. या उपायातून ओल्या कचऱ्याचा प्रश्न सुटतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा खर्च वाचतो आणि गॅसनिर्मितीपासून पैसासुद्धा मिळवता येतो, असा तिहेरी फायदा असल्याचे कर्वे सांगतात. शहरात अशाप्रकारे घरगुती ओला कचरा वापरता येतोच, शिवाय सोसायटय़ांनी मोठे सयंत्र बसवले, तर ओल्या कचऱ्यापासून लिफ्टचे चार्जिग, टाकीत पाणी चढविणे हे करण्यासाठी पुरेसा गॅस तयार करता येतो.
कचरा आपला आपण जिरवला तर महापालिकेकडून मिळकत करात पाच टक्के सूट मिळते. हा फायदा लक्षात घेतला, तर सोसायटय़ांनी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पगार देऊन प्रशिक्षित व्यक्ती नेमली, तरी सोसायटय़ांना फायदाच होतो, असा अनुभव या क्षेत्रात काम करणारे दत्ता गोडबोले सांगतात.
आपल्याकडील हवामान, भौगोलिक स्थिती व कचऱ्याचे स्वरूप पाहून या विषयाकडे पाहण्याचा आपला स्वतंत्र दृष्टिकोन हवा, अशी आवश्यकता या क्षेत्रात सखोल संशोधन करणारे डॉ. उदय भवाळकर मांडतात. ‘आपल्याकडे याबाबत पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्यात येते. पण त्यांचे व आपले हवामान वेगळे आहे. तिथे थंड हवामानामुळे कचरा लवकर कुजत नाही, म्हणून साठवावा लागतो. पण भारतातील उष्ण हवामानात तो झटपट कुजतो, मग त्यांचे उपाय आपल्याकडे वापरून कसे चालतील?’ भवाळकर यांचा सवाल बरंच काही सांगून जातो. ‘कचऱ्याची समस्या, कचऱ्याची विल्हेवाट’ असे शब्द न वापरण्याचा ते आग्रह का धरतात, हेही समजते.

‘ओला कचरा तसाच जमिनीवर विखुरला तर उत्तम खत बनून त्याची संपत्ती बनते आणि डेपोत ‘डम्प’ केला तर समस्या!’ हेही पटते.. कचऱ्याची समस्या करायची की संपत्ती हे नागरिकांनीच ठरवायचे आहे.
(क्रमश:)
(डॉ. आनंद कर्वे यांच्या ‘आरती’ संस्थेचा क्रमांक : ०२०-२४३९०३४८/ २४३९२२८४)