Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

विविध

अणुकराराच्या अंमलबजावणीसाठी भारताला आणखी काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल - रॉबर्ट ब्लेक
वॉशिंग्टन १५ मे/पीटीआय
भारत-अमेरिका कराराच्या अंमलबजावणीसाठी भारताला आणखी दोन उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागेल, असे अमेरिकेचे श्रीलंकेतील राजदूत रॉबर्ट ब्लेक यांनी आज सांगितले. ब्लेक यांना लवकरच दक्षिण व मध्यम आशियासाठी साहाय्यक परराष्ट्र मंत्री या पदावर नेमले जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या विधानाला विशेष महत्त्व आहे.

जमात-उद-दावाच्या नेत्यांच्या स्थानबद्धतेबाबत पंजाब सरकारला कारणे देण्याचे आदेश
लाहोर, १५ मे / पी. टी. आय.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर जमात- उद - दावाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद याच्या व त्याच्या सहकाऱ्यासह त्याला स्थानबद्द करण्यात आले त्याचे कारण त्यांनी त्या दोघांना त्यावेळी सांगितले होते की नव्हते त्याची माहिती सांगण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी २१ मे पूर्वी द्यावी, असे आदेश लाहोर उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने दिले.

श्रीलंकेतील तामिळींसाठी अन्नपदार्थाची मदत त्वरेने करावी
जयललिता यांची केंद्राकडे मागणी
चेन्नई, १५ मे / पी. टी. आय.
श्रीलंकेच्या उत्तर भागात असलेल्या युद्धजन्य स्थितीत मदत शिबिरांमध्ये असलेल्या तामिळींसाठी भारत सरकारने त्वरेने हवाईमार्गाने अन्न पुरवठा करावा, असे आवाहन अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांनी केले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने ही मदत करावी. शिजविलेले अन्न, फळे, पाण्याच्या पिशव्या, भाज्या आदी मदत तेथे पुरविण्यात यावी.

गव्हाच्या वायदे बाजारावरील बंदी सरकारने उठविली
नवी दिल्ली, १५ मे / पी. टी. आय.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांना काही तास उरले असतानाच सरकारने आज गव्हाच्या वायदे बाजारावरील बंदी उठविली. फेब्रुवारी २००७ मध्ये डावे पक्ष आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या मागणीवरून सरकारने गव्हाच्या वायदे बाजारावर बंदी घातली होती. तथापि, तांदळाच्या वायदे बाजारावरील बंदी मात्र यापुढे कायम राहील, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे सव्वा दोन वर्षांपूर्वी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गहू आणि तांदळाच्या वायदे बाजारावरील बंदीची घोषणा केली होती,

बिहारला विशेष दर्जा द्या आणि पाठिंबा घ्या
नितीशकुमार यांचा सौदा
नवी दिल्ली/पाटणा, १५ मे/पी.टी.आय.

निवडणुकीनंतरच्या ‘धरपकडी’त बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार स्थिर राहतील, असा कयास त्यांच्याविषयी बांधला जात होता. ते भक्कमपणे रालोआच्या गोटातच राहतील, असे वाटत होते. पण निकाल घोषित होण्यास केवळ २४ तास उरले असताना नितीशकुमारांनी एक गुगली टाकला आणि आपणही ‘तिरकी चाल’ चालू शकतो, हे सप्रमाण सिद्ध केले. जो पक्ष बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन देईल त्यालाच केंद्रात पाठिंबा देऊ, असा नवाच पवित्रा नितीशकुमारांनी आज अचानक घेतला आणि राजकीय गोटात आणखीच खळबळ उडाली.

रुणू घोष यांना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
नवी दिल्ली, १५ मे/पीटीआय

दूरसंचार खात्याच्या माजी उपमहासंचालक रुणू घोष यांना २०.९४ लाखांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणी न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सीबीआय न्यायालयाचे न्या. व्ही.के.माहेश्वरी यांनी रुणू घोष यांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. रुणू घोष या सुखराम हे दूरसंचारमंत्री असताना त्या खात्यात उपमहासंचालक होत्या. त्यांना एक लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांची शिक्षा दोन महिने स्थगित ठेवली असून, दिल्ली उच्च न्यायालयात अपील करण्याची त्यांना संधी मिळावी, हा त्यामागचा हेतू आहे. त्यांना व्यक्तिगत ५० हजारांच्या जातमुचलक्यावर व तेवढय़ाच रकमेच्या हमीवर जामीन देण्यात आला आहे.

पशुपतीनाथाच्या पुजाऱ्यांची निवड आता लेखी परीक्षा, मुलाखतींद्वारे!
काठमांडू, १५ मे / पी. टी. आय.

नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरातील ३०० वर्षांपूर्वीची दक्षिणी ब्राह्मणांची व पुजाऱ्यांची मक्तेदारी मोडून आता नवे मुख्य पुजारी व अन्य पुजाऱ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतींद्वारे केली जाणार आहे. पंतप्रधान प्रचंड यांच्या राजीनाम्यापूर्वी ४ मे रोजी सांस्कृतिक कार्य खात्याने नवी नियमावली तयार करण्यात आली असून, कोणत्याही राष्ट्रीयत्वाचे बंधन नव्या पुजाऱ्याच्या निवडीत असणार नाही. वेद-वेदान्ताचा पदवीधर, वय ३० वर्षे, धर्म, तंत्र, संस्कृतचे उत्तम ज्ञान, पठण असलेली शाकाहारी, शुद्धचारित्र्याची व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकणार आहे, असे पशुपती एरिया डेव्हलपमेण्ट ट्रस्टचे सदस्य सचिव परमानंद शाक्य यांनी सांगितले. पशुपतीनाथ मंदिरातील जुन्या पुजाऱ्यांना माओवादी सरकारने दूर केल्याने काही काळ प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

नाइके कंपनी करणार पाच टक्के कामगार कपात
न्यूयॉर्क, १५ मे / पी. टी. आय.

क्रीडाक्षेत्रासाठी पादत्राणे, टीशर्टस् आदी उत्पादने बनविणाऱ्या जगप्रसिद्ध नाइके कंपनीने जागतिक स्तरावरील आपल्या पुनर्रचनेचा भाग म्हणून पाच टक्के कामगार कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे एक हजार ७५० कामगारांची कपात अपेक्षित आहे. नाइके या अमेरिकी कंपनीचे जगभरात सुमारे ३५ हजार कामगार असून बेव्हर्टन येथे कंपनीचे मुख्यालय आहे. मुख्यालयासह जगभरातील विविध देशामध्ये असलेल्या नाईकेच्या कामगारांची ही कपात करण्यात येणार आहे. मुख्यालयातील अंदाजे ५०० कामगार कमी करण्यात येणार आहेत. ही कामगार कपात येत्या काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. नव्याने केल्या जाणाऱ्या पुनर्रचनेनुसार कंपनी प्रामुख्याने ग्राहकासाठी लक्ष केंद्रीत करणार असून या बदलामुळे कंपनीची वाढही कायम राहील व नवीन संधींमध्येही आम्ही गुंतवणुकीसाठी प्रयत्न करू शकू, असे नाईके कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी मार्क पार्कर यांनी सांगितले. भारतात नाइकेचे प्रमुख कार्यक्षेत्र असून भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकपदही नाईकेकडे आहे.

‘मिग-२७’ विमान कोसळून बालकासह सात जखमी
जोधपूर, १५ मे/पीटीआय

मिग-२७ लढाऊ विमान आज सकाळी कोसळून झालेल्या अपघातात सहा मजूर आणि एक बालक जखमी झाले. ही दुर्घटना जोधपूर जिल्ह्य़ातील कोंकणी गावात सकाळी ८.१० ते ८.२० दरम्यान घडली. दुर्घटनाग्रस्त विमानाने नेहमीच्या सरावासाठी उड्डाण केल्यानंतर ते लगेचच एका शेतात बांधकाम सुरू असलेल्या घरावर कोसळले असल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्ट. कर्नल एन.एन. जोशी यांनी दिली. भारतीय हवाई दलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शरद कवीराज यांनी सांगितले की, दोन वर्षांच्या एका बालकासह सातजण दुर्घटनेत जखमी झाले. गेल्या ३० एप्रिल रोजी जैसलमेर येथे सुखोई-३० हे अत्याधुनिक लढाऊ विमान कोसळले होते. भारतीय हवाई दलाच्या विमानाला या वर्षांत झालेला हा चौथा अपघात आहे. यापूर्वी मिग-२७ विमान कोसळण्याची घटना गेल्या ३१ जानेवारीला हशिमरा येथे घडली होती. मिग-२१ विमानांच्या अपघातांमुळे या विमानाच्या दर्जाबाबत देशभर याआधीही खूप चर्चा झाली होती. सतत अपघातग्रस्त होणाऱ्या मिग-२१ विमाने हवाई दलाच्या ताफ्यातून काढून टाकावीत अशी मागणी वारंवार होत आहे. मिग-२१ विमानांबरोबरच आता सुखोई विमानांनाही आता अपघात होऊ लागल्याने त्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.