Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

रोडरोलरच्या वजनाने सहकारनगरमध्ये रस्ता खचला
पुणे, १५ मे/ प्रतिनिधी

 

रस्त्यावरून रोडरोलर गेल्यामुळे रस्ता खचण्याचा प्रकार आज सहकारनगरमध्ये घडला. रोलर गेल्यामुळे या रस्त्याला ४५ चौरस फुटांचा नऊ फूट खोल खड्डा पडला असून, दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनीच या खड्डय़ाभोवती तात्पुरते कुंपण घातले आहे.
सहकारनगर क्रमांक २ मध्ये हा प्रकार आज सायंकाळी घडला. तेथील जनता बँकेसमोरून रोडरोलर जात असताना अचानक रस्ता खचला आणि रस्त्याला नऊ फूट खोलीचा खड्डा पडला, तसेच आतील जलवाहिनीही फुटली. त्यानंतर रस्ता खचत गेला व खड्डा मोठा होत गेला. वरून हा खड्डा ४५ चौरस फुटांचा दिसत असला, तरी रस्ता खचत असल्यामुळे आत मात्र सुमारे २२५ चौरस फुटांचा खड्डा पडल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल माने यांनी सांगितले.
या खड्डय़ाचा धोका लक्षात घेऊन माने यांनी अन्य कार्यकर्त्यांच्या मदतीने संपूर्ण खड्डय़ाच्या बाजूने तेथे लाकडी कुंपण तातडीने घातले. नगरसेवक सुभाष जगताप आणि सहकारनगर कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील केसरी यांनीही या ठिकाणी भेट देऊन जागेची पाहणी केली.