Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

श्रीलंकेतील तामिळींसाठी अन्नपदार्थाची मदत त्वरेने करावी
जयललिता यांची केंद्राकडे मागणी
चेन्नई, १५ मे / पी. टी. आय.

 

श्रीलंकेच्या उत्तर भागात असलेल्या युद्धजन्य स्थितीत मदत शिबिरांमध्ये असलेल्या तामिळींसाठी भारत सरकारने त्वरेने हवाईमार्गाने अन्न पुरवठा करावा, असे आवाहन अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांनी केले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने ही मदत करावी. शिजविलेले अन्न, फळे, पाण्याच्या पिशव्या, भाज्या आदी मदत तेथे पुरविण्यात यावी. ही मदत पुरविण्यात न गेल्यात तेथील लोकांचे भूकबळी जातील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यामुळे मरण पावणारे तामीळी हे युद्धात मरण पावणाऱ्यांच्या संख्येपेक्षाही जास्त असतील, असे सांगून श्रीलंका लष्कराने केलेल्या आक्रमणात इस्पितळांवरही हल्ले केले असल्याचा दावा जयललिता यांनी केला.लिट्टेच्या कब्जात असलेल्या जागेनजीक श्रीलंकेचे लष्कर पोहोचत असताना जयललिता यांचे आवाहन केले गेले आहे. लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेत तामिळींसाठी स्वतंत्र राज्य देण्याची मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने नवीन सरकारने भारतीय लष्कर श्रीलंकेत पाठवावे, अशीही मागणी त्यांच्याकडून पुढे आली होती. संयुक्त राष्ट्रे, रेडक्रॉस व अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांनी श्रीलंका सरकारने युद्धबंदी करावी अशी विचारणा करण्यात आली होती. परंतु श्रीलंकेचे अध्यक्ष महिन्दा राजपक्षे यांनी आता युद्ध थांबविणे शक्य नसल्याचे सांगितले होते, असे जयललिता यांनी प्रचारादरम्यान सांगितले.