Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘विज्ञाननिष्ठ समाजाचे स्वप्न आजही अपुरे’
पुणे, १५ मे/खास प्रतिनिधी

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पाहिलेले विज्ञाननिष्ठ समाजाचे स्वप्न आजही अपुरे आहे. आधुनिक म्हणविणाऱ्या समाजामध्ये विज्ञाननिष्ठा किती आहे, याचा विचार करण्याची गरज आहे, असे आवाहन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे डॉ. नारळीकर यांना विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विज्ञाननिष्ठा प्रसिद्ध होती. त्यामुळेच त्यांचे अनुयायी नागेश आठवले यांच्या स्मरणार्थ मालतीबाई आठवले यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आचार्य सुधाकर देशपांडे, मालतीबाई देशपांडे आदी उपस्थित होते. क्रांतिगीता महाबळ यांनी स्वागत केले, तर राजेंद्र वऱ्हाडकर यांनी आभार मानले.
समाजातील तथाकथित आधुनिकता व प्रसिद्धीमाध्यमांकडून अंधश्रद्धेला घातले जाणारे खतपाणी यावर डॉ. नारळीकर यांनी टीका केली. ते म्हणाले की, ‘स्वत:ला आधुनिक म्हणवून घेतानाही प्रत्यक्षामध्ये अंधश्रद्धा वाढीस लागते आहे. त्याला प्रसिद्धीमाध्यमांचाही हातभार लागत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आडाखे लावून खरोखरीच आपला समाज विज्ञाननिष्ठ आहे काय, याची तपासणी करावी.’