Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मान्सूनचे वेध लागल्याने प्रशासन होतंय सज्ज!
पुणे, १५ मे / खास प्रतिनिधी

 

मान्सूनचे आगमन या वर्षी आठवडाभर आधीच होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने राज्य सरकारने पूर आणि पुनर्वसनाची तयारी आतापासूनच चालविली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ाचा आपत्ती व्यवस्थापनाचा स्वतंत्र आराखडा करण्याच्या सूचना देतानाच मान्सूनच्या तयारीसाठी आढावा बैठकही बोलाविली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांत पावसाचे प्रमाण वाढल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. २६ जुलै २००६ रोजी मुंबईत अतिवृष्टीने आलेल्या प्रलयामुळे हाहाकार उडाला होता. या प्रलयात अनेकांना प्राण गमावावे लागले. अलमट्टी धरणाच्या पाण्याच्या फुगवटय़ामुळे सांगली शहर जलमय झाले होते. गतवर्षी नाशिकमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती. विदर्भ व कोकणासह राज्याच्या बहुतांश भागांत थोडय़ाबहुत प्रमाणात पूरस्थिती उद्भवत असल्याने त्याचा नियोजनपूर्वक सामना करण्यासाठी पावले टाकली जात आहेत.
राज्यात कोठेही पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्य़ाला स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन व पूर नियंत्रण आराखडे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आराखडय़ांमध्ये संभाव्य पूरस्थिती, हानी होणारे भाग, नदीलगतची गावे, पूरकाळात मदतीसाठी बोटी-होडय़ांसह प्रशिक्षित मदतनीस, अट्टल पोहणारे, लगतची हॉस्पिटल्स, अ‍ॅम्ब्युलन्स, स्वयंसेवी संघटना याची इत्थंभूत माहिती संकलित करणे अपेक्षित आहे. याशिवाय अचानक पूरस्थिती उद्भवल्यास कोणती उपाययोजना करता येईल यासाठी ‘मॉकड्रिल’ केली जावीत अशीही अपेक्षा आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ांनी यापूर्वी असे आराखडे केले आहेत. तथापि, मान्सून या वर्षी आठवडाभर आधीच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाचे आगमन लवकर झाल्यास आणि याच काळात पूरस्थिती निर्माण झाली, तर आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ानुसार तातडीची मदत देता यावी यासाठी आढावा बैठका घेण्यात येत आहेत. पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे या पाच जिल्ह्य़ांमधील मान्सूनच्या तयारीचा आढावा येत्या २२ मे रोजी मुंबईतील सह्य़ाद्री अतिथिगृहात घेण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत हा आढावा घेतला जाणार आहे.