Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पिपरी पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे संतोष बारणे
राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीसाठी ‘राजकारण’
पिंपरी, १५ मे / प्रतिनिधी

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे तरुण नगरसेवक संतोष बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेतेपदाची जवळपास १५ महिन्यांची ‘बहुचर्चित’ कारकीर्द पूर्ण करणाऱ्या मच्छिंद्र तापकीर यांचे खांदेपालट करताना सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोयीचे राजकारण केले आहे.
महापौर अपर्णा डोके यांनी एका पत्रकार परिषदेत बारणे यांच्या नियुक्तीची आज घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव, मावळते विरोधी पक्षनेते मच्िंछद्र तापकीर, नगरसेवक बाबू नायर, सनी ओव्हाळ, कामगार आघाडीचे नेते कैलास कदम आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुरेश कलमाडी यांच्या सूचनेनुसार भोईर यांनी संतोष बारणे यांच्या नावाची शिफारस केली. बारणे यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळावी, यासाठी तापकीर यांनी सर्वाधिक प्रयत्न केले. बारणे हे २००७ मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत.
थेरगाव येथील जय गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष, रॉयल स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद मुळशी शाखेचे अध्यक्ष, प्रगती शिक्षण संस्थेचे संस्थापक, आर. एन. बी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष म्हणून बारणे काम पाहत आहेत.
बारणे यांच्या नियुक्तीमागे थेरगावचे पर्यायाने चिंचवड विधानसभेचे राजकारण आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून संतोष बारणे यांना पालिका निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. त्यांच्या राजकीय ताकतीमुळे संतोष बारणे थेरगावातून निवडूनही आले होते. नंतरच्या काळात दोहोंमध्ये बरेच मतभेद झाले. त्यानंतर संतोष बारणे यांची भोईर यांच्याशी जवळीक निर्माण झाली. श्रीरंग बारणे आणि भोईर हे दोघेही विधानसभेसाठी तीव्र इच्छुक आहे.
श्रीरंग बारणे यांची शिवसेनेची वाट धरली असल्याने काँग्रेसची उमेदवारी आता आपल्यालाच मिळेल, असा विश्वास भोईर यांना वाटतो आहे. त्यामुळे निवडणूक काळात थेरगावात श्रीरंग बारणे यांचा प्रभाव कमी करता यावा, यासाठीच राष्ट्रवादीने संतोष बारणे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ घालण्यात आल्याचे मानले जात आहे.