Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

चालकाचे हातपाय बांधून सहा लाखाला लुबाडले
पिंपरी, १५ मे / प्रतिनिधी

 

भोसरीतील उषाकिरण हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी आलेल्या दोघा जणांनी प्रवासी म्हणून बसून चालकाचे हातपाय बांधून त्याला लुबाडले. हा प्रकार बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मोहोळ (जि. सोलापूर) येथे घडला.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागराज कृष्णा माळवी (वय २८, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे तक्रारदार चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माळवी हा गणेश गुलाब पाटील यांच्या इनोव्हा गाडीवर चालक म्हणून काम करतात. त्यांच्या सांगण्यावरून प्रवासी ने-आण करण्याचे काम करतो. पाटील यांना मंगळवारी रात्री आठ वाजता उषाकिरण हॉटेलमधील ग्राहकांचे भाडे असल्याचा दूरध्वनी आला. यावरून त्यांनी चालकास हॉटेलकडे पाठवून दिले. प्रवासी म्हणून बसलेल्या ग्राहकांनी सोलापूर-पनवेल व पुन्हा पुण्यात येण्याचा मार्ग सांगितला. यावरून माळवी याने गाडी हडपसरच्या दिशेने सोलापूरसाठी जाण्यास सुरुवात केली. तेथील एका पेट्रोलपंपावर प्रवाशांनी माळवीला एक हजार रुपये देऊन डिझेल भरण्यास सांगितले. इंदापूरकडे जात असताना रोडवरील एका ढाब्यावर जेवण केल्यानंतर पहाटे एकच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील इंदापूर-टेंभुर्णी मार्गे मोहोळ गावाजवळ प्रवासी लघुशंकेसाठी उतरल्याचा बहाणा करून त्याचे हातपाय स्कार्फने बांधले. त्याच्या ताब्यातील एक मोबाईल, रोख तीनशे रुपये व इनोव्हा गाडी असा सहा लाख एक हजार तीनशे रुपयांचा माल जबरदस्तीने लुटून नेला. अधिक तपास सहायक निरीक्षक सदाशिव जाधव करीत आहेत.
महिलेचे मंगळसूत्र हिसकाविले
भोसरी इंद्रायणीनगर येथील द्वारका प्लॅटिनम सोसायटी गेटजवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे दागिने हिसका मारून चोरून नेले. या प्रकरणी रेखा किशोरकुमार डू (वय २६, रा. द्वारका प्लॅटिनम सोसायटी, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. रेखा डू या त्यांच्या चुलत सासू गिरिजा गजेंद्र डू (वय ४३) यांच्यासमवेत पायी जात होत्या. दरम्यान, पाठीमागून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख पाच हजार रुपयांचा माल चोरून नेला. अधिक तपास फौजदार एस. ए. पेटकर करीत आहेत.
गर्भवती नवविवाहितेची आत्महत्या
भोसरी बालाजीनगर येथे एका गर्भवती नवविवाहितेने सासरच्या छळास कंटाळून पेटवून घेऊन आत्महत्या केली. सासरच्या लोकांना जोपर्यंत अटक करणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच्या भूमिकेने काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. निर्मला सुनील पारवे (वय २०, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या गर्भवती नवविवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी पती सुनील लक्ष्मण पारवे, सासरे लक्ष्मण मोहन पारवे, सासू तोळाबाई लक्ष्मण पारवे, नणंद वैशाली लक्ष्मण पारवे, राणी लक्ष्मण पारवे, दीर अनिल लक्ष्मण पारवे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निर्मलाचा भाऊ लहू छट्टू वाघमारे (वय ३५, रा. अहमदपूर, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. निर्मलाने ९ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास घरामध्ये रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिचा १४ तारखेला रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला नऊ महिन्यांचा एक मुलगा आहे. तिने आत्महत्या केली तेव्हा ती चार महिन्यांची गरोदर होती. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
मोटारसायकलीच्या अपघातात तरुण ठार
नाशिक रोडने काळेवाडीकडे येणाऱ्या तरुणाची मोटारसायकल दुचाकीवर आदळल्याने झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. खुशाल पुनम सिंग (वय ३२, रा. पंचमी हॉटेलमागे, सद्गुरुनगर, भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याचा साथीदार बंगलु रामलखन सिंग (वय २०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कासारवाडी पोलीस चौकीशेजारी सीआयआरटी कंपनीसमोर हा अपघात झाला. सिंग यांची मोटारसायकल समोरून जाणाऱ्या आणखी एका मोटारसायकलीवर आदळून हा अपघात झाला.
विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या
माहेरून पैसे आणावेत या कारणासाठी विवाहितेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सांगवी पोलिसांनी पतीसह मामा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरती सुरेश बावीसकर (वय २१, का. डीसोजा बिल्डिंग, रहाटणी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी पती सुरेश दौलत बावीसकर (वय २५) व मामा राजू सुरेश सोनावणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बारा मे रोजी सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या दरम्यान आरतीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. अधिक तपास फौजदार यू. एस. वाळके करीत आहेत.