Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पोलिसांच्या बदल्यांच्या बाबतीत खात्याचे पितळ उघडे
पुणे, १५ मे / प्रतिनिधी

 

आचारसंहितेनंतर काढलेल्या पोलिसांच्या बदल्यांचे आदेश, त्यात कोणतेही स्पष्ट नसलेले कारण, गोंधळाची स्थिती यामुळेच खात्याने केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मॅटने रद्द केल्याने पोलीस खात्याचे पितळ उघडे पडले आहे. महाराष्ट्रातील २८० पैकी सुमारे शंभर पोलीस अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत बदल्या रद्द झाल्या आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर एक एप्रिल रोजी पोलीस महासंचालनालयाने राज्यातील २८० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात पुणे, नागूपर, औरंगाबाद अन्य ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. विविध ठिकाणच्या साठ पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या आपल्या बदलीच्या आदेशाविरोधात ‘महाराष्ट्र अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रॅब्युनल’मध्ये (मॅट) धाव घेतली.
त्यामुळे सहा एप्रिलला साठ जणांच्या आदेशाला मॅटने स्थगिती दिली. त्यानंतर पोलीस महासंचालनालयाने स्वत:च बदलीचे काढलेले आदेश रद्द करण्याची परवानगी मॅटकडे मागितली. त्यासाठी अर्ज सादर केला. त्याला १४ एप्रिलला न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर मात्र पोलीस खात्याने पुन्हा त्याच अधिकाऱ्यांच्या २२ एप्रिलला म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशी बदलीचे आदेश जारी केले. मात्र त्याची अंमलबजावणी ही २४ एप्रिलला केली. त्या वेळी पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
याबाबत पुण्यासह अन्य ठिकाणच्या बदलीच्या पहिल्या फेरीतील ५० तर दुसऱ्या फेरीतील २६ जणांसाठी न्यायालयात युक्तिवाद करून त्यांचे आदेश रद्द करण्यात अ‍ॅड. पूनम महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच पोलीस अधिकाऱ्यांच्या अचानक झालेल्या बदल्या आणि त्याला मिळणारी स्थगितीच्या प्रकारामागील गौडबंगाल उघडकीस आले.