Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

उत्कंठा शिगेला
पुणे, १५ मे / खास प्रतिनिधी

कोण निवडून येणार.. पुण्यात काय होणार.. शिरूरचे काय हो.. मावळात नक्की ‘सीट’ कोणाची बसणार.. बारामतीचे मताधिक्य किती असेल.. सांगली, कोल्हापुरात काय होईल आणि पश्चिम महाराष्ट्रात काहीच सांगता येत नाही, फारच बंडखोरी झाली बुवा!
..गेले बावीस दिवस सुरू असलेल्या या आणि अशा चर्चा तसेच निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शमणार आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी घरचे देव पाण्यात ठेवून देवदर्शन केले.

नगरसेवकाचे अतिक्रमण अखेर भुईसपाट
पिंपरी, १५ मे/ प्रतिनिधी

प्राथमिक शाळेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली राष्ट्रवादीचे फुगेवाडी येथील नगरसेवक सूरदास गायकवाड यांच्या मालकीची प्रचंड मोठी इमारत उच्च न्यायालयाने तंबी दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज दिवसभरात भुईसपाट केली. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड. पद्मिनीराजे मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल के ली होती. सुनावणीनंतर इमारत पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

समस्या नव्हे; संपत्ती!
अभिजित घोरपडे
पुणे, १५ मे

ओल्या कचऱ्यापासून घरोघरी इंधननिर्मिती करता येते, खतनिर्मिती होऊ शकते, तो स्वत:हून कुंडीत किंवा बागेत जिरवला तर महापालिकेच्या मिळकत करातून पाच टक्क्य़ांपर्यंत सूटसुद्धा मिळवता येते आणि सुका कचरा तर पैसा मिळवून देतोच.. कचरा योग्यप्रकारे हाताळला तर ती समस्या न राहता संपत्ती बनू शकते, याचीच ही काही उदाहरणे!

मान्सूनचे वेध लागल्याने प्रशासन होतंय सज्ज!
पुणे, १५ मे / खास प्रतिनिधी

मान्सूनचे आगमन या वर्षी आठवडाभर आधीच होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने राज्य सरकारने पूर आणि पुनर्वसनाची तयारी आतापासूनच चालविली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ाचा आपत्ती व्यवस्थापनाचा स्वतंत्र आराखडा करण्याच्या सूचना देतानाच मान्सूनच्या तयारीसाठी आढावा बैठकही बोलाविली आहे.

काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता
‘डीएमआरसी’चे सर्वेक्षण
पुणे, १५ मे / प्रतिनिधी
पंधराव्या लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीच्या मतपेटीतून उद्या (शनिवारी) अनेक मातब्बरांचे भवितव्य ठरणार असल्याने राजकीय पक्षांच्या सत्तास्थापनेचे चित्रही स्पष्ट होणार असले तरी त्यापूर्वी करण्यात आलेल्या निरीक्षणातून केवळ काँग्रेसला सर्वाधिक १७८ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) २२३ जागा मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पिंपरी पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे संतोष बारणे
राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीसाठी ‘राजकारण’

पिंपरी, १५ मे / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे तरुण नगरसेवक संतोष बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेतेपदाची जवळपास १५ महिन्यांची ‘बहुचर्चित’ कारकीर्द पूर्ण करणाऱ्या मच्छिंद्र तापकीर यांचे खांदेपालट करताना सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोयीचे राजकारण केले आहे.

चिन्मय पाटसकर यांना ‘किरण पुरस्कार’
पुणे, १७ मे/प्रतिनिधी

संगीत आणि गद्य रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी किरण भोगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी रंगभूमीतर्फे देण्यात येणारा ‘किरण पुरस्कार’ संगीत नाटय़ अभिनेते चिन्मय पाटसकर यांना ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते १७ मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे.दीप्ती भोगले आणि कीर्ती शिलेदार यांनी आज ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. हा पुरस्कार वितरण सोहळा आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. पाच हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या वेळी मराठी रंगभूमीतर्फे चिं. त्र्यं. खानोलकर लिखित ‘संगीत अभोगी’ या नाटकाचे संगीतमय अभिवाचन करण्यात येणार आहे. नाटकाच्या मूळ प्रयोगातील शरद गोखले, दीप्ती भोगले, वर्षां जोगळेकर आणि कीर्ती शिलेदार हे कलाकार नाटकाचे अभिवाचन करणार आहेत. निनाद जाधव, सुदीप सबनीस, गजानन खळदकर आणि शशिकांत नाफडे हे कलाकार त्यात सहभागी होणार आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.

रेल्वे तिकिटांच्या तत्काळ आरक्षणासाठी नवे संकेतस्थळ
पुणे, १५ मे/ प्रतिनिधी

रेल्वे, बस विमानाची ई-तिकिटे, ऑनलाइन शॉपिंग मोबाइलचे ऑनलाइन रिचार्ज आणि वित्तीय सेवा देणाऱ्या मुंबईतील ‘ओएसएस’ या समूहाने इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीबरोबर ‘रेल पोर्टल’ सुरू केले आहे. www.railticketonline.com या संकेतस्थळावर रेल्वे तिकिटांचे तत्काळ आरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ग्राहकांना या संकेतस्थळावर मोफत नोंदणी करून सदस्यत्व मिळवता येईल. सध्या या संकेतस्थळावरून २५ हजार रेल्वे तिकिटांची विक्री केली जात आहे. दर दिवशी या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या तीस ते पस्तीस हजार आहे.

‘फॅशन टेक्नॉलॉजी’च्या इमारतीवर दगडफेक
पुणे, १५ मे / प्रतिनिधी

‘पंढरपूरची वारी’ या विषयावर फॅशन शो आयोजित केल्याच्या निषेधार्थ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ‘स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’वर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. कर्वेनगर येथे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. वारजे माळवाडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात सहा ते सात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल केला. संस्थेचे संचालक जयंत केळकर यांनी याबाबत फिर्याद दिली. संस्थेच्या ‘स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’च्या वतीने मंगळवारी ‘पंढरपूरची वारी’ या विषयावर आधारित एका फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत काही वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अभ्यासक्रमाविषयी माहिती घेण्याच्या बहाण्याने दुपारी साडेतीनच्या सुमारास काही व्यक्ती संस्थेच्या आवारात घुसल्या आणि दगडफेक करून पसार झाले. दगडफेकीमध्ये संस्थेच्या इमारतीच्या सहा काचा फुटल्या, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

‘सेंट गोबेन सेक्युरिट’मधील कामगारांना वेतनवाढ
पुणे, १५ मे/ प्रतिनिधी

सेंट गोबेन सेक्युरिट इंडिया लि. या बहुराष्ट्रीय उद्योगसंस्थेत महाराष्ट्र लेबर युनियनच्या पुढाकाराने वेतनवाढीचा करार करण्यात आला असून, यानुसार दोनशे कामगारांना साडेचार ते पाच हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. महाराष्ट्र लेबर युनियनचे अध्यक्ष राजन नायर यांनी आज ही माहिती दिली. युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर तीन वर्षांसाठी हा करार करण्यात आला. या करारानुसार कामगारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साडेचार ते पाच हजार रुपये वेतनवाढ, वीस टक्के बोनससह ३ हजार २५० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. तसेच कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता संगणक देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे.

‘रायरीकर यांची चळवळ सामान्यांपर्यंत पोहोचविणे हीच खरी श्रद्धांजली’
पुणे, १५ मे/प्रतिनिधी

श्रीपाद रायरीकर यांनी आपल्या सकारात्मक कार्याने ज्येष्ठ नागरिकांच्या चळवळीला वाढविण्याचे काम केले. त्यांनी वाढविलेली ही चळवळ अधिक वेगाने जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत माजी केंद्रीय प्रधान सचिव भालचंद्र देशमुख यांनी रायरीकर यांना श्रद्धांजली वाहिली. अथश्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. शरदचंद्र गोखले, राम बेलवंडी, वसंतराव रत्नपारखी, श्रीकांत परांजपे यांनी रायरीकर यांना आदरांजली वाहिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी रायरीकर यांच्या कार्यकुशलतेसंबंधी आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाच्या अखेरीस विद्या पंढरपुरे यांनी गीता श्लोक पठण केले.

जेठमलानी यांच्या पुतळ्यास मनसेचे ‘जोडे मारो’ आंदोलन
पिंपरी, १५ मे / प्रतिनिधी

अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दहशतवादी संबोधल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या िपपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आज जेठमलानी यांच्या पुतळ्यास ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना जेठमलानी यांनी काल राज ठाकरे यांचा उल्लेख स्थानिक दहशतवादी केला होता. त्या व्यक्तव्यच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष मनोज साळुंके यांच्या नेतृत्वाखाली दुपारी चारच्या सुमारास पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. संजय मरकळ, सुनील शिंदे, अशोक सुभेदार, आशा बोरकर, आनंदा बदाले, विजय पानकर, बाबा जगताप, सुनील हातणकर आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

वीज दरवाढीबाबत पुण्यातील सुनावणी २९ जूनला
पुणे, १५ मे/प्रतिनिधी

वीज दरवाढीबाबत ‘महावितरण’कडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर आठ जूनपर्यंत नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या असून, याबाबतची पुण्यातील सुनावणी २९ जूनला होणार आहे. ‘महावितरण’ने राज्य वीज नियामक आयोगाकडे नुकताच वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर आयोगाकडून विविध भागांत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. २९ जूनला सकाळी ११ वाजता विधान भवनामध्ये पुण्यातील सुनावणी होणार आहे. अर्जाद्वारे सूचना व हरकती देण्यासाठी प्रस्तावाच्या प्रती महावितरणच्या शहर व जिल्ह्य़ातील विभागीय, मंडल, परिमंडल कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी लेखी अर्ज व आवश्यक तेवढी रक्कम जमा करावी लागणार आहे.

सूर्यकांत पाठक यांना ‘वीर सावरकर सेवा पुरस्कार’
पुणे, १५ मे/प्रतिनिधी

टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास मंडळ (डोंबिवली) या संस्थांच्या वतीने ‘वीर सावरकर सेवा पुरस्कार’ या वर्षी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांना देण्यात येणार आहे. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक कमी किमतीमध्ये ७५ हजार घरांपर्यंत पोहोचविण्याचे काम पाठक यांनी केले आहे. हा पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ रविवारी (दि.१७) डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या पेंढारकर सभागृहात होणार आहे. डॉ. अशोक मोडक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

लोकसभेच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष
पुणे, १५ मे/ प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणूक निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. काही तासांमध्ये निकाल समोर येणार आहेत, परंतु मोहन परांजपे यांनी कृष्णमूर्ती ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून त्यानुसार महाराष्ट्रातील ४८ जागांचा अंदाज बांधला आहे. शिवसेना हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा म्हणजे १४ जागा जिंकेल. त्यापाठोपाठ काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ९, भारतीय जनता पक्ष ९ व इतर पक्षांना ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे, असे मोहन परांजपे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. पुण्यामध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी पाच ते दहा हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील तर मावळमधून शिवसेनेचे गजानन बाबर, शिरूर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव-पाटील, बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विजयी होतील, असे परांजपे पुढे म्हणाले.

पिंपरीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आयुक्तांचे आवाहन
पिंपरी, १५ मे / प्रतिनिधी

िपपरी-चिंचवड महापालिकेच्या ब प्रभाग कार्यक्षेत्रातील अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन आयुक्त आशिष शर्मा यांनी संबंधित नागरिकांना केले आहे.येत्या १४ जूनपर्यंत ही अतिक्रमणे न काढल्यास १५ तारखेला अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. पिंपरी कँप येथील बी ब्लॉक गल्ली क्रमांक १२, २० आणि २८, शगून चौक ते डिलक्स चौक या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. विकास आराखडय़ानुसार रस्त्यावर अतिक्रमण करून केलेल्या बांधकामांबाबत नगररचना विभागाकडून निशाणी करण्याचे काम ३० मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर १४ जूनपर्यंत नागरिकांनी स्वत:हून काम करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार
चाकण, १५ मे/वार्ताहर

पुणे-नाशिक महामार्गावर हॉटेल भरत लॉजजवळ गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातामध्ये दुचाकीस्वार स्वत:च्याच दुचाकीमध्ये अर्धवट अडकून ठार झाला. बापू गुणाजी गायकवाड (रा. ठाकूर िपपरी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक रस्त्यावर रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांना एका निनावी दूरध्वनीद्वारेअपघाताची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता बापू गायकवाड हे आपल्या दुचाकीत अर्धवट अडकलेल्या अवस्थेत सापडले. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला, अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार नवनाथ सरमाने यांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर बनकर, शंकर भवारी व त्यांचे सहकारी करीत आहेत.

नायब तहसीलदारावर कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडे, १५ मे / वार्ताहर

वडगाव-मावळचे नायब तहसीलदार चंद्रकांत जाधव हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत नाहीत, तसेच बेजबाबदार वक्तव्य करून पदाचा अपमान करतात. असा आरोप भ्रष्टाचार विरोधी दक्षता समितीचे पुणे जिल्हा संघटक - सतीश शेट्टी यांनी केला आहे. अशा मनमानी नायब तहसीलदाराविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करून पदावरून हकालपट्टी करावी. अशी लेखी मागणी शेट्टी यांनी तहसीलदार सचिन बारवकर यांचेकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एका व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश तहसीलदार यांनी देऊनही नायब तहसीलदार जाधव यांनी कार्यवाही केली नाही.