Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

ट्वेन्टी-२०चा सामना षटकार मारून जिंकला!
मुख्यमंत्री अशोक चव्हाण
मुंबई, १६ मे / खास प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आले होते. मात्र २०-२० क्रिकेट सामन्याच्या धर्तीवर चौकार-षटकार ठोकून सामना जिंकला अशी मार्मिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या विजयावर आज व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेल्या आघाडीचा फायदा झाला तसाच काही ठिकाणी तोटाही झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुबंई व ठाण्यातील काँग्रेसच्या विजयात मनसेला फॅक्टर मान्य करण्यास काँग्रेसने नकार दिला.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपद चव्हाण यांच्याकडे आले होते. यामुळेच चव्हाण यांच्या नेतृत्वाची निवडणुकीत कसोटी होती. राज्यात सर्वाधिक १७ जागाजिंकल्याने मुख्यमंत्र्यांचे राजकीय वजन वाढले आहे. काँग्रेसच्या विजयाबद्दल पक्षाच्या गांधी भवन येथील मुख्यालयासमोर विजयोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असताना रामदास आठवले आणि राजेंद्र गवई हे रिपब्लिकन पक्षाचे नेते पराभूत झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे नेतृत्व आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पाच वर्षांंच्या कामगिरीवर खूश होऊन राज्यातील जनतेने काँग्रेसला पािठंबा दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधानांनी मुंबईला झुकते माप दिल्याने शहरात काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे, असेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले. राज्यात काँग्रेसने २५ जागा लढविल्या व त्यातील १७ उमेदवार निवडून आले आहेत.
काँग्रेस आघाडीला मिळालेल्या यशामुळे विधानसभा निवडणुकीत नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बाहेरचा उमेदवार लादल्यास शक्यतो उमेदवार निवडून येऊ शकत नाही. यामुळेच रामदास आठवले यांचा पराभव झाला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केला. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपाने मत फोडल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. यावेळी मनसेचा अन्य कोणाला तरी फटका बसलेला दिसतो, अशीही मार्मिक प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करू नये, असा पक्षात मतप्रवाह होता याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रवादीबरोबर झालेल्या आघाडीचा काही ठिकाणी तोटाही झाला आहे. तोटा कोठे झाला हे लगेचच सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम ठेवायची की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. निकालाचे विश्लेषण केल्यावरच आघाडीचा निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. दोन ठाकरे यांच्या वादात (उद्धव व राज) तिसऱ्या ठाकरे (माणिकराव) यांचा फायदा झाला का, यावर ‘ओरिजनल’ ठाकरे जिंकल्याचे उद्गार चव्हाण यांनी काढले.