Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

अणुकराराच्या अंमलबजावणीसाठी भारताला आणखी काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल - रॉबर्ट ब्लेक
वॉशिंग्टन १५ मे/पीटीआय

 

भारत-अमेरिका कराराच्या अंमलबजावणीसाठी भारताला आणखी दोन उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागेल, असे अमेरिकेचे श्रीलंकेतील राजदूत रॉबर्ट ब्लेक यांनी आज सांगितले. ब्लेक यांना लवकरच दक्षिण व मध्यम आशियासाठी साहाय्यक परराष्ट्र मंत्री या पदावर नेमले जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या विधानाला विशेष महत्त्व आहे. भारत-अमेरिका यांच्यातील अणुकराराने जागतिक अण्वस्त्रप्रसारबंदी व्यवस्थेची रचनाच बदलली गेली आहे, असेही ते म्हणाले.ब्लेक यांनी सांगितले की, अणुकराराची सगळी प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे असे असले तरी या कराराची संपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी भारताला आणखी एक- दोन उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागेल. सिनेटच्या परराष्ट्र संबंधविषयक समितीपुढे बोलताना ब्लेक यांनी वरील वक्तव्य केले.
ते म्हणाले की, भारताला अणुकराराच्या संपूर्ण अंमलबजावणीकरिता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सुरक्षा निकष कराराची अंमलबजावणी करावी लागेल. अणुआस्थापनांबाबत त्या संस्थेला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. ऐतिहासिक अणुकराराची सध्याची अवस्था काय आहे अशी विचारणा सिनेटर्सनी केली असता ब्लेक यांनी ही माहिती दिली. २००६ मध्ये ठरलेल्या योजनेनुसार अणुभट्टय़ांचे वर्गीकरण भारताला सादर करावे लागणार आहे, तसेच इतरही उपायांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. भारत सरकारने ती तातडीने करावी अशी अमेरिकेची अपेक्षा आहे.अणुकरार हा दोन्ही देशातील मैत्रीचा महत्त्वाचा भाग आहे, असे सांगून ते म्हणाले की, अणुकरार हा एकप्रकारे प्रतिकात्मक बनला आहे, या करारामुळे जागतिक अण्वस्त्र प्रसार बंदी कराराची व्यवस्थाच बदलली गेली आहे.