Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

राज ठाकरे यांचा युतीला ‘दस नंबरी’ फटका
मुंबई, १६ मे/प्रतिनिधी

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारस उद्धव ठाकरे हे नसून आपण आहोत हे दाखविण्याकरिता राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ असताना केवळ शहरी भागातील १२ मतदारसंघांत उमेदवार दाखल केले. त्यांचा जीव तोडून प्रचार केला. हे ‘राज’ कारण नव्वद टक्के यशस्वी झाले. राज यांच्या उमेदवारांचा भाजपच्या उमेदवारांना अधिक त्रास होईल व शिवसेनेचे उमेदवार थोडय़ाफार मताधिक्याने विजयी होतील, असा अंदाज होता. परंतु १० लोकसभा मतदारसंघांत राज यांनी भाजपबरोबर शिवसेनेलाही दणका दिला.
राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, औरंगाबाद व पुणे या १२ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. दक्षिण मुंबईत शिवसेनेचे मोहन रावले यांना तिसऱ्या क्रमांकावर फेकून मनसेचे बाळा नांदगावकर हे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना एक लाख ९० हजार, मनसेचे बाळा नांदगावकर यांना एक लाख ५९ हजार ४२९ तर शिवसेनेचे मोहन रावले यांना एक लाख १० हजार मते मिळाली. नाशिक लोकसभा मतदारसंघातही मनसेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी दोन लाख आठ हजार मते घेतली.
कल्याण व औरंगाबाद येथे मात्र मनसेचे उमेदवार फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. शिवसेनेचे आनंद परांजपे व चंद्रकांत खैरे हे तेथे विजयी झाले. कल्याण मतदारसंघात मनसेच्या वैशाली दरेकर यांना एक लाख सात हजार मते मिळाली तरीही परांजपे यांनी आपला गड राखला. औरंगाबादमध्ये मनसेचा उमेदवार तांत्रिक घोळात अपक्ष ठरल्याने तेथे या पक्षाला फारसा प्रभाव दाखवता आला नाही.
दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेच्या मोहन रावले यांना जबर फटका दिला. दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड एक लाख ५८ हजार मते घेऊन विजयी झाले. मनसेच्या श्वेता परुळकर यांनी येथे एक लाख सहा हजार ३३० मते घेतल्याने शिवसेनेचे सुरेश गंभीर एक लाख १२ हजार मते घेऊनही पराभूत झाले. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त तीन लाख २२ हजार मते घेऊन विजयी झाल्या. मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांनी एक लाख ३२ हजार ८५५ मते घेतली व त्याचा फटका भाजपचे महेश जेठमलानी यांना बसला. जेठमलानी यांना एक लाख ४४ हजार मते मिळाली. वायव्य मुंबईत समाजवादी पार्टीचे अबू आझमी निष्प्रभ ठरले. त्यांची ‘सायकल’ ८२ हजार मतांवर अडकली. त्याच वेळी मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी एक लाख २३ हजार मते घेतल्याने शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांच्याकरिता अत्यंत सोपी वाटणारी ही निवडणूक कठीण झाली. कीर्तिकर यांनी दोन लाख १२ हजार मते घेतली तर काँग्रेसचे गुरुदास कामत हे दोन लाख ५१ हजार मते घेऊन विजयी झाले. उत्तर मुंबईतील फ्रीस्टाईल कुस्तीत भाजपचे राम नाईक यांना मनसेच्या शिरीष पारकर यांनी धोबीपछाडच दिला. नाईक यांना एक लाख ९७ हजार मते मिळाली तर पारकर यांनी एक लाख ४६ हजार मते घेतली. त्याचा थेट फायदा उत्तर भारतीय संजय निरुपम यांना झाला. निरुपम यांना दोन लाख पाच हजार मते मिळाली. ईशान्य मुंबई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांना विजय मिळाला आणि मुंबईत पाय रोवण्याकरिता धडपडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा मिळाला. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा गड ढासळत असताना राष्ट्रवादीला मुंबईत मिळालेले यश त्यांच्या जखमेवर फुंकर घालणारे आहे. संजय पाटील यांनी दोन लाख १५ हजार मते घेतली. भाजपच्या किरीट सोमैया यांना दोन लाख १० हजार मते मिळाली. मनसेच्या शिशिर शिंदे यांनी एक लाख ९५ हजार १८४ मते घेतल्याने किरीट सोमैया यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विजय चौगुले यांना अडीच लाख मते मिळाली. परंतु मनसेचे राजन राजे यांनी एक लाख ३४ हजार मते घेतल्याने अगोदरच वादग्रस्त प्रतिमेमुळे संकटात असलेल्या चौगुले यांना शिवसेनेचा ठाण्याचा गड राखता आला नाही.