Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

गव्हाच्या वायदे बाजारावरील बंदी सरकारने उठविली
नवी दिल्ली, १५ मे / पी. टी. आय.

 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांना काही तास उरले असतानाच सरकारने आज गव्हाच्या वायदे बाजारावरील बंदी उठविली. फेब्रुवारी २००७ मध्ये डावे पक्ष आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या मागणीवरून सरकारने गव्हाच्या वायदे बाजारावर बंदी घातली होती. तथापि, तांदळाच्या वायदे बाजारावरील बंदी मात्र यापुढे कायम राहील, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे सव्वा दोन वर्षांपूर्वी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गहू आणि तांदळाच्या वायदे बाजारावरील बंदीची घोषणा केली होती, तसेच वायदे बाजारामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी अभिजीत सेन यांची समितीसुद्धा नेमली होती. सर्वच अत्यावश्यक वस्तूंच्या वायदे बाजारांवर बंदी घालण्याची मागणी तेव्हा डाव्या पक्षांनी लावून धरली होती. तथापि सरकारने फक्त गहू आणि तांदळाच्या वायदे बाजारावर बंदीचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी एक महिना आधी जानेवारी २००७ मध्ये तूर आणि उडीद यांच्या वायदे बाजारावरही बंदी घालण्यात आली ती आजही कायम आहे. गेल्या वर्षी चलनफुगवटा मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने सरकारने बटाटा, सोया तेल, हरभरा आणि रबर यांच्या वायदे बाजारावर बंदी घातली होती; परंतु सहा महिन्यांतच नोव्हेंबर २००८ मध्ये ती उठविण्यात आली.
गव्हाच्या वायदे बाजारावरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गेल्या महिन्यातच घेतला होता; परंतु निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने या निर्णयाची घोषणा निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार आज ही घोषणा करण्यात आली, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.