Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

क्लिष्ट मतदान प्रक्रियेमुळे ४५ टक्के मतदारांची मतदानाकडे पाठ
पुणे, १५ मे/ प्रतिनिधी

 

मतदान न करणाऱ्यांपैकी सुमारे ४५ टक्के मतदारांनी यादीत नाव नसल्यामुळे व नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया विलक्षण किचकट असल्यामुळे मतदान केले नसल्याचे स्पष्टीकरण मतदारांनी दिले आहे, अशी माहिती रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी विनय सहस्रबुद्धे, रवींद्र साठे, यशवंत ठकार, रत्नाकर पाटील उपस्थित होते.
एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पुणे शहर, मुंबई, ठाणे या भागांमध्ये खूपच कमी मतदान झाले. या पाश्र्वभूमीवर मतदान न करण्याची कारणे शोधण्यासाठी मतदान न केलेल्या सुमारे पाच हजार मतदारांचे सर्वेक्षण संस्थेमार्फत करण्यात आले होते.
राजकीय पक्षांकडून भ्रमनिरास झाल्याने नैराश्यातून मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्यांची संख्या चौदा ते पंधरा टक्के आहे. मतदान नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, मतदानासाठी इंटरनेटचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबतची शक्यता अजमावून पाहणे आणि राजकीय पक्षांची उमेदवार निवड प्रक्रिया अधिक पारदर्शी व लोकतांत्रिक बनविणे इत्यादी महत्त्वाच्या शिफारसी या संदर्भातील अहवालात प्रबोधिनीने केल्या आहेत. या अहवालाचे प्रकाशन आज पत्रकार परिषदेत झाले.
मतदारनोंदणीसाठी पोस्ट ऑफिस व राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमधून बारमाही यंत्रणा, राजकीय पक्षांना निवडणूक व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण, मतदानाचा दिवस सार्वजनिक सुटीच्या आसपास येणार नाही हे सुनिश्चित करण्याची निवडणूक आयोगाला सक्ती या मुद्दय़ांचा अहवालाच्या शिफारसीमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती सहस्रबुद्धे यांनी सांगितली.