Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

दूषित पाण्यामुळे काविळीच्या साथीची शक्यता
चाकण, १५ मे / वार्ताहर

 

भोसे (ता. खेड) येथे दूषित पाणी पुरवठय़ामुळे काविळीच्या साथीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून, गावामध्ये एक काविळीचा रुग्ण आढळला आहे. येथील प्रशासन मात्र अद्यापही जागे झाले नसून, कुठल्याही स्वरुपाच्या उपाययोजना केल्या नसल्याने येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
मागील चार ते पाच महिन्यांपासून भोसे (ता. खेड) येथील दलित वस्तीतील पाणी पुरवठय़ाची दहा हजार लिटर क्षमतेची टाकी स्वच्छ न केल्याने ही परिस्थिती उद्भवली असण्याची शक्यता येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अनेक महिन्यांपासून स्वच्छ न केलेली पिण्याच्या पाणी पुरवठय़ाची टाकी, या टाकीलगत असलेल्या सार्वजनिक शौचालयांची झालेली दुरवस्था, गटारांजवळून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या यामुळेच काविळींसारख्या आजारांनी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या या टाकीची स्वच्छता करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे काविळीसारखे साथीचे प्रकार व काविळीची लागण झाल्याची संतप्त भावना येथील गावचे माजी पोलीस पाटील सुनील ओव्हाळ यांनी व्यक्त केली आहे.
या सर्व प्रकारासंदर्भात खेड पंचायत समिती, जिल्हा परिषद व आरोग्य प्रशासनास ग्रामस्थांच्या सहाय्याने निवेदन देऊन सनदशीर मार्गाने निषेध करणार असल्याचेही येथील ग्रामस्थांनी सांगितले.
भोसेत दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. या संदर्भात भोसे ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता त्यांनी गावाला स्वच्छ पाणी पुरवठाच होत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गावातील दलित वस्तीसाठी करण्यात आलेल्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेतील विहिरीचे पाणी स्वतंत्र जलवाहिनीच्या माध्यमातून नेले जात असून, या वस्तीला मात्र नियमित पाणी पुरवठय़ापासून वंचित ठेवले जात असल्याबाबत रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव जाधव, अशोक गोतारणे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.