Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

राज्य

निवडणूक निकालाबाबत उत्कंठा शिगेला!
खास प्रतिनिधी
रत्नागिरी, १५ मे

तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाबाबत कोकणात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश आणि भूतपूर्व राजापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर चार वेळा निवडून गेलेले खासदार सुरेश प्रभू यांच्यात मुख्य लढत आहे. त्या व्यतिरिक्त बहुजन समाज पार्टीचे डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्यासह आणखी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महाडमधील प्रांजल जाधवचा संशयास्पद मृत्यू
महाड, १५ मे/वार्ताहर

प्रभात कॉलनीमध्ये राहणाऱ्या प्रांजल जाधव (२४) या विवाहित तरुणीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. यासंबंधीची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून प्रांजलचा पती, सासू आणि सासरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, प्रांजलचे वडील विजय उतेकर (रा. तुर्भे, ता. पोलादपूर) यांनी आपल्या मुलीला सासरच्या मंडळींनी ठार मारले असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

मायनिंगच्या टाकाऊ डंपिंगमुळे रेडीपासून गोव्यापर्यंतची किनारपट्टी धोक्यात
सावंतवाडी, १५ मे/वार्ताहर

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील सागरीकिनाऱ्यावर मायनिंगच्या टाकाऊ डंपिंगमुळे रेडी ते गोवा हरमल या समुद्रकिनाऱ्यालगतचे पाणी लाल गढूळ व दूषित बनले आहे. गोवा सरकारने त्याची नोंद घेतली असली तरी महाराष्ट्र सरकारचे प्रदूषण नियंत्रण खाते व सागरी विभाग गप्प आहे. त्यामुळे समुद्राच्या जीवसृष्टीवर परिणाम होत आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी या सागरीकिनाऱ्यावर बंदर आहे. या बंदरातूनही लोहखनिज चीनसारख्या देशात निर्यात केले जाते.

नागपूरला पावसाचा तडाखा; वीज पुरवठा खंडित
नागपूर, १५ मे / प्रतिनिधी

उद्या होणाऱ्या लोकसभा मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना पारासुद्धा भडकलेलाच आहे. मात्र मधुनच वातावरण बदलत असून आज सलग दुसऱ्या दिवशी नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्य़ांना वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. अनेक भागात गाराही पडल्या. वादळामुळे वीज वाहिन्यांमध्ये बिघाड आल्यामुळे शहराच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला.
विदर्भातील अनेक भागात बुधवारपासून सायंकाळनंतर पावसाची हजेरी लागत आहे. दिवसभर कडक उन्हं असते. तापमान वाढलेलेच आहे. मात्र गेल्या दोन दिवसात सायंकाळनंतर आकाश काळ्या ढगांनी दाटून येते. सोसाटय़ाचा वारा सुटतो आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होते. नागपुरात आजही दुपारी ४ वाजतानंतर असेच वातावरण बदलले आणि सोसाटय़ाचा वारा सुटून धुळीचे लोट आकाशात उठले. तासभर वारा झपाटल्यासारखा वाहत होता. त्यामुळे झाडांची पाने सर्वत्र विखुरली. मातीचे लोळ आकाशात उठले. विजा कडाडल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तासभर पाऊस बरसत होता. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प पडली. अनेक भागात घरावरील पत्रे, वस्त्र उडून गेली. वाऱ्यामुळे काही भागात वृक्ष उन्मळून पडले. प्रतापनगर चौकात ३३ के.व्ही. वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्या.

आरोग्य विद्यापीठाचा २५ रोजी पदवीदान समारंभ
नाशिक, १५ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आठव्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन येत्या २५ मे रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमास नामवंत ऱ्हदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे प्र-कुलपती तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. येत्या २५ तारखेला सकाळी १०.३० वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात विद्यापीठाच्या आठव्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. कार्यक्रमप्रसंगी डॉ. बी. के. गोयल हे स्नातकांपुढे दीक्षांत भाषण करणार करतील. कार्यक्रमात आरोग्य विज्ञान पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहेत. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी केले आहे.