Leading International Marathi News Daily
शनिवार १६ मे २००९

पावसाळ्याचे पाणी मोठ मोठय़ा धरणांमध्ये साठवून त्याचे शुद्धीकरण करून नंतरच ते पाणी नागरिकांना पुरविले जाते. ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, प्रशासन व सरकारच्या अनेक प्रकल्पांतून हे काम करण्यात येते. पूर्वी पाण्याचा साठा ही कमी लोकसंख्येमुळे पाणीपुरवठय़ाबाबत समाधानकारक होता. मात्र आता भरमसाट वाढलेली लोकसंख्या, पावसाचे घटते प्रमाण, जलस्रोतांचे विषम प्रमाण यामुळे पाणीपुरवठय़ात कपात करावी लागत आहे.
भारतात पाणी वितरण करण्यासाठी एक हिशोब मांडला गेला आहे. त्याप्रमाणे बघितल्यास, माणशी पाण्याचा खर्च असा आहे.
या पाश्र्वभूमीवर अनेक प्रश्न उभे ठकतात. दैनंदिन वापरासाठी एकूण १३५ लिटर पाणी माणशी प्रत्येक दिवशी उपलब्ध

 

असते. पण खरेच इतके पाणी मिळते का? की त्यापेक्षा कमी मिळते? असे प्रश्न निर्माण होण्यामागे माणूसच कारणीभूत आहे. पाण्याच्या दुरुपयोग, अतिवापर, संचयशून्य व नियोजनशून्यता यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. यासाठी ‘पाणी वाचविणे’ गरजेचे आहे. जर प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर ही समस्या समजून घ्यायला हवी व कृतीत आणायला हवी. या संदर्भात पाण्याचा अतिवापर व दुरुपयोग कसा केला जातो यावर एक नजर टाकूया.
१) आंघोळीसाठी बादली वापरल्यास ४० लिटर पाणी लागते, पण शॉवर किंवा शॉवर पॅनेल वापरल्यास ८० लिटर पाणी लागू शकते तर या ठिकाणी आपण ४० लिटर पाणी वाचवू शकतो.
२) बाहेरून घरात आल्यावर चेहरा, हात-पाय धुण्यासाठी बादली व मगचा वापर केल्यास तीन लिटर पाणी लागू शकते, पण तेच काम नळ चालू ठेवून केल्यास सात लिटर पाणी लागू शकते व चेहरा धुताना जर का साबण डोळ्यात गेला तर दहा लिटरपेक्षा जास्त पाणी वापरले जाऊ शकते. इथे आपण सात लिटर पाणी वाचवू शकू.
३) आजकाल बऱ्याच घरात कपडे धुण्यासाठी- वॉशिंग मशीन वापरली जाते. घरातील सर्वाचे कपडे मिळून जर का एकदाच मशीन लावले तर २०० लिटर पाणी लागते. पण हेच काम दोन-तीन वेळेस केल्यास ५०० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरले जाते. या ठिकाणी ३०० लिटर पाणी सहज वाचू शकते.
४) जेवणाची भांडी धुण्यासाठी ३० लिटर पाणी पुरेसे आहे. पण नळ चालू ठेवून किंवा नळाखाली भांडी धुतल्यास बरेचसे पाणी वाया जात असते. घरातील स्त्री-पुरुष नोकरांकडूनसुद्धा पाण्याचा अतिवापर केला जातो.
५) स्वयंपाकासाठी १५ लिटर पाणी भरपूर झाले, पण त्यासाठी लागणारे तांदूळ, डाळ, भाज्या इ. चार-पाच पाण्यातून धुऊन घेतल्या जातात व ‘आम्ही किती स्वच्छ राहतो’ हे सांगण्याच्या नादात हे सर्व केले जाते. अशा ठिकाणी पाण्याबरोबर जीवनसत्त्वेसुद्धा वाहून जातात व ४० लिटपर्यंत पाणी वापरले जाऊ शकते.
६) दात घासण्याच्या वेळी, दाढी करताना वॉशबेसिनचा नळ चालू राहिल्यास बरेचसे पाणी वाहून जात असते. एक-दोन लिटरमध्ये होणाऱ्या कामासाठी १०-१२ लिटर पाणी लागते.
७) टॉयलेटमधील फ्लॅश टँक किंवा फ्लश व्हॉल्स, इथे पाण्याची सर्वात जास्त नासाडी होत असते. एक वेळेस १५-२० लिटर
पाणी जात असते. पण हेच काम तीन-पाच लिटरमध्ये सहज
होऊ शकते. पूर्वी कुठे कोणाकडे फ्लश टँक होते? परदेशाचे अनुकरण आपल्याला आज महागात पडत आहे. प्रगत
देशांमध्ये पाण्याची मुबलकता, योग्य नियोजन व नियंत्रित लोकसंख्या यांमुळे तेथील नगरिकांना
३५० लिटर पाणी माणशी प्रत्येक दिवशी पुरविले जाते, म्हणून उपलब्धतेनुसार ते पाणी वापरले जाते.
८) घरातून बाहेर जाताना सर्व नळ बंद आहेत किंवा नाही ते जरूर पाहणे. एखादा जरी नळ चालू राहिल्यास सर्वच पाणी वाहून जात असते.
९) घरातील नळांचे वॉशर्स, सप्लेनडर्स न बदलल्यास एक-दोन थेंब रात्रभर पडत राहिल्यास १०-१२ लिटर पाणी वाटय़ा
जाऊ शकते. म्हणून नळांची दुरुस्ती वेळेवर केली पाहिजे.
१०) २४ तास अखंड पाणीपुरवठा ही संकल्पना चुकीची आहे. ‘खास अ‍ॅमिनिटीज’च्या नावावर चांगले कमविण्यासाठी बिल्डरांनी ही योजना आखली पण त्यासाठी त्यांनी धरण, तलाव, डॅम, टाक्या कुठे बांधल्यात असं कधी ऐकिवात नाही. अशा ठिकाणी पाण्याची किंमत नसल्याने खरी पाण्याची नासाडी होत असते. पण २०० लिटरचे पिंप भरून ठेवल्यास व गरजेनुसार वापर केल्यास पाण्याची बरीच बचत होऊ शकते.
११) इमारतीतील जिने धुण्यासाठी, गाडय़ा धुण्यासाठी बाग-बगीचे यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. बऱ्याच ठिकाणी बोअरवेल केलेली नसते. पण पाण्याची खरी बचत करायची असल्यास त्यासाठी सांडपाण्याचे शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे.
१२) घराच्या बाहेर पडल्यावर किंवा प्रवासात आपण १३-१५ रुपयांची पाण्याची बाटली विकत घेतो व पूर्ण प्रवासात जपून वापरतो. कारण त्यासाठी आपण पैसे मोजलेले असतात, पण हीच पाणी वापरायची सवय घरात, ऑफिसात ठेवल्यास वैयक्तिकरीत्या आपण बरेच पाणी बचत करू शकतो.
१३) घरी आलेल्या पाहुण्यांना आपण ग्लास भर-भरून पाणी देतो, पण दोन-तीन घोट पिऊन ग्लासातील पाणी फुकट जाते. त्याऐवजी थंड व साध्या पाण्याची बाटली व खाली ग्लास दिल्यास गरजेनुसार पाणी वापरले जाऊन बरेच पाणी आपण वाचवू शकू. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वी केला जाणारा तांब्या-पेल्याचा व रांजण-ओगराळेचा वापर करून जेवढय़ा पाण्याची गरज असेल तेवढेच पाणी वापरले जायचे व योग्य पाण्याची बचत व्हायची.
१४) घरातील लहान मुलांकडूनसुद्धा पाण्याचा बराच अपव्यय होत असतो. वडिलधाऱ्यांनी व शाळेतील शिक्षकांनी मुलांना दैनंदिन पाणी वापराबाबत योग्य सूचना केल्यानेसुद्धा भविष्यात पाण्याची बरीच बचत करता येऊ शकेल व मुलांना पाण्याचे महत्त्व पटवून देता येईल.
१५) जेव्हा पाण्याचे नळ घरात आले तेव्हाच पाण्याचा अतिवापर व दुरुपयोग, पाण्याची नासाडी जास्त होऊ लागली. आजही खेडोपाडय़ातील गावकरी पहाटे उठून पाणी भरावयास जातात, कित्येक मैल चालून डोक्यावर पाणी आणले जाते, म्हणून त्यांच्यासाठी पाणी मूल्यवान वस्तू म्हटली जाते.
१६) पाण्याने भरलेले हंडे-कलशा, बादल्या ‘पाणी शिळे’ झाले म्हणून फेकून दिल्यानेसुद्धा खूप पाण्याची नासाडी होत असते. झाकून ठेवलेले पाणी कधीही खराब होत नसते. पाण्याचा अतिवापर (म्हणूनच एकूण पाण्याच्या ७५ ते ८० टक्के पाणी गटारात जात असते.)
वर बघितल्याप्रमाणे आपण जर का साध्या साध्या गोष्टींकडे वेळेवर लक्ष दिले तर खूप मोठय़ा प्रमाणावर पाणी वाचवता येणे शक्य होईल. पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे व कृतीतही आणले पाहिजे.
सुधीर मुकणे
लेखक संपर्क : ९८२१३८६६१४.