Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

ग्रंथविश्व

आर्थिक मारेकऱ्याचा कबुलीजबाब

छुप्या पद्धतीने संपूर्ण जगाला गुलामीच्या पाशात जखडणाऱ्या साम्राज्यावर जॉन पर्किन्स यांनी ‘कन्फेशन्स ऑफ अ‍ॅन इकॉनॉमिक हिट-मन’ या स्फोटक ग्रंथात झगझगीत प्रकाश टाकला आहे. ग्रंथाच्या सुरुवातीलाच लेखक स्पष्ट करतो की १९८१ सालात दोन महिन्यांच्या अंतराने बॉम्बस्फोटाने विमाने उडविली गेल्याने मृत्युमुखी पडलेले इक्वेडोर देशाचे राष्ट्राध्यक्ष रोल्डोस आणि पनामा देशाचे राष्ट्राध्यक्ष तोरिजोस यांचे मृत्यू, जगाला भासविल्याप्रमाणे अपघात नव्हते. ‘सी.आय.ए.’च्या हस्तकांनी हे स्फोट घडवले कारण या अध्यक्षांनी जागतिक साम्राज्य स्थापन करणाऱ्या महाकंपन्या (कॉर्पोरेट्स), अमेरिकन सरकार आणि बँकांच्या प्रमुखांच्या संघटित कारवायांस विरोध केला.

 


अशा अनेक धक्कादायक घटनांची मुळे १९५१ सालातील ‘सी.आय.ए.’ने केलेल्या इराणमधील उलथापालथीत आहेत. लोकशाही मार्गाने निवडून आलेले लोकप्रिय पंतप्रधान मोहम्मद मोसादेघ यांनी इराणमधील नैसर्गिक संसाधने आणि जनतेचे शोषण करणाऱ्या ब्रिटिश, अमेरिकन तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. हितसंबंधांना धक्का बसल्याने खवळलेल्या अमेरिकेने ‘सी.आय.ए.’ हस्तक केरमिट रुझवेल्टला कामगिरीवर पाठविले. दहशत भडकविली, दंगली घडविल्या, लष्कराकडून उठाव घडवून मोसादेघची राजवट उलथली. अमेरिकाधार्जिण्या निरंकुश हुकूमशहा मोहम्मद रझा शाह याला गादीवर बसविण्यात आले. या पद्धतीमुळे संभाव्य युद्ध व त्यातील रशियाचा हस्तक्षेप टळला. परंतु केरमिट पकडला गेला असता तर प्रकरण अमेरिकेवर शेकले असते म्हणून कोरिया व व्हिएतनाम युद्धप्रकरणी हात पोळून घेतलेल्या अमेरिकेने या सूत्रातील कच्चे दुवे काढून सत्ता ताब्यात घेण्याचे साळसूद तंत्र विकसित केले.
या नव्या तंत्राने निर्माण केलेल्या ‘आर्थिक मारेकरी’ या गुप्त नावाच्या निवडक पाईकांपैकी आपण स्वत: असल्याचे लेखक उघड करतो. जॉन पर्किन्स यांची १९६८मध्ये अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा’ या गुप्तहेर खात्यात निवड झाली. काही वर्षांतच रहस्यमय पद्धतीने त्यांना ‘मेन’ या महाकंपनीत दाखल करण्यात आले ते ‘आर्थिक मारेकरी’ म्हणून. मात्र उघडपणे ते ‘अर्थतज्ज्ञ’ किंवा ‘आर्थिक भाकीततज्ज्ञ’ म्हणवले जात.
‘आर्थिक मारेकरी’ (Economic Hit-man) हे खोऱ्याने वेतन घेतात. जगभरच्या देशांना लाखो कोटी रुपयांना फसवितात, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून पैसा वळवून तो कॉर्पोरेट्स आणि नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण असणाऱ्या निवडक धनाढय़ांच्या खजिन्यात ओततात. बनावट अहवाल, बोगस निवडणुका, दंगे, यादवी घडविणे, पिळवणूक ही त्यांची साधने आहेत. जागतिकीकरणात त्यांनी भयावह वेग घेतला आहे. देशोदेशींच्या नेते, नोकरशहांना वाटा देत त्यांनी औद्योगिक पार्क, बंदरे, औष्णिक- जल- अणू ऊर्जाकेंद्रे, सी-लिंक, विमानतळ, महामार्ग, उड्डाणपूल, शहरांचे नवनिर्माण यांचा धडाका लावला. या देशांना कर्ज फेडता येणार नाही याची खात्री होतीच. जागतिक बँक व इतर वित्त संस्थांकरवी प्रचंड कर्ज अतार्किक, अवैज्ञानिक अशा या प्रकल्पांसाठी ओतण्यात आले. देश पुरता कर्जबाजारी झाला याची खात्री झाल्यावर अमेरिकेने आपले सुळे बाहेर काढले. मग युनोतील मताचे नियंत्रण, लष्करी तळाची मागणी, तेल, जंगल वा इतर नैसर्गिक स्रोतांची अथवा पनामासारख्या कालव्यांची मागणी झाली.
इंडोनेशिया व इतर देशांत ‘वीज’ व इतर सेवांच्या वाढीचा, अनेक पटींनी वाढविलेला खोटा, बनावट अंदाज बुद्धी पणाला लावून करताना लेखकाची सदसद्विवेकबुद्धी त्याला टोचत राहते. हे त्याचे मानसिक द्वंद्व, त्याची अंतर्गत लढाई लेखकाने टोकदार पद्धतीने ग्रंथात मांडली आहे. जगभरातील गरीब, निरपराधांना गुलाम बनवताना स्वत:ही गुलामी पत्करली आहे, याची तीव्र जाणीव लेखकाला अस्वस्थ ठेवते. अखेर तो ‘मेन’ कंपनीच्या लठ्ठ पगाराच्या नोकरीचा राजीनामा देतो.
लेखक अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट करतो की, भांडवलशाहीची परिणती सरंजामशाहीत झाली आहे. परंपरागत जीवनपद्धतीतून उखडून करोडो माणसांना अगतिक व दरिद्री बनविले जात आहे. १९७० च्या सुमारास तेल कंपन्यांच्या शोषणाविरुद्ध तेल-समृद्ध राष्ट्रांचा ‘ओपेक’ हा गट संघर्षांस उभा राहिला. त्या घटनांचे वर्णन करताना लेखक म्हणतो की अमेरिकन स्वातंत्र्याला प्रेरणा देणारा थॉमस पेन आज हयात असता तर त्याने ओपेकची बाजू घेतली असती; परंतु कॉर्पोरेटशाहीने तेलातून प्रचंड पैसा कमाविलेल्या सौदी अरेबियावरही धूर्तपणे जाळे फेकले. लेखकाने यात फासेपारध्याची भूमिका कशी बजावली आणि सौदी राजपुत्राला स्त्रिया पुरविण्याएवढय़ा थराला तो कसा गेला ते त्याच्याच शब्दात सौदी अरेबियाचे पैसे वळविण्याच्या प्रकरणात वाचावे. लादेन या भस्मासुराला अमेरिकेनेच सौदी अरेबियाकरवी घडविले याची साक्ष लेखक देतो.
विविध देशांमधील वास्तव्यात अंगभूत जिज्ञासा व कुतूहलामुळे लेखकाने त्या त्या देशाचा वेध घेतला. त्यासाठी धोका पत्करला. इराणच्या शहाच्या एकनिष्ठ मित्राने विदारक अनुभवानंतर इराणमधल्या असंतोषाची आणि खोमेनीच्या होऊ घातलेल्या क्रांतीची कल्पना लेखकाला दिली. ‘वाळवंट हेच आमचे पर्यावरण आहे’, असे बजावणारा शहा राबवू पाहत असलेल्या, अमेरिकाप्रणीत ‘फुलणारे वाळवंट’ योजनेला विरोध करणारा यामिनही त्याला भेटतो. पनामा व इतर देशांतील अमेरिकन शाळांमागचे वास्तव आणि टोकाच्या विषम जीवनशैली उलगडून दाखविणारे तसेच इंडोनेशिया व इतर पूर्वेकडील देशांमध्ये लोककलांमधून सामान्यजन आपला क्षोभ कसा व्यक्त करतात ते आवर्जून पाहण्यासाठी कार्यक्रमांना नेणारे मित्र लेखकाला लाभतात.
ब्रह्मवाक्य बनलेल्या मिथकांबाबत लेखक सावध करतो. उदा., ‘सर्व आर्थिक वाढ ही मानवजातीच्या हिताची आहे’, किंवा ‘वस्तू खरेदी करीत राहणे हे आपले नागरी कर्तव्य आहे,’ किंवा ‘पाश्चात्त्य देश मागास देशांना मध्ययुगीन अर्थव्यवस्थेतून काढून आधुनिक औद्योगिक युगात स्थान मिळवून देण्यासाठी काम करतात.’ या मिथकांतील फोलपणा दाखविताना लेखक अनेक अहवाल व आकडेवारी देतो. एखाद्या माणसाला प्रचंड नफा झाला तरी ‘जी. एन. पी.’ वाढतो. त्यामुळे सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या मोजपट्टय़ाच कशा बनावट आहेत यावर तो बोट ठेवतो. खुद्द अमेरिकेत सुमारे पाच कोटी माणसांना पुढील जेवणाची चिंता असते याकडे आणि कॉर्पोरेटशाहीच्या पकडीनंतर देशांमधील आर्थिक विषमतेची दरी किती प्रचंड प्रमाणात वाढली याकडे लक्ष वेधतो. तिसऱ्या जगातील देशांना झालेले कर्ज १२५ लाख कोटी एवढय़ा प्रचंड रकमेचे झाले आहे त्याला कॉर्पोरेटशाहीची विधिनिषेधशून्य कारस्थाने कशी कारणीभूत आहे हे स्पष्ट करतो.
स्वच्छ कारभारासाठी आवश्यक असलेले सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे व अलगता राखण्याचे तत्त्व अमेरिकेत मोडीत काढले गेले. लेखक म्हणतो की रॉबर्ट मॅक्नामारा हे फोर्ड मोटार कंपनीचे अध्यक्ष, त्यानंतर केनेडी व जॉन्सन या अध्यक्षांच्या हाताखाली संरक्षण सचिव आणि शेवटी जागतिक बँकेचे प्रमुख बनले. याच पद्धतीने कॅस्पर वेनबर्गर, रिचर्ड हेल्सस, रिचर्ड चेनी, जॉर्ज बुश इत्यादी माणसे कॉर्पोरेट बोर्डस्, सरकारी पदे आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुख पदांवर वरचेवर फिरताना दिसतात. असा अनिष्ट प्रघात जॉन्सन, निक्सन, रेगन, बुश यांच्या काळात जास्तच रूढ झाला. यामुळे अमेरिकेची सर्वागीण घसरण होत गेली. ‘एनरॉन’ आणि ‘अँडरसन’ (हिशेबाच्या क्षेत्रातील कंपनी) या फसवणुकीसाठीच तयार झाल्या.
लेखकाला खंत व चिंता वाटते की पृथ्वीवरील संसाधनांची मर्यादा लक्षात घेता, जगाने अमेरिकेसारखे जगणे शक्य नाही आणि तसे जगाला का जगावेसे वाटते? सर्वात बलवान व श्रीमंत समजला जाणारा अमेरिकन समाज हा हिंसा, मादक द्रव्ये, व्यसनाधीनता, आत्महत्या, घटस्फोट यांच्या थैमानामुळे सर्वात कमी सुखी आहे. जागतिक बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय यंत्रणादेखील साम्राज्यवादी विचारांच्या कह्य़ात आल्याने आतापर्यंत सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या पाणी, दळणवळण, संपर्क, वीज, सांडपाणी व्यवस्थापन अशा सेवांच्या जाळ्यांचे खाजगीकरण करावे असा प्रयत्न करू लागल्या. हा भावी काळातील मोठा धोका लेखकाला दिसतो.
जगाला उच्च तत्त्वे देणाऱ्या अमेरिकेबद्दल लेखकाला एकीकडे अभिमान तर दुसरीकडे कॉर्पोरेटशाहीच्या ताब्यात जाऊन देश साम्राज्यवादाचा वाहक बनल्याचे दु:ख आहे. देशोदेशी अमेरिकेबद्दल तिरस्कार वाढून दहशतवादाचा धोका त्याला दिसतो. ‘आर्थिक मारेकरी’ म्हणून काम करणे थांबविल्यानंतर लेखकाने पर्यावरणस्नेही म्हणून काम स्वीकारले. तरीही त्याची तगमग थांबली नाही. शेवटी त्याने आदिम जमातींची जीवनपद्धती स्वीकारून त्यांच्या अस्तित्वासाठीच्या संघर्षांत साथ देण्याचे व्रत स्वीकारले. समारोपात लेखक स्पष्ट करतो की, कुठल्याही दमनकारी राजवटीपेक्षा कॉर्पोरेटशाही घातक आहे, कारण आपणही एक प्रकारे तिचा भाग आहोत. आपल्या पुढच्या पिढय़ांना वाचविण्यासाठी काय करता येईल याचे तो विवेचन करतो, तो म्हणतो की कधी काळी ब्रिटिशांनीदेखील बिंबवले होते की त्यांनी बनवलेली व्यवस्थाच सर्वोत्तम आहे; परंतु ‘टॉमस वेन’, ‘जेफरसन’ इत्यादींनी ब्रिटिश साम्राज्याचा स्वार्थी हेतू उलगडून दाखविला, जनतेची हृदये, मने उघडली. डोळे उघडले, लोक प्रश्न विचारू लागले. लबाडी, फसवणूक समजली आणि ठिणगी पडली. त्यातून क्रांतीचा वडवानल पेटला. साम्राज्यवाद नष्ट झाला.
भारतातल्या ‘सेझ’, औष्णिक अणुकेंद्रांचा अट्टहास, शेतीबाबाबतची गेल्या चार दशकांतील चुकीची धोरणे, मोटारीकरणाला प्रोत्साहन, सिंगूर, नंदीग्राम, किनाऱ्याचा नवा कायदा, नदी जोडणी, सुवर्ण चतुष्कोन, ‘कमाल जमीन धारणा कायदा’ रद्द करण्याचा निर्णय ज्याबाबत पंतप्रधानांनी जागतिक बँकेचा दबाव असल्याचे कबूल केले आहे, यातून आपला देश कॉर्पोरेटशाहीच्या सापळ्यात सापडल्याचे दिसते. पर्किन्स यांचे कबुलीजबाब आपले डोळे उघडण्याचे काम करतील.
अ‍ॅड्. गिरीश राऊत
‘कन्फेशन्स ऑफ अ‍ॅन इकॉनॉमिक हिट मन’ लेखक : जॉन पर्किन्स; प्रकाशक : एडलरी प्रेस, लंडन; किंमत- ७.९९ पौंड; पृष्ठे- २५०