Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

वादळ-गारपिटीमुळे पिकांची हानी
लिबू, संत्रा, पपई, आंब्याचे नुकसान
पडझडीमुळे नऊ जखमी
आकाशपाळणा कोसळला, दुर्घटना टळली
अकोला / बुलढाणा, १५ मे / प्रतिनिधी

सतत दोन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे अकोला व बुलढाणा जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात पिकांची हानी झाली असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. वादळामुळे लिंबू, संत्रा, पपई, आंबा, केळी, मिरची ही पिके उध्वस्त झाली आहेत. वादळामुळे झालेल्या पडझडीमध्ये अकोला शहरात ९ जखमी झाले. प्रदर्शनातील आकाशपाळणाही वादळामुळे कोसळून एक जखमी झाला.

ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांच्या निधनाला आज १४ दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त -

शाळा पाडून व्यापारी संकुलांची उभारणी
काळाच्या ओघात शिक्षणाचे क्षेत्र पार बदलून गेले आहे. विद्यादानाचे पवित्र कार्य होत असलेल्या या क्षेत्राचा दर्जा चांगला राहायला हवा, पावित्र्य कायम राखायला हवे अशी धारणा अनेकांची आहे पण, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. या क्षेत्राचे आज वेगाने व्यापारीकरण होत आहे. पैसा हा महत्त्वाचा घटक झाला आहे आणि शिक्षणाला दुय्यम स्थान मिळू लागले आहे. त्याच्या झळा आता याच क्षेत्रात काम करणाऱ्यांना बसू लागल्या आहेत. खासगी क्षेत्रातील स्पर्धा वाढल्याने व बहुतांशी पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वळल्याने सरकारी व पालिकांच्या शाळा आता ओस पडू लागल्या आहेत.

तंटामुक्तीचे खरे यश सर्वस्वी ग्रामस्थांवरच अवलंबून
येत्या महिन्यात तंटामुक्ती गावांचे प्रस्ताव बक्षिसासाठी येणार आहेत. त्या गावांची पाहणी झाल्यावर त्यांची पात्रता निश्चित होणार असल्याने तंटामुक्तीचे खरे यश सर्वस्वी ग्रामस्थांवरच अवलंबून आहे. गेली दोन-तीन वर्षे राज्य तंटामुक्तीच्या नावाने गाजत आहे. प्रारंभीच्या काळात संबंधित अधिकाऱ्यांनी त्यात खूप लक्ष घातले. एवढेच नव्हे तर जीव ओतून त्यात त्यांनी काम केले व यश खेचून आणले.
गावात तंटे-बखेडे होऊ नये, झाल्यास ती गावातच निकाली निघावी तीच तंटामुक्ती परंतु, चालू वर्षांत समितीच्या कार्यात प्रत्यक्ष भाग घेण्याचा योग आला.

लोणारमध्ये आगीत पाच दुकाने जळाली
बुलढाणा, १५ मे / प्रतिनिधी

वादळ सुटल्याने शॉर्टसर्किट होऊन लोणार शहरात अग्नितांडव घडले. आगीत पाच दुकाने जळून भस्मसात झाली, यामध्ये ११ लाख रुपयाची वित्तहानी झाली. वीजपुरवठा सुरू असताना शॉर्टसर्किट झाले, यामुळे भाजी मंडईजवळ असलेले अशोक शामराव मापारी यांचे किराणा दुकान जळून खाक झाले आहे.

बसच्या धडकेने महिला ठार
यवतमाळ, १५ मे / वार्ताहर
भीक मागून पोट भरणाऱ्या वेडसर महिलेचा एसटी बसची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी यवतमाळपासून १८ किमी. अंतरावर जोडमोहा येथे घडली. ही महिला कोण, याबाबत काहीही माहिती नसल्याने पोलिसांनी तिची ओळख पटण्यासाठी मृतदेह शवगृहात ठेवला आहे. सावळा रंग, ५ फूट उंची, अंगावर साडी-कथ्थ्या रंगाचे ब्लाऊज, वय अंदाजे ४५ वर्षे, बांधा सडपातळ असे या मृत महिलेचे वर्णन असल्याचे यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी कळविले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबाराव पवार तपास करत आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मेळावा उद्या
वर्धा, १५ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने रविवार, १७ मे रोजी अनेकांत स्वाध्याय मंदिरात दुपारी ३ वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी वर्षभरातील प्रबोधनपर उपक्रम, नवीन शाखा, नवी जिल्हा कार्यकारिणी, सदस्यता नोंदणी आदी बाबींवर यावेळी निर्णय घेतल्या जाणार आहे. सदस्यांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याची सूचना विदर्भ विभागप्रमुख गजेंद्र सूरकार व जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले यांनी केली.

झोपलेल्या महिलेला ट्रकने चिरडले
यवतमाळ, १५ मे / वार्ताहर

उन्हाळ्याच्या दिवसात रात्री अंगणात खाट टाकून झोपलेल्या एका महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याने चिरडून ती जागीच ठार झाल्याची घटना यवतमाळ-आर्णी मार्गावरील हिवरी येथे बुधवारी रात्री घडली. हिवरी येथे वन विभागातील चौकीदार पांडुरंग चौधरी यांची पत्नी माधुरी चौधरी (३५) घराच्या अंगणातील खाटेवर झोपलेली असताना तिच्या अंगावरून ट्रक गेल्याने ती ठार झाली. ज्या ट्रकने हा अपघात झाला तो नेहमीच चौधरी यांच्या अंगणात रात्री उभा असतो आणि सकाळी त्याचा चालक राऊत ट्रक घेऊन कामावर निघून जात असतो. बुधवारी रात्री ट्रक मागे घेत असताना त्याला खाटेवर कोणी झोपून आहे हे लक्षात आले नाही त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. ट्रकचालक फरार असल्याचे समजते. यवतमाळ ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत. ट्रक जप्त करण्यात आला आहे.

सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही -वाटाळकर
भंडारा, १५ मे / वार्ताहर

अधिक चांगले उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पुणे येथील फलोत्पादन सहसंचालक पांडुरंग वाटाळकर यांनी भात शेतपीक प्रशिक्षण कार्यशाळेत केले. या कार्यशाळेत पुणे येथील कृषितंत्र अधिकारी रवींद्र धमाळ, उपविभागीय कृषी अधिकारी वैद्य, तालुका कृषी अधिकारी रेवतकर, कृषी अधिकारी ढोबळे, उपविभागीय कृषी अधिकारी वासनिक, कृषी अधिकारी ए.डी. कस्तुरे उपस्थित होते. कार्यशाळेला उपस्थित शेतकऱ्यांना सुधारित धानपीक व शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्नोत्तर व शेतकऱ्यांना शेतात जाऊन प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. शेतकरी वर्ग अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा शेतात अधिक भरणा करतो. त्यामुळे जमिनीचा पोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणून सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करावा, असे मार्गदर्शन यावेळी मान्यवरांनी केले. संचालन टी.एस. काटगाये यांनी केले. आभार एन.के. चांदेवार यांनी मानले. आयोजनासाठी कोटीराम पवनकर, जी.पी. रणदिवे आदींनी सहकार्य केले.