Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘कला जोपासल्यामुळे जीवन समृद्ध होतेच पण मनालाही आनंद होतो’
पुणे, १५ मे/ प्रतिनिधी

 

कोणत्याही क्षेत्रात, कोणतीही व्यक्ती काम करीत असताना ती व्यक्ती कलेचा छंद किती जोपासते, त्यावर त्या कलेचा उच्च दर्जा दिसून येतो. कला जोपासल्यामुळे जीवन समृद्ध होतेच पण मनालाही आनंद होतो, असे विचार भारती विद्यापीठाचे कार्यवाहक विश्वजित कदम यांनी येथे व्यक्त केले.
छायाचित्रकार अतुल वाघ यांनी काढलेल्या कलाकृती, मॉडेल व चित्रांचे बालगंधर्व कलादालनातील प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कदम बोलत होते.
या वेळी चित्रपट दिग्दर्शक सुनील नाईक, निशिकांत दीक्षित, अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, जयराम देसाई उपस्थित होते.
विश्वजित कदम यांनी अतुल वाघ यांच्या कलेचा गौरव केला. अतुल वाघ यांनी कलाकारांच्या अभिनय छटांची बदलती दृश्ये फारच सुरेख पद्धतीने मांडल्याचे सांगून छायाचित्रांची आणि रंग चित्रांची ताकद काय असू शकते, याचा प्रत्यय हे प्रदर्शन पाहून आपणास आला असे ते म्हणाले.
जयराम देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हे प्रदर्शन १५ ते १८ मेपर्यंत बालगंधर्व कलादालनात सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार आहे.