Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

क्रीडा

पंजाबचा दिल्लीला पंच
ब्लोम्फोनटेन, १५ मे/ वृत्तसंस्था

उपान्त्य फेरीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहा विकेट्स आणि पाच चेंडू राखून पराभूत करीत जोरदार ‘पंच’ लगावला आहे. वेगवान गोलंदाज ब्रेट लीने अवघ्या १५ धावांत तीन बळी घेत दिल्लीचे कबंरडे मोडले. तर यष्टीरक्षक कुमार संगकारा आणि इरफान पठाण यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा अखेरच्या षटकांत समाचार घेत पंजाबला विजय मिळवून देत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले. दिल्लीचे ११ सामन्यानंतर १६ गुण असून त्यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे, तर पंजाबचे १२ सामन्यानंतर सहा विजयासह १२ गुण झाले असून ते सहाव्या स्थानावर आहेत. बेट्र लीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

टार्गेट लास्ट
चेन्नई सुपरकिंग्ज आज मुंबईशी भिडणार
पोर्ट एलिझाबेथ, १५ मे/ पीटीआय
सलग पाच विजयानंतर बंगळुरूकडून अनपेक्षितरीत्या पराभव स्वीकारावा लागल्याने उद्याच्या मुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना जिंकून उपान्त्य फेरीत पोहोचण्यासाठी महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ प्रयत्नशील असेल. या दोन्ही संघामधील पहिल्या सामन्यात मुंबईने चेन्नईला पराभूत केले होते. त्याचा परिणामही उद्याच्या सामन्यावर होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंतच्या ११ सामन्यांमध्ये चेन्नईचे १३ गुण असून त्यांना उपान्त्य फेरीत टेन्शन न घेता पोहोचायचे असेल तर त्यांना उद्याचा सामना जिंकावा लागेल. उद्याच्या सामन्यात पराभव झाल्यास त्यांना उर्वरित दोन सामने जिंकावेच लागतील. तर मुंबईचा संघ उपान्त्य फेरीत पोहोचेल का, या प्रश्नाचे उत्तर बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या जय-पराभवावर अवलंबून आहे.

डेक्कनपुढे कोलकाता चार्ज होईल?
जोहान्सबर्ग, १५ मे/ पीटीआय

दिल्ली डेअर डेव्हिल्सविरूद्धच्या लढतीत हातात आलेला सामना अवघ्या १२ धावांनी गमवावा लागल्याने उद्याच्या सामन्यात बेजान केलकाता नाइट रायडर्सला नमवून उपान्त्य फेरीसाठीच्या मार्गावर परतण्यासाठी डेक्कन चार्जर्सचा संघ आतुर असेल. तर फक्त तीन गुण गाठीशी असलेला कोलकाता आत्तातरी चार्ज होईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ११ सामन्यानंतर १२ गुण गाठीशी असल्याने डेक्कनला उपान्त्य फेरी गाठण्यासाठी पुरेशी संधी आहे.

‘मंत्र’मुग्ध सामन्यात राजस्थानची मुंबईवर मात
दरबान, १४ मे / वृत्तसंस्था

किंग्समिड स्टेडियमवर प्रचंड तणावाचे वातावरण.. राजस्थान रॉयल्सची शिल्पा शेट्टी आणि मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी मंत्र पुटपुटत संघांच्या विजयाची अपेक्षा करताना.. अखेरच्या षटकात ४ धावांची गरज आणि विजयाचे दान कुणाच्या पदरात पडणार याची प्रत्येकालाच उत्सुकता.. अखेरचे षटक टाकण्यासाठी शेन वॉर्नने मुनाफ पटेलकडे चेंडू दिला. खेळपट्टीवर धवल कुलकर्णी आणि हरभजनसिंग. मुनाफने धवलला पहिल्या चेंडूवर धाव काढू दिली नाही.

विनाकारण घबराट!
दरबान, १५ मे/ वृत्तसंस्था

शेवटच्या षटकात आमच्या खेळाडूंमध्ये विनाकारण घबराट निर्माण झाली. त्याचा परिणाम आमचे दोन खेळाडू धावबाद होण्यात झाला आणि आम्ही सामना गमावला, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गुरुवारी रात्री दोन धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर सचिन पत्रकारांशी बोलत होता. तो म्हणाला की, राजस्थान रॉयल्सने दिलेले उद्दिष्ट आमच्या आवाक्यात होते. पण अखेरच्या षटकात दडपणाखाली आमचे खेळाडू धावबाद झाले.

सचिनशी झुंजायचे होते !
दरबान, १५ मे, वृत्तसंस्था

आयपीएल स्पर्धेत सचिन तेंडुलकरविरुद्ध खेळण्याची पुन्हा संधी मिळणार नाही म्हणून शेन वॉर्न मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात जखमी असूनही खेळला, असे राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक संचालक डॅरन बेरी यांनी सांगितले.दुखापतीमुळे शेन वॉर्नला स्पर्धेतील उर्वरीत सामन्यांत न खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शुक्रवारी झालेल्या लढतीत शेन वॉर्न मैदानात उतरल्याने सर्वानाच आश्चर्य वाटले.

दडपणाखाली गडबडलो- पोलॉक
दरबान, १५ मे/ पीटीआय

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात संघ उत्तमरीत्या खेळत होता. पण त्यानंतर दडपणाखाली आम्ही गडबडलो. त्यावेळी संघाला चांगला खेळ करणे जमले नाही आणि आम्हाला पराभवाचे तोंड पाहावे लागले, असे मत मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक शॉन पोलॉक याने मांडले. शेवटच्या षटकामध्ये आमच्यापेक्षा विजय फक्त एक फटका दूर होता. क्षेत्ररक्षकांच्या वरून जर एखादा फटका आमच्या फलंदाजाने लगावला असता तर राजस्थानचा पराभव झाला असता. पण दडपणाखाली तळातील चारही फलंदाजांना एक फटका लगावता आला नाही आणि मुंबईच्या पदरात पराभव पडला, असे पोलॉकने सांगितले.

आयपीएलमध्ये ‘फिक्सिंग’
जावेद मियाँदादचा आरोप
कराची, १५ मे/ वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत निकालानिश्चिती (फिक्सिंग) होत असल्याचा संशय पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी व्यक्त केला आहे. येथील ‘एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राशी बोलताना मियाँदाद यांनी सांगितले, की इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत काही सामन्यांचे अनपेक्षित निकाल लागले आहेत. काही संघ जिंकण्याच्या मार्गावर असताना पराभूत झाले आहेत.

भारताचा दणदणीत विजय
पाचव्या स्थानावर समाधान
कुआंतन (मलेशिया), १५ मे / पीटीआय
आघाडीवीर तुषार खांडेकरने अखेरच्या काही मिनिटांत झळकाविलेल्या दोन गोलच्या बळावर गतविजेत्या भारताने आज जपानचा ५-१ असा पराभव केल्याने सात राष्ट्रांच्या आशिया चषक हॉकी स्पध्रेत त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. खांडेकरने ६४व्या आणि ६९व्या मिनिटाला गोल केले.

युरोपियन बॉक्सिंग स्पर्धेत विजेंदरसह तिघांची पदके निश्चित
युरोपियन बॉक्सिंग
नवी दिल्ली, १५ मे / पी. टी. आय.
बीजिंग ऑलिम्पिकमधील कास्यपदक विजेत्या विजेंदरसिंग याने बीजिंगनंतर प्रथमच रिंगमध्ये उतरून ग्रीसच्या पी. त्रिकालिओटीस याला दोन फेऱ्यांतच नमवून युरोपियन ग्रां. प्रि. स्पर्धेतील आपल्या कास्यपदकाची निश्चिती केली आहे. विजेंदरने दुसऱ्या फेरीत आपल्या प्रतिस्पध्र्यावर ठोशांची एवढी बरसात केली, की रेफरींना त्रिकालिओटीसला ‘अनफिट’ ठरवून लढत थांबवावी लागली.

राज्य रोलबॉल स्पर्धेत पुण्याला तिहेरी मुकुट
पुणे, १५ मे/प्रतिनिधी

औरंगाबाद येथे झालेल्या कुमारांच्या राज्य रोलबॉल स्पर्धेत पुण्यास तिहेरी मुकुट मिळाला. नागपूरने तीनही गटात उपविजेतेपद मिळविले. मुलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने नागपूरचा १२-२ असा दणदणीत पराभव केला. त्या वेळी विजयी संघाकडून ऋत्विक धोटे व आदित्य गणेशवाडे यांनी प्रत्येकी चार गोल केले.

अन्सारी-गोहिलच्या शतकी भागीने गावसकर संघाला सावरले
टोटल कप क्रिकेट
मुंबई, १५ मे / क्री. प्र.
८ बाद ७५ अशा कठीण अवस्थेतून गावसकर संघाला सावरण्याची करामत अझर अन्सारी (नाबाद ७४) आणि विजय गोहिल (४६) यांनी केली. टोटल कप (१४ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेच्या कर्नाटक स्पोर्टिगवरील या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गावसकर संघाने पहिल्या लढतीतील फॉर्मात असणाऱ्या पृथ्वी शॉ याला स्वस्तात गमावले.

रेन, रेन गो अवे..
चेस्टरले स्ट्रीट, १५ मे/ पीटीआय

येथे सुरू असलेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतरही पावसाचा खेळ सुरूच होता. त्यामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. पहिल्या दिवशी अ‍ॅलिस्टर कूक आणि रवी बोपारा यांची शतके अनुभवणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेटरसिकांची आज निराशा झाली. हातात छत्री घेऊन पाऊस थांबण्याची वाट पाहण्याखेरीज त्यांच्याकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. अ‍ॅलिस्टर कूक (नाबाद १२६) आणि रवी बोपारा (१०८) यांच्या शतकांमुळे इंग्लंडने येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी २ बाद ३०२ अशी दमदार मजल मारली. खेळ थांबला तेव्हा कूक १२६ धावांवर तर नाईट वॉचमन अ‍ॅण्डरसन ४ धावांवर खेळत होता. इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती.

प्रकाश अमृतराजसाठी ‘कभी खूशी कभी गम’
एटीपी टेनिस स्पर्धा
नवी दिल्ली, १५ मे/पीटीआय

भारताच्या प्रकाश अमृतराज याला इझमीर चषक टेनिस स्पर्धेत आज संमिश्र यश लाभले. एकेरीत तो पराभूत झाला, मात्र दुहेरीत त्याने आव्हान राखले. आठव्या मानांकित प्रकाशला चेक प्रजासत्ताकच्या पॉव्हेल स्नोबेलने ६-२, ६-४ असे हरविले. दुहेरीत त्याने राजीव रामच्या साथीत उपान्त्य फेरी गाठली. या जोडीने फ्रेड्रिक निल्सेन व केन स्कुपस्की यांच्यावर ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदविला. उपान्त्य फेरीत त्यांची तृतीय मानांकित मिचेल एल्गीन व अॅलेक्झांड्रर कुद्रीव्हत्सेव यांच्याशी लढत होणार आहे. भारताच्या हर्ष मंकड याने अमेरिकेच्या केस व्हॅन्ट हॉफ याच्या साथीत सारासोटा खुल्या टेनिस स्पर्धेत उपान्त्य फेरी गाठली. त्यांनी टॉय ब्रेसवेल व डेरेक मेयर्स यांचा ६-३, ७-६(७-३) असा पराभव केला. ही स्पर्धा लाँगबोट की (अमेरिका) येथे सुरू आहे. अग्रमानांकित कर्स्टन बॉल व ट्रॅव्हेल रेटेनमेफेर यांचा स्टीफन बास व ख्रिस्तोफर कुंगरमेन यांच्याशी सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी जोडी मंकड व हॉफ यांच्याबरोबर खेळणार आहे.

सानिया उपान्त्य फेरीत
माद्रिद, १५ मे/ पीटीआय

भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा आणि तिची चीनची सहकारी चिया-जंग यांनी ४५ लाख अमेरिकन डॉलर्स रोख पुरस्कार असलेल्या माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत विक्टोरिया अझारेन्का व एलेना व्हेसनिना यांच्यावर विजय साकारीत उपान्त्य फेरी गाठली आहे. पहिल्या सेटमध्ये मिर्झा-जंग जोडीने २-० अशी आघाडी घेतल्यानंतर विक्टोरिया अझारेन्काच्या डाव्या गुडघ्यात दुखापत झाली आणि मिर्झा-जंग जोडीला विजयी घोषित करण्यात आले. उपान्त्य फेरीत मिर्झा-जंग जोडीचा सामना तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या लिसा रेमन्ड आणि झेक प्रजासत्ताकच्या क्वेटा पेश्केविरूद्ध होणार आहे. तर दुसरी उपान्त्य फेरी अव्वल मानांकित कारा ब्लॅक व लिझेल ह्युबर आणि ऑस्ट्रलियाच्या समांथा स्टोसूर आणि रिना स्टब्सयांच्यामध्ये रंगणार आहे.

जॉली फ्रेंडस् विजयी
मुंबई, १५ मे / क्री. प्र.

ऑफ स्पिनर कल्पेश सावंतच्या (२९ धावांत ३ बळी व ५७ धावा) अष्टपैलू खेळामुळेच जॉली फ्रेंडस् संघाने एस. पी. ग्रुप क्रिकेट अ‍ॅकेडमी आयोजित व अलाईड डिजिटल स्पोर्ट्स फाऊंडेशन पुरस्कृत आंतरक्लब (२२ वर्षांखालील) स्पर्धेच्या (४० षटके) सामन्यात यंग महाराष्ट्र, शिवाजी पार्क येथील खेळपट्टीवर युनायटेड क्रिकेट क्लबचा केवळ १ विकेटने निसटता पराभव करीत उपान्त्य फेरी गाठली.
संक्षिप्त धावफलक-
युनायटेड क्रिकेट क्लब- सर्व बाद १६८ धावा (सुनील छांगडा ४८, मलकेश गांधी २५ धावांत २ बळी, सचिन शेलार २६ धावांत २ बळी, कल्पेश सावंत २९ धावांत ३ बळी) पराभूत विरुद्ध जॉली फ्रेंडस्- ९ गडी १६९ धावा (प्रीयतम भारतीय ४४, कल्पेश सावंत ५७) सामनावीर- कल्पेश सावंत.
स्पोर्ट्स प्रमोशन- सर्व बाद २३२ धावा (अमेय परब ५१, गौरांग शहा ९४, सागर उदेशी ३४, दिपेश पटेल २५ दावांत ३ बळी० विजयी विरुद्ध कामत मेमोरियल क्रिकेट क्लब- सर्व बाद १३९ धावा (निखिल धरणे ३२, भाविक पटेल १७ धावांत २ बळी, आशिष कुळे २२ धावांत २ बळी, केविन अल्मेडा १५ धावांत २ बळी, सागर उदेशी १८ धावांत ३ बळी) सामनावीर- गौरांग शहा