Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

नेहमीच योग्य निर्णय घेणाऱ्या देशवासीयांप्रती सोनियांची कृतज्ञता
नवी दिल्ली, १६ मे/खास प्रतिनिधी

 

आपले हित कशात आहे याची देशवासियांना पुरेपूर जाणीव आहे. ते नेहमीच योग्य निर्णय घेतात, अशा शब्दात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-युपीएला मोठा विजय मिळवून दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज देशातील मतदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप तसेच डाव्या पक्षांचे परंपरागत बालेकिल्ले उद्ध्वस्त करीत काँग्रेसने मिळविलेल्या अनपेक्षित मोठय़ा विजयानंतर डॉ. मनमोहन सिंग आज दुपारी आपल्या सहकारी मंत्र्यांसह सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांचे निवासस्थान १०, जनपथ येथे पोहोचले आणि सोनिया गांधींचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे या विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर जमलेल्या पत्रकारांना संबोधित करताना मनमोहन यांनाी काँग्रेसच्या विजयाचे श्रेय सोनिया गांधी आणि तरुण नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला दिले. देशवासियांना स्थिर आणि धर्मनिरपेक्ष सरकार देण्याचे कर्तव्य आम्हाला पार पाडायचे आहे. त्यासाठी जुने वाद विसरून राजकीय पक्षांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन मनमोहन सिंग यांनी यावेळी केले.