Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

एसटी गाडय़ा अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल
बेल्हे, १५ मे / वार्ताहर

 

नारायणगाव एस. टी. आगाराने मुक्कामी जाणाऱ्या एस. टी. गाडय़ा गुरुवारी अचानक रद्द केल्याने घरी पतरणाऱ्या प्रवाशांचे आतोनात हाल झाले. पर्यायी खासगी वाहने उपलब्ध होऊ न शकल्याने प्रवाशांना ऐन लग्न सराईत बसस्थानकावरच रात्र काढावी लागली. हा प्रकार बेल्हे, अणे, आळेफाटा, बसस्थानकावर घडला.
नारायणगाव एस. टी. आगाराने पोखरी (ता. पारनेर) येथे जाणारी पुणे-पोखरी (नारायणगाव एस. टी. आगाराची) एसटी अचानक रद्द केल्याने पोखरी (ता. पारनेर) परिसरात पळसपूर, कन्हेर, काटालवेहे नळावणे, शिंदेवाडी, अणे, गुळुंचवाडी, कामरवाडी, वारणवाडी आदी गावात जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. गुरुवारी सामुदायिक विवाहाच्या निमित्ताने आलेल्या या गावच्या लोकांना मुक्कामी एस. टी. रद्द झाल्यानंतर घरी परतण्यासाठी पर्यायी खासगी वाहने उपलब्ध होऊ शकली नाहीत. बेल्हे, आळेफाटा, अणे बसस्थानकांच्या शेडचा आसरा घेत प्रवाशांनी रात्र काढली. गैरसोय झालेल्या प्रवाशांमध्ये महिला तसेच बालकांची संख्या मोठी होती.
चौकशी करणाऱ्या प्रवाशांना एसटी येईल, असे सांगितले जात होते. रात्री साडे नऊ वाजता काही ग्रामस्थांनी पुणे-पोखरी या मुक्कामी गाडीविषयी नारायणगाव बसस्थानक प्रमुखांकडे चौकशी करण्याची विनंती आमच्या प्रतिनिधीकडे केली. त्यानंतर ती गाडी पुण्याला जाण्यापूर्वी दुरूस्तीकरिता आगारातील तंत्रविभागाकडे केली ती अद्याप दुरुस्त होऊन परतली नाही. त्यामुळे आज (दि. १४) पोखरी मुक्कामी जाणार नसल्याचे सांगितले. दरम्यान आळेफाटा, बेल्हे, अणे बसस्थानकावर पोखरी परिसरात जाणारे अनेक प्रवाशी त्या गाडीची वाट पाहत आहेत. त्याप्रवाशांच्या सोयीकरिता आगाराकडून पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊ शकेल का? अशी विचारणा केली असता, नारायणगाव एस. टी. आगाराचे आगारप्रमुख, बसस्थानक प्रमुख या जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगून दिलगीरी व्यक्त केली.