Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

ग्रामीण मतदारांनी सेना-भाजपची लाज राखली; पण शहरात युती उघडी
संदीप प्रधान
मुंबई, १६ मे

 

शिवसेनेच्या हातात गेली ४० वर्षे असलेला ‘मराठी’ मुद्दय़ाचा हुकमी एक्का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेचल्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून विविध मुद्दय़ांवरून सरकारवर आसूड ओढणाऱ्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची ग्रामीण जनतेने अब्रु वाचवली पण शहरी मतदारांवर भिस्त ठेवलेली भाजप अक्षरश: उघडी पडली.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १२ तर भाजपचे १३ असे २५ खासदार विजयी झाले होते. यावेळी शिवसेनेला एका जागेचा फटका बसला व त्यांच्या खासदारांचे संख्याबळ ११ झाले. भाजपचे चार खासदार कमी झाले व त्यांचे संख्याबळ नऊ झाले. मुंबईतून शिवसेनेचे मोहन रावले हे सातत्याने पाचदा लोकसभेवर गेले होते. ते यावेळी पराभूत झाले. त्यामुळे मनसेचा शिवसेनेला बसलेला हाच झटका आहे. मात्र भाजपची प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विदर्भ या गडात पडझड झालीच पण मुंबईत राम नाईक, किरीट सोमैया असे दिग्गज उमेदवारही भुईसपाट झाले. भाजपच्या गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाने अनुक्रमे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे गड राखल्याने भाजपची आणखी घसरण झाली नाही. प्रमोद महाजन यांच्या पश्चात भाजपमधील सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग सपशेल अपयशी ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केला तेव्हाच बहुदा उद्धव ठाकरे यांना मुंबई, ठाणे, नाशिक या शहरी भागात आपली डाळ शिजणार नाही याची कल्पना आली असल्याने त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला. त्यामुळेच हिंगोली, मावळ, रायगड, शिर्डी या नव्या जागा शिवसेनेने जिंकल्या आणि ठाणे, दक्षिण मुंबई, सिंधुदुर्ग व उस्मानाबाद या विद्यमान जागा गमावल्याने झालेली हानी भरून काढली. मुंबई शहरातील मराठी टक्का घटत असून मराठीच्या मुद्दय़ावर राज ठाकरे यांनी केलेल्या राजकारणाला काटशह देण्याकरिता शिवसेनेला आपला पत्ता खेळावा लागेल. संजय निरुपम यांचा झालेला विजय आणि मनसेला प्रत्येक मतदारसंघात मिळालेली लाखाहून अधिक मते याचा विचार केला तर मुंबईत मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा संघर्ष तीव्र होण्याची भीती आहे. त्यावेळी मनसेपासून आपले संरक्षण शिवसेना करू शकते, असा संदेश शिवसेना देऊ शकली आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नागरी कामे करून मराठी माणसाचे मन जिंकू शकली तरच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची मुंबई, ठाण्यात डाळ शिजेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे हेच नेते असून नितीन गडकरी यांचे नेतृत्व त्यांच्या तुलनेत प्रभावी नाही हे निकालाने स्पष्ट झाल्याचे भाजपमधील मंडळी खासगीत मान्य करीत आहेत. विदर्भात भाजपला मोठा फटका बसला.
विदर्भातील प्रचाराची जबाबदारी मुख्यत्वे नितीन गडकरी यांनी घेतली होती. तेथील नागपूर, गडचिरोली या भाजपला विजय अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत तर भंडारा व वर्धा या दोन विद्यमान जागा गमावल्या. अकोला व चंद्रपूर या केवळ दोनच जागा भाजपने राखल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या मराठवाडय़ात बीडची जागा त्यांनी नव्याने जिंकली तर जालना राखली. लातूर, नांदेडची जागा मात्र मुंडे यांनी गमावली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी गोपीनाथ मुंडे हे प्रदेशाध्यक्ष असताना भाजपची एक जागा घटल्यावर त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आले होते, याकडे लक्ष वेधले जात आहे.