Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

त्रिकालवेध

माणसाची जीवनासक्ती ही जेवढी मानसिक ऊर्मी, तेवढीच ती त्याची शारीरिक ऊर्मीदेखील! मानवी शरीर-मनाचे हे विलक्षण गूढ अद्वैत सश्रद्धांना आणि अश्रद्धांनाही, तसेच सामान्यांना आणि संशोधकांनाही स्वस्थ बसू न देणारे, विचारांना प्रवृत्त करणारे! ‘त्रिकालवेध’च्या वाचकांचीही काहीशी अशीच अवस्था अनुभवाला येते आहे. त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्याकडच्या माहितीचे मुद्दे, त्यांची मते यांचीही एक प्रातिनिधिक झलक

‘मी’, ‘मी’ म्हणुनी काय पुसशी..

 

* ‘मी’, ‘मी’ म्हणुनी काय पुसशी?’ हा ‘त्रिकालवेध’ (९ मे) वाचला. या सदराद्वारे वाचकांच्या मेंदूला झिणझिण्या आणायच्याच, असा कुमार केतकर यांचा निश्चय दिसतो आहे. त्यांचे सगळेच विषय भिन्न असतात, तसा हाही आहे.
जोपर्यंत मेंदू मृतवत होत नाही, तोपर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नाही, असे मानण्यात येते, ही बाब शास्त्रीयदृष्टय़ा योग्यच आहे. पण ज्याच्या जगण्याच्या आशा संपलेल्या आहेत किंवा ज्याला पुढल्या काही तासांत मृत्यू अटळ आहे, असे डॉक्टरांना उमजते, तेव्हा त्या व्यक्तीचा मेंदू इतरांपैकी कुणा जिवंत व्यक्तीला ‘दान’ करता येतो का, हा मला पडलेला प्रश्न आहे. जिवंतपणी एखाद्याला प्रिय व्यक्तीसाठी मूत्रपिंडाचे दान करता येते. एका मूत्रपिंडावर व्यक्ती जगू शकते. व्यक्ती जिवंत असताना तिचा मेंदू काढणे म्हणजे त्या व्यक्तीचा खून होईल, हे मान्य, पण ज्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित असतो, तिचा मेंदू काढण्यात गैर ते काय? माणसाखेरीज अन्य प्राण्यांच्या मेंदूची जर परीक्षा घेता येऊ शकते, तर ती अशा व्यक्तीची का घेता येऊ नये?
जर एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे काम ‘लाइफ सपोर्ट सिस्टिम’वर चालू असेल, तर त्या व्यक्तीचा मेंदू अशा वैज्ञानिक कामासाठी वापरू द्यायला कुणाची हरकत नसावी. समजा, त्या अवस्थेतल्या व्यक्तीच्या नातलगांनी त्यासाठी आवश्यक ती परवानगी दिली तर शल्यविशारदाने ते काम मनावर घेऊन करायला हवे. मती गुंग करून टाकणाऱ्या विषयाची मांडणी या स्तंभात सोप्या भाषेत होत असते.
माधव सप्रे, पुणे

दार्शनिकांचे दर्शन!
* भारतीय तत्त्वदर्शनाची आणखी एक मिती कुमार केतकर यांच्या ‘त्रिकालवेध’ सदरातील लेखात व्यक्त झाली आहे. भारतीय तत्त्वज्ञानाने माणसाच्या मानसिक अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच एक नवे तत्त्वज्ञान निर्माण झाले. केतकर यांच्या अतिशय अभ्यासपूर्ण लेखात या विषयावर सध्या जगात काय संशोधन सुरू आहे, याचे सुंदर विवेचन आहे. आता ‘कोऽहं’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ सज्ज झाले आहेत. आपल्या तत्त्वज्ञानात माणसाच्या अस्तित्वाचे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु त्याचे ठोस उत्तर मिळाल्याचे मात्र कुठेच दिसत नाही. या जगात माणसाच्या येण्याचे कारण आणि त्याच्यावर असलेले उत्तरदायित्व याचा विचार माणूस अनेक शतके करीत आहे, आणि त्याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही.
केतकर यांच्या लेखामुळे या विषयात जगात केवढे मोठे संशोधन सुरू आहे, याची तर माहिती मिळालीच, परंतु भारतीय तत्त्ववेत्ते अजूनही किती मागे आहेत, याचेही ‘दर्शन’ होते.
सतीश देशमाने, पुणे

मन आणि मेंदू
* ‘त्रिकालवेध’मधील (१८ एप्रिल) लेखाबाबत अवधूत परळकर यांची प्रतिक्रिया (२५ एप्रिल) वाचनात आली. ‘नव्या संशोधनानुसार बरेचसे मानसिक रोग हे शारीरिक असतात आणि मन व शरीर या दोन वेगळ्या गोष्टी नसून मन हा शरीराचा एक भाग आहे हे वैज्ञानिक सत्य आता पुढे आले आहे.’ या विधानातील व्याप्ती जाणून घेण्यासाठी मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रदीप पाटकर यांचे वैज्ञानिक विश्लेषण येथे नोंदविणे सयुक्तिक वाटते. डॉ. पाटकर यांचे ‘चिंता : स्वरूप आणि उपाय- अर्थात शोध मन:स्वास्थ्याचा’ या पुस्तकातील ‘मेंदू- अजूनही अगम्य, विलक्षण कोडे!’ या प्रकरणात मेंदूच्या भौतिक रचनेविषयी स्पष्टीकरण देऊन त्याच्या (मेंदूच्या) रासायनिक प्रक्रिया माणसाच्या शारीरिक, वैचारिक, भावनिक विश्वावर कशा परिणाम करतात हे वैज्ञानिक सत्य समोर आणले आहे. कोटय़वधी मज्जापेशींचा समुच्चय असलेला मेंदू ज्ञानेंद्रियांद्वारे माहिती मिळवून बाह्य़ जग कसे आहे हे ठरवीत असतो. ज्ञानेंद्रिय, मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या कार्यक्षमतेवर जगासंबंधीचा त्याचा अर्थ अवलंबून असतो. या सर्वामध्ये अनुभवास येते ते म्हणजे मन. या भौतिक अवयवांची विशिष्ट कार्यपद्धती असते. त्यांतील रसायनांच्या हालचालींवर संदेशांचे वहन, ग्रहण अवलंबून असते. मनात उद्भवणाऱ्या भावना, जगाबद्दलची समज हे सर्व या रासायनिक व विद्युत क्रियांद्वारे होत असते.
सिरोटोनिन व मेलॅटोनिन या दोन रसायनांच्या कमीजास्त होण्याच्या वेळा निसर्गावर अवलंबून असतात त्यावर माणसाच्या झोपेचे तंत्र अवलंबून असते. त्याचप्रमाणे ‘नॉरअेपिनेफ्रिन’ हे रसायन दिवसभराचा उत्साह राखते. ‘डोपामाइन’ हा द्राव सुखाची भावना अनुभवणे व दु:ख आणि वेदना सहन करण्यासाठी उपयुक्त ठरते. ‘डोपामाइन’ कमी झाल्याने आनंदाच्या प्रसंगी आनंद घेता येत नाही व दु:खाच्या प्रसंगी दु:ख, वेदना सहन करणे कठीण जाते. ‘डोपामाइन’ वाढल्याने माणसे अधिक उत्तेजित होतात. अशा उत्तेजित माणसांना विरोध सहन होत नाही. अगम्य, अदृश्य असे माणसाचे मन म्हणजे मेंदूशी संबंधित अशा पेशी व रसायनांचा समुच्चय आहे हे वास्तव सामान्य माणसापर्यंत येईल अशी आशा.
सदानंद चाळके, गोरेगाव, मुंबई

‘मनोशारीरिक’ आजार
* ‘आजार मानसिक की शारीरिक’- याबद्दलचा अवधूत परळकर (२५ एप्रिल) आणि श्रीकांत लागू (३० एप्रिल) यांचा पत्रव्यवहार वाचण्यात आला. ‘असा असतो मानसिक असणारा शारीरिक आजार’- हे ठासून पटविण्यासाठी श्रीकांत लागू यांनी उद्धृत केलेला किस्सा वाचून मनोरंजनही झाले. अंधारामध्ये कुंपणाची तार केसात अडकल्याने घाबरणे स्वाभाविकच. अभिनेत्रीबाई जास्त घाबरट असतील तर ती स्वभावशैली! यात शारीरिक आजाराचा कुठे प्रश्न येतो? वास्तविक इथे शारीरिक घटनेमुळे मानसिक घबराट असा उलटा क्रम आहे; परंतु मुद्दा पटवण्याच्या नादात लागूंनी त्याची, त्यांना सोयीस्कर अशी संगती लावली.
‘बरेचसे शारीरिक आजार खरे तर मानसिक असतात,’ हे ‘त्रिकालवेध’मधील विधान योग्यच आहे, पण त्यावरच्या प्रतिक्रियांची दिशा भरकटलेली वाटते. अशा प्रकारच्या आजारांना ‘मनोकायिक’ अथवा ‘मनोशारीरिक’ असे संबोधले जाते. ‘मानसिक’ म्हटले जात असले तरी ते केवळ मनोविकार नसून, ‘कारण व परिणाम’ (cause and effect) अशा स्वरूपाची त्यांची गहन युती असते. अंतर्मनातील अदृश्य ताणाचे परिवर्तन दृश्य शारीरिक व्याधींमध्ये होणे हे या आजाराचे स्वरूप. जठराचा अल्सर अथवा अ‍ॅसिडिटी चिंतांमुळे उद्भवते.
अगदी मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखीसुद्धा ‘मनोकायिक’ असू शकते; परंतु असे निदान करण्यापूर्वी त्याला काही शारीरिक कारण नसल्याची खातरजमा करावी लागते. मनोकायिक आजारांच्या मुळाशी असणाऱ्या मानसिक कारणाबद्दल रुग्ण बऱ्याचदा अनभिज्ञ असतो. मुळात मानसिक लक्षणांचे परिवर्तन शारीरिक लक्षणांमध्ये होण्यामागे कारणीभूत ठरणारी गोष्ट ही असू शकते की, आपल्याकडे मनोविकारास प्रतिष्ठा नाही!
डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर, नांदेड

महाविश्व: एक महाकोडे!
* अंधश्रद्धाविरोध आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या वरवर समानार्थी संज्ञा वाटल्या तरी तशा त्या नाहीत. एखादा कट्टर आस्तिक तितकाच कट्टर अंधश्रद्धाविरोधी असू शकतो. म्हणजे त्याचा देवावर विश्वास असेल; पण तो पूजापाठ, जपजाप्य, गंडा-दोरे, चमत्कार-योगायोग, बुवा-बापू, नवस-तपस इ. गोष्टींच्या पूर्ण विरोधात असेल. आस्तिक असे म्हणेल ही सृष्टी देवाने निर्माण केली. काही जण एखादी (अदृश्य) शक्ती असे म्हणतील तर काही विश्वसृष्टीच्या नियमांनुसार सर्व घडते असे मानत असतील. यांना अंधश्रद्धाग्रस्त म्हणत नाहीत. अगदी डॉ. नरेंद्र दाभोलकरही त्यांना अंधश्रद्धाळू म्हणत नाहीत. अंधश्रद्धाविरोधाचे आंदोलन मुख्यत: घातक रूढी, ढोंगी बाबा, अघोरी तंत्र-मंत्र, लबाड साधू-संत, चमत्कार, नवस-सायास, रंगीत खडे, रुद्राक्ष या व अशा गोष्टींच्या विरोधात आहे. ज्यामुळे लोक फसतात, मनाने पंगू होतात, ढोंगी बुवा-बापूंना प्रतिष्ठा देऊन त्यांच्या हातात स्वत:चे जीवन देतात, कधी कधी बळी देतात वा बळी घेतातही. अंधश्रद्धाविरोधी विधेयक अशा प्रथा-परंपरांच्या सामाजिक चालींवर बंदी घालावी या हेतूने विधानसभेसमोर ठेवले आहे. या अंधश्रद्धाविरोधी मोहिमेत ‘लोकसत्ता’ सक्रिय सामील आहे. इतर कोणत्याही वृत्तपत्रांपेक्षा अथवा वाहिन्यांपेक्षा ‘लोकसत्ता’ अशा चळवळीत आघाडीवर असतो हे कदाचित चंद्रसेन टिळेकर आणि अवधूत परळकर यांना माहीत नसावे. अशा किमान १० मेळाव्यांना मी व माझ्यासारखे त्या वेळचे लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते हजर होतो. डॉ. जयंत नारळीकर, कुमार केतकर, दिवंगत चिंतामणी देशमुख हे त्या मेळाव्यांना वक्ते-मार्गदर्शक म्हणून हजर होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अशा मेळाव्यातही ‘लोकसत्ता’ने सहभाग केला आहे. ‘लोकसत्ता’ने अच्युत गोडबोले यांचे ‘किमयागार’ हे, तसेच कुमार केतकरांचे ‘त्रिकालवेध’ हे सदर विज्ञान प्रसाराचेच काम करते. त्यातूनही आम्ही हे शिकलो, की ज्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक असतो तो ज्ञानापुढे नम्र असतो, वृत्तीने चिकित्सक असतो, प्रयोगशीलतेवर त्याचा विश्वास असतो, तो खुल्या मनाने कोणत्याही प्रश्नाकडे पाहतो, अगोदर निष्कर्ष मग शोध असे तो करीत नाही, हायपोथिसिस ऊर्फ संभाव्यता वा तर्क/अंदाज करून तो निर्थक ठरल्यास टाकून देतो. विज्ञानाची कास असलेला माणूस टिळेकर-परळकरांप्रमाणे अरेरावीने व आत्मनिष्ठ औद्धत्याने वागत नाही. परळकर आणि टिळेकर यांना ‘त्रिकालवेध’मधील लेख समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास, विज्ञानविषयक अधिक वाचन आणि तत्त्वज्ञानासंबंधात चिंतन करण्याची गरज आहे. डासाला मेंदू नसतो पण तो अत्यंत बुद्धिमान माणसालाही कडकडून चावतो आणि त्याला काही क्षण निष्प्रभ करून टाकतो. (‘एक मच्छर आदमी को..’) मुंगीचा मेंदू अती सूक्ष्म असला तरी मुंगीचे सामूहिक जीवन विकसित मेंदूच्या माणसालाही चकित करते. एचआयव्हीचा विषाणूही मेंदूरहित असून अवघ्या बुद्धिमान मानवसृष्टीला आणि वैज्ञानिकांना पुरे जेरीस आणले आहे.
शिवाय आता विश्वजन्माचा विचार करणारे खगोलशास्त्रज्ञ या प्रश्नावर खल करीत आहेत, की ‘बिग बँग’ ऊर्फ ‘महास्फोटा’ची प्रेरणा त्या सूक्ष्म बिंदूत कुठून आली. जीवसृष्टीतील डीएनएचे प्रोग्रॅमिंग कसे झाले (कुणी केले!!) जीवसृष्टीचा विचार करणारे आता असेही मानतात, की विश्वात अन्यत्र कुठे माणूससदृश प्राणी असलाच तरी त्याची शरीररचना पृथ्वीवरील माणसाप्रमाणेच असेल असे नाही- म्हणजे मेंदू, हृदय, यकृत, जठर वगैरे वगैरे. त्यामुळे ज्यांना ‘मेंदू’चे खरे व र्सवकष महत्त्व कळते ते व्ही. एस. रामचंद्रन यांच्यासारखे जगद्विख्यात न्यूरोसायन्टिस्टही ‘मानसशास्त्रा’तील प्रयोगांचा, सिग्मंड फ्रॉईड व त्यानंतर झालेल्या चिंतन-संशोधनाचा सविस्तर संदर्भ घेतात. रामचंद्रन यांच्या या विषयावर झालेल्या व्याख्यानांचे बी. बी. सी.ने पुस्तकही काढले आहे. (हे पुस्तक मी वाचलेले नाही; पण त्या कार्यक्रमाविषयीची माहिती ‘बीबीसी’वर आहे.)
वैज्ञानिकांना अजून जसे मुंगीचे महाभारत पूर्ण उलगडलेले नाही त्याचप्रमाणे एखादा माणूस हिंस्र का होतो, प्रेमळ का होतो, आईची माया कशातून निर्माण होते, दया-बुद्धी कशी निर्माण होते, सेवावृत्ती कशी तयार होते, एखादा माणूस अचाट धैर्याचा तर एखादा भित्रा कसा होतो, असे अनेक प्रश्न उलगडलेले नाहीत. त्याचप्रमाणे एखादा माणूस समाजवादी, एखादा कम्युनिस्ट, एखादा संघवाला कसा होतो हेही उलगडलेले नाही. विज्ञान हे नम्रपणे मानतो, की कितीही वैज्ञानिक प्रगती झाली तरी अवघ्या विश्वाचे- महाविश्वाचे- कोडे आपल्याला पूर्ण उलगडणार नाही. अथांग जीवसृष्टीचा शोध कधीही पूर्ण होणार नाही. तरीही वैज्ञानिक वृत्तीचा माणूस नाउमेद होत नाही. तो शोध घेत राहतो. नास्तिक हा आपल्या नास्तिकतेबद्दल तितकाच कट्टर असतो, जितका श्रद्धाळू आपल्या अंधश्रद्धांबद्दल असतो. म्हणून बट्र्राड रसेल स्वत:ला ‘अ‍ॅग्नॉस्टिक’ म्हणवून घेत असे ‘अ‍ॅथेइस्ट’ नव्हे. अ‍ॅथेइस्ट म्हणजे नास्तिक, देवाचे अस्तित्व नाकारणारा: परंतु अ‍ॅग्नॉस्टिक म्हणजे अज्ञेयवादी. म्हणजे देव आहे, की नाही हे माहीत नाही, असे मानणारा. परळकर आणि टिळेकर यांचा वैज्ञानिकतेचा समज रसेल यांच्यापेक्षाही जास्त असेल कदाचित, पण त्यांच्या पत्रांवरून तरी तसे जाणवले नाही.माहीम, मुंबई
सुरेश लोटलीकर, माहीम, मुंबई
sureshlotlikar@hotmail.com