Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पंतप्रधानपद व मराठाकार्डचा राष्ट्रवादीला फटका
शहरी भागाने काँग्रेसला दिला हात !
संतोष प्रधान
मुंबई, १६ मे

 

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. पक्षाने वापरलेल्या मराठा कार्डबरोबरच शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा राज्यातील जनतेला फारसा भावलेला दिसत नाही. शहरी मतदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला राज्यात सर्वाधिक जागा मिळवणे शक्य झाले आहे.
काँग्रेसचे १७ तर राष्ट्रवादीचे आठ असे आघाडीचे २५ उमेदवार राज्यात निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट होते. मात्र राष्ट्रवादीची अनपेक्षित पिछेहाट झाली. पक्षाने मराठाकार्ड पद्धतशीरपणे वापरले होते. गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत मराठा कार्ड फायदेशीर ठरले होते. या वेळी मात्र मराठा कार्डचा फारसा उपयोग झाला नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, हातकणंगले, नगर, मावळ व शिरुर या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसला. विशेष म्हणजे पवारांच्या पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ाचा उपयोग होईल, अशी अटकळ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधली होती. त्याचाही उपयोग झाला नाही. पश्चिम महाराष्ट्रातही हा मुद्दा फारसा प्रभावी ठरला नाही. पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचारात अतिरेक केला होता. यामुळे मतदारांनी राष्ट्रवादीला जागा दाखवून दिली अशी प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये व्यक्त केली जात आहे. मराठा कार्डमुळे इतर मागासवर्गीय व दलित मतदारांचा काही प्रमाणात रोष राष्ट्रवादीला सहन करावा लागला. एखादा मुद्दा तापविला की, त्याची दुसऱ्या बाजूने प्रतिक्रिया उमटते. मराठा कार्डबाबत राष्ट्रवादीचे तसेच झाले, असे बोलले जात आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रवादीच्या काही ठराविक नेत्यांनी उगाचच पेटविला होता. मराठा समाजाने या मुद्दय़ावर राष्ट्रवादीला पूर्ण पािठबा दिलेला नाही, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीला मनसे फॅक्टरमुळे ठाणे व ईशान्य मुंबई या दोन जागा जिंकता आल्या. माढा, बारामती, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील तीन जागा मिळाल्या आहेत. नाशिकमध्ये मराठा मतांमधील विभाजनाचा फायदा राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांना झाला. विदर्भात प्रफुल्ल पटेल तर मराठवाडय़ात डॉ. पद्मसिंह पाटील हे विजयी झाले आहेत. निवडणुकीपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादीचे गुफ्तगू सुरू झाल्याची जोरदार चर्चा होती. त्याचाही फटका दोन्ही पक्षांना बसलेला दिसत आहे. राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेनेच्या जागा घटल्या आहेत. प्रत्येक टप्प्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला अपशकून करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात राष्ट्रवादीचेच जास्त नुकसान झाले. दुहेरी आकडाही गाठता आलेला नसल्याने राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रवादीचे महत्त्व अर्थातच कमी झाले आहे.
राष्ट्रवादीची पिछेहाट होत असताना काँग्रेसला मात्र चांगले यश मिळाले आहे. काँग्रेसला देशात सर्वत्रच नागरी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईतील पाच जागा काँग्रेसने कायम राखल्या. पक्षांतर्गत गटबाजीमुळे पुणे व नागपूरच्या काँग्रेसच्या जागा अडचणीत होत्या. मात्र या दोन्ही जागा काँग्रेसने िंजंकल्या. सोलापूर, नांदेड या नागरी भागातही पक्षाचे उमेदवार निवडून आले. देशात काँग्रेसची सुप्त लाट होती. त्याचा पक्षाला महाराष्ट्रात फायदा झाला. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची चांगली प्रतिमा, मंदीच्या काळातही अर्थव्यवस्था चांगली राखण्यात सरकारला आलेले यश, स्थिर सरकार या मुद्दयावर नागरी भागात काँग्रेसला चांगला पाठिंबा मिळाला. काँग्रेसमध्ये स्वबळावर लढावे या मागणीने जोर धरला होता. काँग्रेस स्वबळावर लढला असता तर २० ते २२ उमेदवार निवडून आले असते, असे पक्षात बोलले जात आहे. यामुळेच राष्ट्रवादीबरोबर केलेल्या आघाडीचा फायद्याबरोबरच तोटाही झाल्याचे मत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.