Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

बारामतीकरांना उत्सुकता माढय़ाच्या निकालाची !
बारामती, १५ मे/वार्ताहर

 

बारामती तालुका आणि जवळच्या परिसरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित असला, तरी ‘माढा’ मतदारसंघातून शरद पवार विजयी होणार की नाही, याबाबत अधिक उत्सुकता आहे.
उद्या संपूर्ण देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी शरद पवार निकालानंतर नेमकी काय भूमिका घेणार आहेत, याकडे सर्वाचेच लक्ष लागून आहे.
‘माढा’ मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे किती मते घेणार याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच, शरद पवार यांना किती मते व किती मताधिक्य मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये व बारामतीकरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर उत्सुकता आहे.
या संदर्भात बारामती व तालुका परिसरातील राजकीय रसिकांनी मोठमोठय़ा पैजा लावल्याचे दिसून येते.
यंदा धक्कादायक निकाल लागतील अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा असल्याचे दिसते. मातब्बर नेते अडचणीत येतील. भाजप पुन्हा बाजी मारेल, की महादेव जानकर विजयी होतील, अशा चर्चा सुरू आहेत.
शरद पवार माढय़ातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील, की त्यांच्या कन्या बारामती मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने नवा इतिहास घडवतील, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. त्यात पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असून, त्याबाबत सर्वच पातळ्यांवर जाहीर चर्चा झाली आहे.
‘साहेब’ नक्कीच काहीतरी चमत्कार घडवतील किंवा महाराष्ट्रामध्ये केल्याप्रमाणे पुरोगामी लोकशाही दलासारखा प्रयोग केंद्रामध्येही करून ते पंतप्रधान पद मिळवण्यात यशस्वी होतील काय? अशा पैजासुद्धा लागल्या आहेत. आता निकाल असल्यामुळे अशा राजकीय चर्चाना अधिक उधाण आले आहे.
केंद्रात भाजपप्रणीत मित्रपक्षाचे सरकार येणार की काँग्रेसप्रणीत सरकार येणार, या संदर्भात अनेक मते व्यक्त होत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या असल्याने कार्यकर्त्यांमध्ये त्याबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, पुणे जिल्हय़ात फक्त बारामती वगळता शिरूर, मावळ व पुणे या ठिकाणी तर कोण बाजी मारणार, याबाबत बारामतीकरांमध्ये अधिक उत्सुकता दिसत आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मित्रपक्षांचे केंद्रात सरकार आले तरी पुन्हा बारामतीत लाल दिव्याची गाडी येणार हे निश्चित, अशीही चर्चा ऐकिवात आहे.