Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

स्थिर, धर्मनिरपेक्ष सरकारसाठी मनमोहन सिंग यांचे राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन
अनपेक्षित आणि निराशाजनक : राजनाथ सिंह

 

लोकसभा निवडणुकांचे निकाल अनपेक्षित आणि निराशाजनक ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी भाजपचा दारुण पराभव मान्य केला. भाजपचा एवढा मोठा पराभव होईल असे वाटले नव्हते, असेही ते म्हणाले. राजनाथ सिंह गाझियाबाद मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. भाजपला अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या बडय़ा नेत्याची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली, असे ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या. भाजप आणि रालोआचे गृहित धरलेले यश प्रत्यक्षात उतरले नाही आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेशात काँग्रेसची कामगिरी अनपेक्षितपणे सरस ठरल्यामुळेही भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला, असे मत भाजपचे रणनितीकार सुधींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पराभवाचे गंभीर विश्लेषण आवश्यक : प्रकाश करात
लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी डाव्या आघाडीला मोठाच धक्का बसला असल्याचे सांगून माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी काँग्रेस-युपीएचा विजय मान्य केला. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचा काँग्रेस-युपीएने धुव्वा उडविला. निकालांचे कल जाहीर होत असतानाच पूर्ण निकाल हाती येण्यापूर्वीच करात यांनी दुपारी पत्रकार परिषद बोलावून डाव्या आघाडीचा पराभव मान्य केला. डाव्या आघाडीच्या या सुमार कामगिरीचे गंभीरपणे विश्लेषण होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
पंधराव्या लोकसभेत माकप गैरकाँग्रेस आणि गैरभाजप भूमिकेचा पाठपुरावा करीत विरोधी बाकांवर बसेल तसेच युपीएच्या परदेश व आर्थिक धोरणांचा विरोध करीत राहील, असेही करात यांनी स्पष्ट केले. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचा धुव्वा का उडाला, असे विचारले असता या दोन राज्यांमध्येच नव्हे तर काँग्रेसने देशभरात सर्वत्र विजय मिळविला आहे. त्याच्या कारणांचे विश्लेषण करावे लागेल, असे करात यांनी सांगितले. काँग्रेस आणि मित्र पक्षांनी जनतेपुढे आपले मुद्दे परिणामकारकपणे ठेवले, त्यामुळे त्यांचा विजय झाला, असे करात म्हणाले. १८ मे रोजी होणाऱ्या माकपच्या पॉलिटब्युरो बैठकीत केरळ व पश्चिम बंगालचे नेतेही सहभागी होणार असून त्यांच्याशी निकालांविषयी विस्तृत चर्चा करूनच मत व्यक्त करू, असे करात म्हणाले.
काँग्रेसला डाव्यांच्या समर्थनाची गरज नाही : बर्धन
डाव्या आघाडीचा फडशा पाडणाऱ्या निकाल बघून भाकपलाही धक्का बसला आहे. नेहमीप्रमाणे आम्ही विरोधात बसू, असे पक्षाचे सरचिटणीस ए. बी. बर्धन म्हणाले. काँग्रेस-युपीएला आता आमच्या समर्थनाची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. बसप, अण्णाद्रमुक, बिजू जनता दल आणि तेलगू देसम या तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षांना आम्ही वाऱ्यावर सोडून देणार नाही, असेही बर्धन यांनी स्पष्ट केले.
वाईट कारभारामुळे पराभव : अमरिंदरसिंग
पंजाबमध्ये राज्य सरकारने केलेल्या वाईट कारभारामुळे शिरोमणी अकाली दलाचा (बादल गट) पराभव झाला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदरसिंग म्हणाले.
गेल्या दोन वर्षांपासून पंजाबमधील नेतृत्त्वाच्या उद्धट स्वभावामुळे, विशेषत उपमुख्यमंत्री सुखबिर सिंग बादल यांच्या वागण्यामुळे मतदारांनी शिरोमणी अकाली दलाला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
राज्यातील भाजप-शिरोमणी अकाली दल आघाडीच्या सरकारवर जनता खूष नसल्याचा दावा करीत अमरिंदरसिंग म्हणाले की, लहान खेडय़ांमधील भाजपची पारंपरिक मतेदेखील आमच्या बाजूने आली आहेत. याला काँग्रेसने केलेली चांगली कामगिरी जबाबदार आहे. शिरोमणी अकाली दलातील बहुतांश नेते सुखबिरसिंग बादल यांच्या वागण्यावर नाराज आहेत. निवडणुकीत धूळ चारली गेल्यामुळे भाजप-शिरोमणी अकाली दल आघाडीत फूट पडेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
मेहनतीला जनतेचा कौल : नितीश कुमार
राज्यसरकारने विकासकामांवर भर दिल्यामुळे मतदारांनी आपल्याला सकारात्मक मत दिल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.
राजदचा कंदील (निवडणूक चिन्ह) मोडला आणि त्यातलं तेल इतस्तत: पसरून त्यात बंगला (लोजपचे निवडणूक चिन्ह) जळून गेला. बाणाने (जदयूचे निवडणूक चिन्ह) आपले लक्ष्य अचूक साधले व विजय मिळविला, असे नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि लोजप प्रमुख रामविलास पासवान यांच्या नकारात्मक राजकारणाला वैतागलेल्या जनतेने राज्यात कायदा-सुव्यवस्था, जातीय सलोखा आणणाऱ्या व विकास साधणाऱ्या सरकारच्या बाजूने जनता राहिली.
मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच काँग्रेस आणि तिसऱ्या आघाडीकडून युतीसाठी आमंत्रण मिळालेल्या नितीश कुमार यांनी बिहारला विशेष गटाचा दर्जा दिला जावा, अशी मागणी केली.
माकपवरचा अविश्वास दाखवून दिला : ममता बॅनर्जी
डाव्यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या सत्ताधारी पक्षावर लोकांनी आपला अविश्वास दाखवून दिला असल्याचे मत पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची तटबंदी खिळखिळी करून लोकसभा निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुका मुदतपूर्व घेण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीमध्ये माकपा नेतृत्त्वाखालील आघाडी सरकारला नाकारून डाव्यांवर विश्वास नसल्याचे जनतेने दाखवून दिले आहे. आता राज्यात लवकरात लवकर विधानसभा निवडणुका घेण्यात याव्यात ही आमची मागणी आहे, असे ममता बॅनर्जी यांनी ‘स्टार आनंदा’ या स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
माकप आणि त्यांच्या सहकारी पक्षांची दहशत यांना जनतेने दिलेल्या विरोधी कौलाबद्दल ममता यांनी आभार मानले आणि आपला विजय जनतेला समर्पित केला. संयुक्त पुरोगामी आघाडीचा महत्त्वाचा जोडीदार बनलेल्या तृणमूल काँग्रेसचे केंद्रात नवे चेहरे दाखल होतील का, या प्रश्नाला उत्तर देताना अजून मतदान पूर्ण व्हायचे आहे, असे त्या म्हणाल्या. तृणमूलच्या विजयी उमेदवारांसोबत एकत्रितपणे चर्चा करण्यात येईल, त्यानंतर पुढील रणनीती आखण्यात येईल. भाजपसोबत जाणार नाही आणि केंद्रात धर्मनिरपेक्ष सरकार येण्यासाठी प्रयत्न करू, हे याआधीच जाहीर केले आहे, असे त्यांनी सांगितले.

मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांचे अडवाणींकडून अभिनंदन
लोकसभा निवडणुकीमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज दूरध्वनी करून अभिनंदन केले. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान लालकृष्ण अडवाणी यांनी मनमोहनसिंग व सोनिया गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले होते.