Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

खुल जा सिम सिम..
ठाणे/ प्रतिनिधी

कोणजिंकणार.. नगारा वाजणार की फुटणार.. कल्याणमध्ये ‘इंजिन’ चालणार की, ठाण्यात नेहमीप्रमाणे भगवा फडकणार.. ‘घडय़ाळ’ किती चालेल, पालघरला ‘शिट्टी’ किती जोरात वाजणार.. भिवंडीला ‘टीव्ही’ दिसणार की, ‘सायकल’ पळणार.. ‘कमळ’ फुलणार की, नेहमीप्रमाणे ‘हात’ उंचावणार.. गेले १५ दिवस सुरू असलेल्या या चर्चेला अखेर शनिवारी पूर्णविराम मिळणार असून, दुपापर्यंत जिल्ह्यातील मान्यवर उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे. खुल जा सिम सिमची प्रतीक्षा शेवटच्या टप्प्यात आली आहे.

डोंबिवलीची केतकी पाटील ‘स्पेस कॅम्प’साठी रवाना
डोंबिवली /प्रतिनिधी

डोंबिवलीची केतकी संजय पाटील ही विद्यार्थिनी ‘स्पेस कॅम्प ’ साठी अटलांटा येथे बुधवारी रात्री रवाना झाली. बारा दिवसांचा हा स्पेस कॅम्प आहे. हा कॅम्प म्हणजे एक अंतराळ पर्यटन प्रशिक्षण मोहीम आहे. या शिबिरात सहभागी होणारी ती ठाणे जिल्ह्य़ातील एकमेव विद्यार्थिनी आहे. ती डोंबिवलीतील टिळकनगर शाळेची विद्यार्थिनी असून नववीत शिक्षण घेत आहे.

फुललेली ‘येऊर’ वाट
‘ए उद्या आपण येऊरला फुलं बघायला जाऊया हं’, माझ्या, फुलांच्या प्रेमात पडलेल्या मैत्रिणीने, वैदेही गानूने प्रस्ताव मांडला आणि त्याक्षणी तो एकमताने मंजूर झाला. ‘ए, पण १० वाजेपर्यंत परत यायचं हं’, मी सावधगिरीने वेळेची लक्ष्मणरेषा आखली. सकाळी ६ वाजता घर सोडलं. वाटेत टॅबेबूयाने गुलाबी फांद्या आनंदाने हलवत आमच्या ‘फुलदर्शन’ मोहिमेचं स्वागत केलं. येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या फलकापर्यंत जाऊन पोहोचलो. गाडी तिथेच पार्क केली आणि आम्ही बाजूच्या पायवाटेने जंगलात शिरलो. अंधाराचं पांघरूण हलकेच दूर झालं होतं. सकाळ प्रसन्नचित्ताने सामोरी येत होती. हवेतला सुखद गारवा डोंगरावर असल्याची वेगळी जाणीव करून देत होता. परिसर निर्मनुष्य होता. एक अनामिक रानगंध वातावरणात भरून राहिला होता.

शहीद स्मारकाप्रती राज्यकर्ते उदासीन!
ठाणे / प्रतिनिधी

मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे उभारण्यात आलेल्या भव्य शहीद स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आचारसंहिता संपताच त्याचे उद्घाटन केले जाईल, अशी माहिती शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अधिकारी व जवानांची कायम स्मृती राहावी, यासाठी वाडा येथे हे स्मारक उभारण्यात आले आहे.

व्यवस्था बदलण्याची जिद्द हवी - अरविंद इनामदार
प्रतिनिधी

आहे ती परिस्थिती स्वीकारणे हा कचखाऊपणा झाला. उलट जी परिस्थिती-व्यवस्था आपल्याला पटत नाही ती बदलण्याची जिद्द प्रत्येकाने धरली पाहिजे. त्यातूनच व्यक्तीचा उत्कर्ष होऊन भारत महासत्ता बनू शकेल, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी अंबरनाथ येथे केले. प्रशांत असलेकर यांच्या ‘जिद्द' पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते शनिवारी एका समारंभात झाले.

मंगळवारच्या म्हाडा लॉटरीबाबत उत्सुकता शिगेला!
प्रतिनिधी

साऱ्या देशाचे लक्ष शनिवारी लागणाऱ्या निवडणूक निकालांकडे लागलेले असले तरी मध्यमवर्गीय मुंबईकरांना त्यापेक्षाही जास्त उत्सुकता पुढील आठवडय़ात मंगळवारी लागणाऱ्या एका निकालाबद्दल वाटत आहे. कारण १९ मे रोजी लाखो मुंबईकरांनी घराच्या स्वप्नासाठी ‘म्हाडा’कडे केलेल्या अर्जातून काही हजार भाग्यवानांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे.

देवरुखकर याची जामीनावर मुक्तता
ठाणे/ प्रतिनिधी
आयुर्वेदाची कोणतीही पदवी नसताना चिकित्सा केंद्राच्या नावाखाली आजार बरे करतो, असे सांगून अनेक रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कथित डॉक्टर रमाकांत देवरुखकर याची गुरुवारी न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली.

लई नाही मागणे
पोटापुरते देई विठोबा
पोटापुरते देई
आता लई नाही लई नाही मागणे ।।धृ।।
भाकर ताजी अथवा शिळी
देवा देई भुकेच्या वेळी
आता लई नाही लई नाही मागणे ।।१।।

पत्री पूल-वल्लीपीर रस्ता आज बंद
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पत्री पूल ते वल्लीपीर रस्ता पहाटे पाच वाजल्यापासून वाहनांना येजा करण्यास बंद ठेवण्यात येणार आहे. विशेषत: वर्तमानपत्रांची पार्सल वाहणाऱ्या गाडय़ांनी पाच वाजण्यापूर्वीच या भागातून येजा करणे आवश्यक आहे. अन्यथा या वाहनांना वळसा घेऊन इच्छित स्थळी जावे लागणार आहे. त्यादृष्टीने वितरण विभागाचे प्रतिनिधी गुरुवारी सकाळपासून याविषयी चर्चा करताना दिसत होते. पत्री पूल रस्ता पहाटे पाचपासून बंद राहणार असल्याने शिळफाटा, टाटा नाका येथून येणारी सर्व वाहने सूचक नाका, तिसगाव नाका, पूना लिंक रोडने उल्हासनगर, शांतीनगर, वालधुनी पूल मार्गे इच्छितस्थळी जातील, तसेच दुर्गामाता चौकातून डावे बाजूस वळून वाहने बिर्ला कॉलेज, पौर्णिमा चौक, सुभाष चौक, वालधुनी पूलमार्गे वाहने इच्छितस्थळी जातील. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत हा पत्री पूल रस्ता बंद राहणार आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन जुईकर यांनी सांगितले.

‘जाणता राजाचे प्रयोग पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली ’
बदलापूर/वार्ताहर

‘जाणता राजा’चे प्रयोग पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली. अनेकांनी राष्ट्रपुरुषांचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केला. हीच प्रेरणा मिळणे हे ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे यश असल्याचे प्रतिपादन महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. ‘जाणता राजा’च्या अंबरनाथमधील कलाकारांची रंगीत तालीम सुरू आहे. या कलावंतांना मार्गदर्शन करताना इनरव्हील हायस्कूलच्या भव्य पटांगणात पुरंदरे यांनी वरील प्रतिपादन केले. ‘जाणता राजा’चा प्रयोग हे केवळ नाटक नाही किंवा गाण्या-नाचण्यापुरता मर्यादित प्रयोग नाही, तर या महानाटय़ाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जिवंतपणे लोकांसमोर उभे करीत असल्याने त्यात आपल्याला आनंद मिळतो. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इस्टचे अध्यक्ष देवेंद्र जैन, ट्रस्टचे अध्यक्ष शालिग्राम पांडे, प्रकल्पप्रमुख दत्ता घावट, संपर्कप्रमुख सुनील चौधरी, देवराम गागरे, शरद दलाल, दादा हाडप, गणेश चिपळूणकर, सर्जेराव सावंत, मिलिंद दातार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

‘एका उन्हाची कैफियत’
ठाणे/प्रतिनिधी : ‘गझल’ हा काव्यप्रकार सर्व रसिकापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याच्या सादरीकरणाच्या पातळीवरील नावीन्य अपरिहार्य आहे, हे ओळखून गझलकार चंद्रशेखर सानेकर आणि गायक- संगीतकार मिथिलेश पाटणकर या कलावंतांनी ‘एका उन्हाची कैफियत’ हा कार्यक्रम रसिकांसमोर आणला होता. त्याचे १७ प्रयोग झाले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच जाणकार रसिकांच्याही पसंतीची पावती मिळाली होती. रसिकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा १७ मे रोजी घंटाळी, ठाणे (प) येथील सहयोग मंदिरात, तर ३१ मे रोजी माधवाश्रम, डोंबिवली येथे ‘एका उन्हाची कैफियत’च्या मैफिली रंगणार आहेत.